मुक्ता पुणतांबेकर
सामाजिक कार्यकर्त्या
ताज्या हल्ल्यांमुळे, घृणास्पद हिंसाचारामुळे पुन्हा एकवार मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र सतत पुरुषी मानसिकता, मुलींचे पेहराव आणि त्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही. आता उपायांचा रोख यापलीकडे जायला हवा. याबाबत समाजाची मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता असली तरी परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत काही स्मार्ट पावले उचलायला हवीत.
सध्याच्या काळात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुसताच बोलबाला करून, चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची नितांत आवश्यकता आहे हे वास्तव असले तरी परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत काय करता येईल याचा आढावा घेणे आवश्यक आहे. हल्ली मुली अधिक सुरक्षित आहेत असे ऐकायला मिळते. विनयभंग, बलात्काराच्या तक्रारी दाखल होण्याचे आणि आरोपीला शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याचेही ऐकायला मिळते. पण मुळातच बलात्काराचे प्रमाण कमी का होत नाही, हा प्रश्न मागे पडत आहे. यामागचे कारण शोधायचा प्रयत्न केला असता गुन्हेगारी मानसिकतेचे विश्लेषण हा मुख्य मुद्दा डावलला जातो असे जाणवते.
आजकाल सर्वत्र इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना चर्चेत आहे. काही काळापूर्वी इंटेलिजन्स म्हणजे केवळ शैक्षणिक बुद्धिमत्ता असे समीकरण होते. चांगले मार्क्स मिळत असतील, स्मरणशक्ती आणि आय.क्यू. चांगला असेल तर ती व्यक्ती यशस्वी होणार असा समज असे. मात्र एखाद्याचा इ.क्यू. म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता किती आहे हे समजायचा काहीच मार्ग नसे. आधुनिक मानशास्त्रानुसार शैक्षणिक बुद्धिमत्ता हे एकमेव कौशल्य अपुरे असल्याचे दिसून येते. आता इमोशनल कोशंट तुमच्याबद्दल बरेच काही सांगतो, हे सर्वांच्या मनावर ठसत आहे. भावनिक बुद्धिमत्तेला अनेक कंगोरे आहेत. रोजच्या आयुष्यातील भावना तुम्हाला नीट समजत आहेत का, त्यांचे अवलोकन करणे जमत आहे का, त्या प्रभावीपणे मांडता येत आहेत का, अशा मुद्यांवर सखोल विचार होणे गरजेचे आहे, असे आधुनिक मानसशास्त्र सांगते. मुख्य म्हणजे तुमच्यामध्ये नकार पचवायची ताकद आहे का, याचे अवलोकन होणे गरजेचे आहे. तसेच एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहण्याची तयारी आहे का, हेही वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे. हल्ली तरुणाईला कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी वाट बघायची नसते. इच्छा झाल्याक्षणी संबंधित गोष्ट हातात हवी असते. नवीन फोनपासून आवडलेल्या मुलीपर्यंत सगळे काही तातडीने हवे असते. त्यामुळे काहीही मिळवण्यासाठी कष्ट करण्याची वृत्तीच नाहीशी झाली आहे. याला इमिजिएट ग्रॅटिफिकेशन ऑफ नीड असे म्हणतात. याचे प्रमाण आजकाल वाढत चालले आहे. व्यसनाधीनतेलाही हाच स्वभावदोष कारणीभूत आहे.
आनंद मिळवण्यासाठीही कोणाला मेहनत घ्यायची नाही हे चित्र सगळीकडेच दिसते. एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर तिने होकारच दिला पाहिजे असा अट्टाहास वाढत चालला आहे. अशावेळी एखाद्या मुलीने नकार दिलाच तर तो पचवणे कठीण होऊन बसते. त्यामुळे इगो दुखावला जातो. यातूनच प्रेम केलेल्या मुलीवर हल्ला करण्याची इच्छा होते. तिला त्रास देणे, पाठलाग करणे, धमक्या देणे अशा प्रकारांना सुरुवात होते. भावनिक बुद्धिमत्तेकडे केलेला कानाडोळा हे यामागचे मुख्य कारण वाटते. दुर्दैवाने आपल्याकडे फक्त अभ्यास करून परीक्षेत पास होण्यावरच भर दिला जातो. पण भावना ओळखता येतात का, हे कोणीच विचारत नाही. तुम्हाला स्ट्रेस आहे का, डिप्रेशन आहे का, लवकर राग येतो का, येत असेल तर रागाचे, तणावाचे व्यवस्थापन करता येते का, त्यासाठी कशी मदत घेता येईल हे कोणीच सांगत नाही. खरे तर पाल्याने एक ठराविक वय ओलांडल्यावर सर्व आई-वडिलांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावर बोलले पाहिजे, असे वाटते. आपण आता मुलांवर हे संस्कार करायला सुरुवात केली तर कुठे आजपासून वीस वर्षांनी मानसिक स्थैर्य लाभण्यासाठी प्रयत्न करणारी पिढी तयार होईल. तोपर्यंत मुलींनीही स्वतःची काळजी कशी घ्यायची हे शिकायला हवे.
