भारतीय क्रिकेट संघापुढे दक्षिण आफ्रिका दौर्याचे आव्हान असताना चर्चा सुरू आहे ती विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातल्या वादाची. विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याकडचे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आल्यामुळे विराट आणि रोहित यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले. विराट कोहलीने याबाबत खुलासा केला असला तरी प्रकरणावर अद्याप पडदा पडलेला नाही.
अमृता वाडीकर
संघातल्या दोन प्रमुख खेळाडूंमधले वाद भारतीय क्रिकेट संघाला नवीन नाहीत. संघात सगळे आलबेल असल्याचे सकृतदर्शनी दिसत असले तरी आतमध्ये काहीतरी वेगळेच घडत असते आणि या सगळ्याचे परिणाम संघाच्या कामगिरीवर होतात. सध्या भारतीय संघातल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन आघाडीच्या खेळाडूंमधल्या वादाबद्दल बरेच काही बोलले जात आहे. अर्थात, हा वाद आजचा नाही तर मागील अडीच-तीन वर्षांपासून रोहित आणि विराट यांच्यातून विस्तवही जात नसल्याची चर्चा होती. दक्षिण आफ्रिका दौर्याच्या निमित्ताने हा वाद चिघळल्याचे समोर आले होते. विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माने त्याची जागा घेतली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौर्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही विराटकडून काढून रोहित शर्माला देण्यात आले. दरम्यान, रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आणि तिकडे विराट कोहलीने एकदिवसीय मालिकेतून अंग काढून घेतल्याचे वृत्त आले. त्यामुळे या दोघांना एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळायचे नसल्याच्या चर्चांना उधाण आले. या प्रकरणाबाबत बीसीसीआयच्या सूत्रांकडूनही वेगवेगळी वक्तव्ये समोर येत असल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नेमके काय घडतेय, याचा थांगच लागत नव्हता. महत्त्वाचा दौरा समोर असताना संघातला बेबनाव अशा प्रकारे समोर येणे निश्चितच चांगले लक्षण नव्हते.
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौर्यावर निघण्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. अर्थात, यावेळी रोहित शर्मा प्रकरणाशी संबंधित प्रश्नरूपी बाऊन्सर्सना सामोरे जावे लागणार हे विराट कोहली जाणून होता. त्यावेळी त्याने बरेच खुलासे केले. आपल्यात आणि रोहित शर्मामध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करून आपण दक्षिण आफ्रिका दौर्यातल्या कसोटीसह एकदिवसीय मालिकेसाठीही उपलब्ध असल्याचे स्पष्ट करून सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. रोहितशी आपला कोणताही वाद नसल्याचे सातत्याने सांगून आपण थकलो असल्याचे त्याने म्हटले. तसेच आपल्याला एकदिवसीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद हवे होते आणि तसे आपण बीसीसीआयला कळवल्याचेही त्याने सांगितले. मात्र बीसीसीआयने रोहितकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद दिले. त्यालाही आपला आक्षेप नसल्याचे आणि देशासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. दरम्यान, कोहलीला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हवे असले तरी टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार एक असावा असे वाटल्याने विराटला कर्णधारपदावरून दूर केल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. तरी या प्रकरणाचा धुरळा खर्या अर्थाने खाली बसण्याची चिन्हे नाहीत.
या प्रकरणाशी संबंधित आणखी एक योगायोग म्हणजे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे तर बीसीसीआयचे अध्यक्षपद सौरव गांगुलीकडे आहे. 2005 मध्ये या दोघांनाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले होते! ग्रेग चॅपल यांचा प्रशिक्षकपदाचा काळ म्हणजे भारतीय क्रिकेटमधला काळा अध्याय. याकाळात सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपल यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला होता. गांगुलीकडून असेच अचानक कर्णधारपद काढून राहुल द्रविडकडे सोपवण्यात आले होते. हा अत्यंत नाजूक असा प्रसंग द्रविडने संयमाने तसेच समजूतदारपणे हाताळला होता. आज त्याच्यावर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे आणि संघातल्या दोन दादा खेळाडूंना सांभाळून घेऊन संघाचे हित जोपासण्याचे खडतर आव्हानही आहे. गांगुली आणि द्रविड या दोघांनी मिळून अकारण वाढत असलेला वाद मिटवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्थात, बीसीसीआयचे