औरंगाबाद – aurangabad
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या (corona) सावटाखाली दहीहंडी महोत्सव (Dahi Handi Festival) साधेपणाने साजरा झाला. यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. शुक्रवारी गोपाळकाला होणार असून या वेळी विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुलमंडी, औरंगपुरा, कॅनॉट प्लेस आदी ठिकाणी दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. स्वाभिवान क्रीडा मंडळातर्फे यंदा कॅनॉट प्लेस दहीहंडी फोडणाऱ्या पथकास १ लाख ११ हजार १११ रुपये बक्षीस ठेवण्यात आले असल्याचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पोटे, कार्याध्यक्ष समीर लोखंडे यांनी सांगितले.
गुलमंडी चौकात गोविंदा पथकासाठी प्रथम पारितोषिक आठ थर १ लाख ११ हजार १११ रुपये, द्वितीय पारितोषिक ७ थर ५१ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ६ थर २१ हजार रुपये असेल. महोत्सव संध्याकाळी सुरू होईल. टीव्ही सेंटर चौकात धर्मरक्षक दहीहंडी महोत्सवात यावर्षी १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.
खेळाडू, कुस्तीगीर खेळाडू, पोलिस, पत्रकार यांचा सत्कार करणार आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे तापडिया नाट्यमंदिरासमोर १ लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी फुटणार आहे. कोरोना योद्धाचा सत्कारही केला जाणार आहे. आर. बी. युवा मंच यांच्या वतीने कॅनॉट प्लेस या ठिकाणी ५१ हजार रुपये बक्षिसाच्या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी सुभेदार कुणाल मालुसरे यांची उपस्थिती राहणार आहे.