Saturday, September 28, 2024
Homeजळगावजामनेर पोलीस स्टेशनवर हल्ल्याचा म्होरक्या फरारच

जामनेर पोलीस स्टेशनवर हल्ल्याचा म्होरक्या फरारच

जामनेर । प्रतिनिधी –

- Advertisement -

20 जून रोजी एका जमावाने जामनेर पोलीस स्टेशनवर व पोलिसांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपीची संख्या आता 22 झाली आहे .मात्र या गुन्ह्यातील नंबर एकचा आरोपी शालूसिंग शेवाळे हा जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल ला शिक्षक असून तो या जमावाचा नेता म्हणूनही नेतृत्व करत असल्याची चर्चा आहे. शिक्षक असलेला हा नेता शेवाळे घटनेनंतर फरार असून एलसीबी पथकाच्या हाती तो अद्याप पर्यंत लागलेला नाही. दरम्यान पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची सक्तीच्या रजेवर रवानगी करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्यांच्या जागी विजय शिंदे यांची प्रभारी म्हणून नेमणूक केल्याचे समजते.
या प्रकरणातील काल अटक केलेल्या आरोपींमध्ये उमेश रमेश शेवगे. वाकी खुर्द ,आकाश रघुनाथ सोनवणे हिवरखेडा, दुर्गेश हिरामण ठाकरे हिवरखेडा, मोहन प्रभाकर भिल हिवरखेडा, संजय साहेबराव सोनवणे हिवरखेडा, अशा एकूण पाच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 22 पर्यंत गेली आहे. 20 जूनच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हजार- दीड हजार लोकांच्या जमावाने उग्र रूप धारण करत आंदोलन केले . याच जमावाने लाठ्या काठ्या व दगड धोंड्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. यात आठ-दहा पोलीस गंभीरित्या जखमी झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आतापर्यंत फक्त तीनशे ते चारशे अज्ञात इसमावर गुन्हा नोंदविण्यात आला असून एकूण 22 आरोपी पैकी 18 आरोपींना अटक करण्यात आलीआहे .पहिले तीन आरोपी अजूनही फरार आहे. घटनेला चार दिवस उलटून गेल्यावरही खर्‍या आरोपींचा शोध घेऊन त्यांना मोठ्या प्रमाणावर अटक होणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे नंबर एकचा आरोपी चार दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती मिळत नाही ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.
या प्रकरणाचा तपास एलसीबी कडे देण्यात आला असून जामनेर पोलिसांचे यात काही एक म्हणणे एलसीबीचे अधिकारी ऐकून घेत नाही अशाही तक्रारी काही स्थानिक पोलिसांनी केलेल्या आहेत .या प्रकरणी मोठा राजकीय दबाव येत असल्याचे वृत्त असून या गुन्ह्यातील अनेक मुख्य आरोपी मोकाट फिरत आहेत .त्यामुळे पोलीस स्टेशनची तोडफोड करून व पोलिसांना लाट्या-काठ्याने मारहाण करून आरोपींचे काहीच होत नाही मग सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या