धुळे । प्रतिनिधी dhule
तालुक्यातील कुंडाणे-वेल्हाणेत काल दाम्पत्याने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेचा उलगडा झाला असून चारीत्र्याच्या संशयातून आधी पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर पतीने देखील गळफास घेवून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात मयत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंडाणे-वेल्हाणे येथील जितेंद्र बालु सोनवणे (वय 30) व त्यांची पत्नी प्रतिक्षा (वय 26) यांचे घर काल सकाळी सात वाजेपर्यंत बंद होते. त्यामुळे शेजार्यांनी आवाज दिला. परंतु, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस पाटलांच्या मदतीने घर उघडले असता घरात दाम्पत्य गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले होते. दरम्यान त्यांना एक पाच वर्षाची मुलगी व तीन वर्षाचा मुलगा असून दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण समजु शकलेले नव्हते. पोलिस तपासात कारण समोर आले.
जितेंद्र हा त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यावरुन दोघांमध्ये विवादही होत होते. अखेर जितेंद्रने काल रात्री पत्नी प्रतिक्षा हिला दोरीच्या साहाय्याने गळा आवळून जीवेठार मारले. त्यानंतर स्वत नेही किचनमधील स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत कैलास शामराव पाटील (वय 50 रा. चिमणपुरी, पिंपळे बु्र. ता. अमळनेर) यांच्या फिर्यादीवरून मयत जितेंद्र सोनवणे याच्याविरुध्द तालुका पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय ज्ञानदेव काळे हे करीत आहेत.