Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखधरणगावकर शुक्ला कुटुंबाने जोपासलेला देहदानांचा आदर्श!

धरणगावकर शुक्ला कुटुंबाने जोपासलेला देहदानांचा आदर्श!

जळगाव जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या एका अनुचित घटनेची दखल घेऊन त्यावर लिहावे लागले. घटनाही तशीच होती. विशेष करुन सुसंस्कृत समजल्या जाणार्‍या जळगावच्या लौकीकाला ती घटना अशोभनीय होती. प्रतिष्ठेपायी विवाहाच्या मांडवात घुसून जमावाने वधुवरावर हल्ला केला. त्यामुळे विवाह तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांना घ्यावा लागला. त्याचीच दखल घेऊन लिहिलेला ‘जळगाव जिल्ह्यात सुद्धा प्रतिष्ठेपायी हत्या’? या मथळ्याचा अग्रलेख वाचकांनी वाचलाच असेल. त्या अग्रलेखात उल्लेख केल्याप्रमाणे जळगाव जिल्हा हा कितीतरी पुढारलेला आणि सुशिक्षित आहे. नुसता सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत देखील आहे. अनेक जळगावकरांनी देशाच्या विविध प्रांतात आणि परदेशात सुद्धा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटवली आहे. चांगले नागरिक कसे असावेत याचा आदर्श त्यांनी समाजापुढे प्रत्यक्ष कृतीने ठेवला आहे. हाच वारसा आजही चालवला जातच आहे हे सिद्ध करणारी घटना नुकतीच माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. जळगाव जिल्ह्यात धरणगाव शहरातील एका कुटुंबातील तिसरे देहदान नुकतेच नोंदवले गेले आहे. एकाच कुटुंबातून तीन तीन देहदान घडल्याचा हा मराठी मुलखातील कदाचित पहिलाच प्रकार असेल. जळगाव जिल्हा खुप पुढारलेला आहे हेच यातून अधोरेखित करणार्‍या या घटनेची दखल घेणे ही सुद्धा जबाबदारीच आहे. धरणगावमधील शुक्ला कुटुंबियातील मदन शुक्ला यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेवरुन त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. देहदान करणारे कुटुंबातील ते तिसरे सदस्य. यापूूर्वी त्यांच्या दोन्ही भावांनी देखील देहदान केले आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याने मृत्यूपश्चात देहदान करण्याचा संकल्प लिहून ठेवला तरी त्याची अंमलबजावणी होतेच असे नाही. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतरचा काही काळ हा बाकी सर्व कुटुंबियांना भावनेच्या प्रभावात ठेवतो. त्यामुळे मृताची इच्छा माहित असुनही ती पूर्ण केली जात नाही. मृत्यूपश्चात कोणतेही विधी पार न पाडता पार्थिव देऊन टाकायचे ही कल्पनाच कदाचित मानवणारी नसते. मृत्यू आणि त्यापश्तातच्या विधींची सामाजिक परंपरा आहे. ती पाळण्याकडेच समाजाचा कल आढळतो. निधन झाल्यानंतर त्यांचे क्रियाकर्म व्यवस्थित पार पाडण्याला प्राधान्य दिले जाते. नव्हे तसे करणे ही उर्वरित सदस्यांसाठी कर्तव्यभावना ठरते. आणि मनाला मुरड घालून परंपरांना मागे टाकणेही सोपे नसतेच. परंपरा पालन केले नाही म्हणून समाज बोल लावण्याची आणि नातेवाईकांकडूून नाके मुरडली जाण्याची शक्यताही असते. या सगळ्या शक्यता बाजूला सारुन कुटुंबातील तीन तीन सदस्यांनी देहदान करण्याचा संकल्प करणे आणि त्यांच्या मृत्यूपश्चात कुटुंबातील उर्वरित सदस्यांनी भावनांचा आवेग आवरुन त्या संकल्पाची पूर्ती करणे कोणालाही वाचतानाही अशक्य वाटावे. तथापि शुक्ला कुटुंबियांनी ते घडवून आणले आहे. सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजाला प्रत्यक्ष कृतीने घालून दिला आहे. देहदानाचे अनेक फायदे सांगितले जातात. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शरीररचनेचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करता येतो. विविध वैद्यकीय कार्यशाळांमध्ये पार्थिव उपयोगी पडू शकते. रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्यांचे प्रशिक्षण दान केलेल्या देहामुळे देणे शक्य होते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कशा कराव्यात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान केवळ पुस्तकी राहात नाही. ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे’ असे समर्थवचन आहे. शुक्ला कुटुंबियांनी ते वास्तवात उतरवले आहे. त्याचे अनुकरण सर्वत्र होईलच. तथापि जळगाव जिल्ह्यात ते अधिक प्रमाणात होईल याची खात्री वाटते.

- Advertisment -

ताज्या बातम्या