‘ पैशाची जादू लई न्यारी, तान्ह्या पोराला याची हाव; जन्मापासूनी सारी माणसे या पैशाची गुलाम रे’ हे जगदीश खेबुडकर लिखित गाणे. या गाण्यात पैशासाठी माणसे किती हापापलेली असतात याचे चपखल वर्णन त्यांनी केले आहे. त्याचा तंतोतंत अनुभव देणाऱ्या घटना अधूनमधून घडतात. पुण्यात अशी एक घटना उघडकीस आली. २० लाख रुपयांचे ५ कोटी करून देण्याचे आमिष एकाने दुसऱ्याला दाखवले.
२० लाख रुपये पिशवीत बांधून पाण्याच्या टाकीत टाकायला सांगितले. काहीही कष्ट न घेता पैसे पाचपट होण्याच्या आशेने ती व्यक्तीही भुलली. समोरचा सांगेल तसे त्यांनी ऐकले. पैसे तर पाचपट झालेच नाहीत पण ती व्यक्ती वीस लाखांना डुबली. पैसे घेऊन त्या माणसाने पोबारा केला. कधी दामदुप्पट करण्याचे, पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले जाते. अनेक माणसे त्या भूलथापांना बळी पडतात आणि आहेत ते सगळे धन गमावून बसतात. असे का घडते? माणसांच्या अशा वेडेपणाचे समर्थन करताच येणार नाही. तथापि फसणाऱ्या सगळ्याच माणसांना पैशाची हाव असेल का की गरजेपोटी काही माणसे फसत असतील? सामान्य माणसे परिस्थितीने गांजली आहेत.
जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय उपचार, शिक्षण सारेच खर्चिक बनत आहे. करोनाच्या फटक्यातून हजारो माणसे अजूनही सावरलेली नाहीत. अनेक बेरोजगार झाले आहेत. अनेकांची बचत संपुष्टात आली आहे. हातातोंडाशी गाठ पडणे अनेकांसाठी जिकिरीचे बनत आहे. महागाईचा मार आहेच. अनेक वस्तूंच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहेत. रोजच्या जेवणात आवश्यक बनलेली तूरडाळ हे त्याचे नमुनेदार उदाहरण. अनेकांच्या रोजच्या जगण्याचा ताळमेळ बसत नसावा. बदलते हवामान, लहरी पाऊस यामुळे शेती संकटात आहे. त्याचा परिणाम अन्न सुरक्षेवर होणे अपरिहार्य. माणसांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. निराशा माणसांना ग्रासते आहे. आत्महत्यांची टक्केवारी वाढत आहे.
वैद्यकीय उपचार दिवसेंदिवस महागडे होत आहेत. साध्या आजारांचे उपचार देखील आवाक्याबाहेर आहेत. अशा परिस्थितीत सरकारी आरोग्य व्यवस्था आधार वाटणे स्वाभाविक. पण ती अनारोग्याने ग्रस्त असल्याची तक्रार लोक करतात. महाराष्ट्राचा साक्षरता दर चांगला आहे. सरकारी शाळेत शिक्षण मोफत आहे. तथापि उच्च शिक्षण घेणे किती जणांना शक्य होते? अशी माणसांची चहुबाजूने कोंडी झालेली आहे.
आर्थिक अस्थिरतेने माणसांना घेरले आहे. त्यामुळे माणसे भामट्यांच्या नादी लागत असावीत का? अर्थात तरीही भूलथापांना बळी पडून स्वतःची जमा पुंजी घालवणे शहाणपणाचे नाही. कायदेशीर मार्गाने चालणारी कोणतीही वित्तीय संस्था विनासायास पैसे दामदुप्पट करून देत नाही, कारण ते शक्य नाही हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. हजारो माणसे लबाडांच्या फशी पडली आहेत. पडत आहेत. ‘ मागच्याला ठेच, पुढचा शहाणा’ या न्यायाने माणसे घडलेल्या अशा घटनांमधून हिताचे काही शिकतील का?