अध्यक्ष या नात्याने सौरव गांगुलीने या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी वेळीच पुढाकार घेणे आवश्यक होते. मुळात गांगुली स्वत: या सगळ्यातून गेला आहे. अशा परिस्थितीत एखाद्या खेळाडूची मानसिकता काय असू शकते, याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे विराट कोहलीच्या पाठीवर हात ठेऊन धीर देण्याचे काम नक्कीच करत येऊ शकते. सरतेशेवटी प्रत्येकाला भारतीय क्रिकेट संघाचे हित जोपासावे लागणार आहे. मात्र अशा प्रकरणांमध्ये कडक भूमिका घेऊन खेळाडूंमधले वाद मिटवण्याऐवजी सुरू असणारा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहण्यातच बीसीसीआय धन्यता मानत आली आहे आणि यावेळीही तसेच घडताना दिसले
आणि भारतीय क्रिकेटच्या भवितव्याच्या दृष्टीने हे अजिबात चांगलं नाही. बीसीसीआयने भारतीय क्रिकेटशी संबंधित सर्वच घटकांमधल्या व्यावसायिक संवादावर कधीही भर दिल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे सूत्रांकडून मिळणार्या माहितीवरूनच बरेच तर्क लढवावे लागत आहेत. रोहित शर्मा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौर्यातल्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला. बीसीसीआयनेही हे अधिकृतपणे जाहीर केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळायचे नसल्यामुळे रोहितने दुखापतीचा बनाव रचून मालिकेतून अंग काढून घेतले, असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही. कारण या निर्णयामुळे दुसर्या कोणाचे नाही तर रोहित शर्माचेच नुकसान होणार आहे. इंग्लंड दौर्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे आणि दक्षिण आफ्रिकेतही याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास तो नक्कीच उत्सुक असेल. दक्षिण आफ्रिकेत रोहित शर्माची सरासरी फक्त 15 आहे. हे अपयश धुवून काढण्याची संधीही रोहितला होती. त्यामुळे दुखापतीचा बनाव करून किंवा मुद्दाम दुखापत ओढवून घेऊन रोहित कसोटी मालिकेतून बाहेर पडला, असे म्हणणे शुद्ध मूर्खपणा ठरेल. त्यातच रोहितला कसोटी संघाचे उपकर्णधारपदही मिळाले आहे. भविष्यात त्याला कर्णधारपदही मिळू शकते. त्यामुळे बीसीसीआय तसेच संघ व्यवस्थापनाच्या नजरेत स्वत:ची प्रतिमा अशा पद्धतीने मलिन करणे रोहितला परवडणारे नाही.
दुसरीकडे, एकदिवसीय संघाचे कर्णधारपद अशा पद्धतीने काढून घेण्यात आल्याने कोहली थोडा दुखावला गेला असला तरी दौर्यातून अंग काढून घेणे हा त्यावरील उतारा ठरू शकत नाही. दक्षिण आफ्रिकेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या परदेश दौर्यात संघाला गरज असताना काही कारणांमुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून अंग काढून घेण्याचे काम कोहलीसारखा जबाबदार खेळाडू नक्कीच करणार नाही. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली असली तरी त्याला आयसीसीची कोणतीही महत्त्वाची स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदाच्या टी-20 विश्वचषकात तर भारतीय संघावर साखळीतच बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे कोहलीच्या कर्णधारपदावर टाच येणे अपेक्षित होते. भविष्याच्या दृष्टीने संघाची बांधणी करण्यासाठी नव्या कर्णधाराला संधी देणेही आवश्यक होते. त्यामुळे रोहितसोबत पटत नाही म्हणून एकदिवसीय मालिकेत न खेळण्याच्या कथित निर्णयाला काहीच अर्थ नाही. आता तर त्याने आपण एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असल्याचे सांगूनही टाकले आहे. त्यामुळे तो ही मालिका खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन खेळाडूंमधले वाद किंवा अहंभाव यापेक्षाही भारतीय क्रिकेट मोठे आहे आणि त्याचे हित सर्वात महत्त्वाचे. नेतृत्व कायमस्वरुपी टिकत नाही. ठराविक काळानंतर नेतृत्वबदल करावा लागतो आणि हे प्रत्येक देशाच्या संघात घडत असते. त्यामुळे बीसीसीआयच्या निर्णयामुळे रोहित आणि विराट यांच्यात बिनसल्याच्या बातम्या आहेत की वावड्या, हे कळत नाही. दक्षिण आफ्रिकेत रोहित किंवा विराटचा नाही तर भारताचा संघ खेळणार आहे, हे लक्षात ठेवायला हवे. विजय किंवा पराजय एखाद्या खेळाडूचा नाही तर भारतीय संघाचा होत असतो. त्यामुळे खेळाडू असो किंवा अन्य कोणी, संघहितालाच प्रथम प्राधान्य द्यायला हवे. तसेच रोहित आणि विराट यांच्यात कुठलाही वाद असेल तर सुसंवादाने सुटावा आणि भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी दोघांनी एकत्रितपणे खेळत राहावे हीच अपेक्षा.