धुळे dhule प्रतिनिधी
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (Special Inspector General of Police, Nashik Zone) बी. जी.शेखर हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज शिरपूर तालुका व आझाद नगर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करीत आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिरपूर तालुका पोलिसांच्या (Shirpur police) कामगिरीचे विशेष कौतुक (commended) केले. तसेच एनडीपीएस गुन्ह्यांमधील फरार आरोपींचा शोध घ्यावा, अशा सूचनाही केल्या.
आयजी बी. जी.शेखर यांनी आज शिरपूर तालुका पोलीस ठाण्याला भेट देत पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ व अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयजी बी.जी. शेखर यांनी प्रथम शिरपूर तालुका पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच पिस्तूल घेऊन जाणाऱ्या नाशिकच्या महाविद्यालयीन तरुणांना पकडल्याच्या कारवाईचे विशेष कौतुक केले. याबाबत रिवॉर्ड रिपोर्ट देखील पाठवण्यास सांगितला.
नाशिकच्या सीपी साहेबांना फोन करून, या महाविद्यालयीन तरुणांना जामीन मिळाल्यानंतर देखील त्यांच्यावर लक्ष ठेवा, अशी सूचना केली. तसेच शिरपूर शहर व शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व तपासांचा आढावा घेतला. शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल एनडीपीएस गुन्ह्यांमधील फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत त्यांना अटक करावी, अशी सूचना केली. तसेच आयजी बी. जी. शेखर यांनी आझाद नगर पोलीस ठाण्याचा देखील आढावा घेतला.