Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedसुरेल आवाजाची आयडॉल : आम्रपाली

सुरेल आवाजाची आयडॉल : आम्रपाली

येवला । सुनील गायकवाड | Nashik

सामान्य कुटुंबातील आम्रपाली पगारे हिने गायनाचे शिक्षण (Singing education) नसताना साडेचार हजार स्पर्धकांतून थेट सोनी मराठीच्या इंडियन आयडॉलमध्ये (Marathi Indian Idol) धडक मारली आहे. पहिल्याच कार्यक्रमात सषने आपल्या मधूर गायनातून लक्ष वेधले. संगीतकार अजय-अतुल (Composer Ajay-Atul), गायिका बेला शेंडे (Singer Bella Shende) यांंनी तिचे तोंडभरून केलेले कौतुक यातच तिच्या सुरेल आवाजाची दाद मिळाली. आम्रपालीला टीव्ही स्क्रीनवर (TV screen) पाहून येवलेकरांचा अभिमान वाढला आहे.

- Advertisement -

सावरगाव (savargaon) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात (New English School) नववीच्या वर्गात शिकणारी आम्रपाली नांदूर (Amrapali Nandur) या छोट्याशा गावातील गौतम पगारे यांची लेक आहे. वडिलांचा बँजोचा व्यवसाय एवढीच ती संगीताची आम्रपालीला पार्श्वभूमी असताना तिने फक्त मोबाईलवर संगीत व गाणे ऐकून आपल्यातील गायन कलेला बहर दिला. यामुळे वेगवेगळ्या व्यासपीठावर चमकणारी आम्रपाली सोनी मराठीने (Sony Marathi) जेव्हा इंडियन आयडॉल (Indian Idol) शोसाठी ऑनलाईन प्रवेश फेरी (Online admission round) घेतली तेव्हा तिने सर्वांचे लक्ष वेधले. राज्यातील सुमारे साडेचार हजार गायक स्पर्धकांतून पात्र ठरत या व्यासपीठावर ती पोहोचली आहे.

गायनाची कुठलीही पार्श्वभूमी नाही, गायनाचे तंत्रशुद्ध शिक्षणही नाही, मात्र तिचा आवाज ऐकला की ऐकणाराही मंत्रमुग्ध होऊन जातो. इतक्या सुरेल आवाजात गाणार्‍या आम्रपालीचे गायन ऐकल्यावर पहिल्याच वेळी अजय-अतुलदेखील अवाक झाले होते. नांदूर या छोट्या गावातून कुठलेही शिक्षण-प्रशिक्षण नसताना इतक्या सुरेल आवाजात गाणार्‍या आम्रपालीच्या गायनावर इंडियन आयडॉल कार्यक्रमाची संपूर्ण टीमच खूश झाली. यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी नांदूर येथील तिच्या घरी तसेच सावरगावच्या शाळेत येऊन तिच्या या सर्वसाधारण परिस्थितीचे चित्रिकरणदेखील केले आहे.

द प्रोमोचा व्हिडिओ (video) सोशल मीडियावर (social media) जेव्हा व्हायरल झाला आणि गायिका बेला शेंडे व अजय-अतुल आम्रपालीचे कौतुक करताना दिसले तेव्हा आपल्या मायभूमीतील लेकीचे सर्व स्तरातून तोंडभरून कौतुक झाले. किंबहुना शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व नांदूर पंचक्रोशीतदेखील तिच्या यशाचे भरभरून स्वागत झाले. माझ्या मुलीवर माझा विश्वास होता आणि तो तिने सार्थ ठरवला आहे. मला संधी मिळू द्या, मी सोने करील हे ती नेहमी म्हणायची. आज इतक्या मोठ्या व्यासपीठावर तिची निवड झाल्याने संपूर्ण तालुक्यातला झालेला आनंद अवर्णनीय आहे. यापुढेही तालुकावासियांनी तिला प्रोत्साहन व पाठिंबा द्यावा, अशी भूमिका तिचे वडील गौतम पगारे यांनी व्यक्त केली.

आम्रपाली सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने तिला उभारी देत अनेक दानशुरांनी मदतीचा हातदेखील दिला. शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संस्थेचे सरचिटणीस प्रमोददादा पाटील, सरचिटणीस प्रवीणदादा पाटील यांनीही तिला बक्षीस देऊन गौरवले आहे. पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार यांनीही तिचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या आवारात तिच्या प्रवेशाची वार्ता कळताच प्राचार्य शरद ढोमसे यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन करून तिचे कौतुक केले. यावेळी भर सुट्टीतही विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन तिच्यावर फुलांचा वर्षाव करून अभिनंदन केले.

आमच्या विद्यालयातील आम्रपालीने घेतलेली गरूडझेप आम्हा सर्वांसाठी कौतुकास्पद आहे. अल्पवयातही तिने जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले असून ती तरुणाईसाठी रोल मॉडेल ठरली आहे. या स्पर्धेत ती नक्कीच नावलौकिक मिळवेल. तिच्या या उत्तुंग भरारीचा आम्हाला अभिमान आहे, अशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहचिटणीस प्रवीण पाटील यांनी कौतुकाची पावती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या