Saturday, November 2, 2024

गोंधळ

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

तुळजापूरची भवानी आई

- Advertisement -

गोंधळाला यावं

कोल्हापूरची अंबाबाई

गोंधळाला यावं

माहूरची रेणुकाआई

गोंधळाला यावं

वणीची सप्तशृंगीआई

गोंधळाला यावं

गोंधळ मांडिला आई

गोंधळाला यावं

हे गोंधळ गीत ऐकतच संजय मुलांना घेऊन गोंधळी लोककलेकडे आला. संजयची बायको सांगू लागली, प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील लोककलेचा एक प्रकार म्हणजे गोंधळ. सर्व देवींच्या पुढे गोंधळ घालण्याची परंपरा आजतागायत चालू आहे. संजय सांगू लागला मुलांनो, शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता. त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवांनी व ऋषींनी ‘आदिमाया’ शक्तीची विविध वाद्यांच्या नादसुरांमध्ये आळवणी केली तो म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून गोंधळाची मोठी परंपरा आहे. मुख्यत्वे ‘तुळजाभवानी’ आणि ‘रेणुकामाता’ या देवींचा गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या संदर्भातही गोंधळ घालण्याची प्रथा सुरू झाली. संजयच्या या माहितीनंतर आई मुलांना सांगू लागली, मुलांनो, आपण येताना ