नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यातील काही भागांत कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरू असतानाच शुक्रवार (दि.२० नोव्हेंबर) रोजी यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान धुळे आणि निफाडमध्ये (Dhule and Niphad) नोंदवले गेले आहे. पहाटेच्या वेळी धुळे परिसरात किमान तापमान ६.३ आणि निफाडमध्ये ६.५ अंश इतकी नोंद झाली आहे. निफाडच्या तापमानात अवघ्या एका दिवसात तब्बल ७.४ अंशांची मोठी घसरण झाल्याने परिसर चांगलाच गारठला आहे. विशेष म्हणजे, थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही निफाड आणि धुळ्याचा पारा खाली घसरल्याचे दिसून येत आहे.
उत्तर भारतातून (North India) वाहत असलेले थंड वाऱ्यांचे प्रवाह आणि बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेले चक्रीवादळ या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील तापमानावर होत आहे. गुरुवारी (दि. १९) निफाडचे किमान तापमान १३.९ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी त्यात ७.४ अंशांची घट होऊन पारा ६.५ अंशांवर पोहोचला. यापूर्वी १५ नोव्हेंबर रोजी नाशिक शहरात (Nashik City) १२.६ अंश, तर महाबळेश्वरमध्ये १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
बाजारपेठेत लगबग, आरोग्यावर परिणाम
अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांना (Citizen) उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. स्वेटर, जॅकेट आणि शाल खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. दुसरीकडे, दिवसा ३३ ते ३४ अंशांपर्यंत जाणारा उकाडा आणि रात्री कडाक्याची थंडी अशा विषम हवामानामुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे.
रब्बीला फायदा, द्राक्षबागांना फटका बसण्याची भीती
वाढलेल्या थंडीचा कांदा, गहू, ज्वारी आणि हरभरा या रब्बी पिकांना चांगला फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, तापमानातील अचानक घसरण आणि दवबिंदूमुळे द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पुढील काही दिवस कोरडे हवामान
राज्यात पुढील काही दिवस पावसाची (Rain) शक्यता नसून बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, चक्रीवादळाच्या दिशेनुसार तापमानातील चढ-उतार आणि पहाटेचा गारठा आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.




