अंजली राजाध्यक्ष
कामरूचा प्रसंग मनात कायम राहील असाच होता. त्या गडबडीत शंभर एक पायर्या चढून वर कामरू मॉनेस्ट्री पाहण्याचे त्राण कोणातच नव्हते. कारण कोणी सांगावे वर चढून उतरेपर्यंत टेम्पो पुढे मागे वहानांची रांग लागल्यास, उंचीवरचे वहातुकीचे प्रश्न वेगळेच. कामरू खेदाने ड्रॉप करावे लागले.
यापुढे नाको येथे आमचा निवास होता. त्या रस्त्याची गंमत औरच. हिमाचलमध्ये प्रत्येक ठिकाणी खाई नसली तरी काही बांधकामे कोठेही व कशीही बांधलेली. त्यात येणार्या वाहनांचा विचार फार केलेला दिसला नाही. त्यांची काही कम्पल्शन्स असू शकतात. आमचे नाकोचे हॉटेल चढावावरून खाली नेणारे व तेथे वाहने लावण्यासाठी असाच हेयर पिन यू टर्न त्या अरूंद रस्त्यावरून वाहन खाली आले खरे; परंतु एक वाहन जाईल एवढाच रस्ता व एका बाजूस 25-50 फुटी छोटी दरी वा खड्डाच म्हणा. वाहन फसल्यास काय होईल ही कल्पनाच नको. परत आमचा चालक मनोहरलालचे कौशल्य पणाला लागले व मोकळ्या ठिकाणी तो टेम्पो लागला. आमचा मुक्काम दरमजल असल्याने सामानाची ने-आण प्रत्येक हॉटेलमध्ये करावी लागे. प्रत्येकाची कमीत कमी एक जड बॅग व एक सॅक. परत सर्व प्रवासी साठीच्या आसपास. सामान ने-आण हॉटेल कर्मचारी करत, पण त्यासाठी वाहन हॉटेलजवळ असणे अत्यंत गरजेचे होते. नाकोजवळ वाहन अर्धा-एक तास पुढे-मागे होत होते. बाजूची दरी माझ्या नाकाखाली मला दिसत होती. माझ्या तोंडचे पाणी पळाले; परंतु काही यात्री फक्त हल्लागुल्ला करण्याच्या मनःस्थितीत होते, त्यांना ओरडून मला गप्प करावे लागले. चालक मनोहरलाल मात्र थंड होता. तो कधीच चिडला नाही वा त्याच्या तोंडून कधीही अपशब्द आले नाहीत. त्याच्या नसा पोलादाच्या होत्या का? असतीलही.