मुलीच्या मागे कोयता घेऊन धावणारी मुले एका रात्रीत तशी वागत नाहीत. अनेक दिवस त्यांच्या वागण्यात बदल झालेला असतो. संबंधित मुलाने पहिल्यांदा त्रास देताच, छेड काढताच किंवा धमकी देताच मुलीने लागलीच गवगवा केला पाहिजे. त्यांच्या राग बाहेर पडण्याचे पहिले चिन्ह दिसताक्षणी मुलींनी हालचाल केली पाहिजे. त्यासाठी आधी समोरच्याचा राग आपल्याला धोकादायक ठरू शकतो हे ओळखता आले पाहिजे. त्याविषयी चर्चा झाली पाहिजे. संबंधित मुलाशी चर्चा करून प्रश्न सुटत नसेल तर घरच्यांची मदत घेतली पाहिजे. कोणतीही व्यक्ती अचानक असे पराकोटीचे पाऊल उचलत नाही. घरातल्या सदस्यांना किंवा मित्र-मैत्रिणींना गैरवर्तनाची चिन्हे दिसताच त्यांनी मुलाला समजवायला हवे. कौन्सिलरकडे जाण्यासंदर्भात सुचवायला हवे. मानसिक स्थैर्यासाठी मदत घेणे कमीपणाचे नाही हे पटणारा एक सामाजिक स्तर आहे. पण दुसरीकडे अशी मदत घेणे मूर्खपणाचे आहे असे मानणारी जनता आहे. या दुसर्या स्तरामधील लोकांसाठी इमोशल कोशंट ही संकल्पनाच नवीन असते आणि त्यामुळे या स्तरामधील लोकांकडून अशाप्रकारचे जास्तीत जास्त गुन्हे घडण्याची शक्यता असते. या सामाजिक स्तरातील जनतेला भावनिक बुद्धिमत्तेसारख्या संकल्पना समजावणे हे आजचे मोठे आव्हान आहे. खरे तर याची बीजे लहानपणापासूनच रुजवायला हवीत. हा नक्कीच एका रात्रीत होणारा बदल नाही. त्यासाठी संपूर्ण समाजानेच याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्याला एखाद्या गोष्टीचा नकार मिळणे म्हणजे आपण कुठेतरी कमी पडत आहोत, असा अर्थ घेता कामा नये. काहीवेळा दोन्ही व्यक्ती चांगल्या असूनही जुळत नाही. इतक्या साध्या बाबी केवळ इगोमुळे समजायला अवघड जातात. त्यामुळे लहानपणापासूनच नकार पचवायला शिकवायला हवे. आजकाल अजून एक चित्र डोळ्यासमोर येते. लहान मुले रडत असतील तर त्यांना शांत करायला आई-वडील काय हवे ते देतात. पूर्वी आई-वडिलांचा शब्द खाली पडू दिला जात नव्हता. आजकाल मुलांचा शब्द खाली पडू दिला जात नाही. अशा मुलांना मोठे झाल्यावरही नकार पचवणे अवघड जाते. त्यामुळे मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवण्यापेक्षा जरा वेळ रडू द्यावे. तरच ‘मी म्हणेन ती पूर्वदिशा’ या गैरसमजातून मुले बाहेर पडू लागतील. हा बदल तत्काळ होणार नाही. मात्र तोपर्यंत वैयक्तिक पातळीवर मुली काय करू शकतील याचा शोध घ्यायला हवा.
मध्यंतरी चर्चेत राहिलेल्या कुस्तीपटूंच्या प्रकरणानंतर एक वाक्य सतत ऐकायला मिळत होते, ‘एवढे शारीरिक बल असूनही या कुस्तीपटूंनी विनयभंग का सहन केला?’ याचा विचार करताना ‘मनोबल अधिक आवश्यक की ताकद?’ असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. खरे तर दोन्ही बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, मात्र अशाप्रसंगी मानसिक ताकद महत्त्वाची आहे, असे वाटते. तसेच प्रेमप्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही नकार कसा देता, यालाही महत्त्व असते. समोरच्याला तोडून टाकून, त्याचा अपमान करून नकार देण्याचे टाळायला हवे. अनेकदा समजावून सांगूनही मुले ऐकत नाहीत. अशावेळी धोक्याची पहिली घंटा वाजल्याबरोबर लगेच कोणाला तरी कळवा. गरज पडली तर पोलिसांची, दामिनी पथकासारख्या सेवांची मदत घ्या. सपोर्ट सिस्टिम तयार करा. घरच्यांशी चर्चा करत राहा. विविध ट्रॅकिंग अॅप्सची मदत घ्या. इमर्जन्सी कॉटॅक्टसारख्या फिचर्सचा वापर करा. सध्या तंत्रज्ञान मुलींच्या पाठीशी उभे आहे. त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायला हवा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सतर्क राहा. पंचेंद्रियांसोबतच ‘सिक्स्थ सेन्स’चा वापर करा. आजूबाजूच्या व्यक्तींच्या वागण्याचा रोख ओळखायला शिका. त्याचे सातत्याने विश्लेषण करत राहा. कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींना विश्वासात घ्या. एक दिवस समाजाचे चित्र नक्की बदलेल, पण मुलींनो, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.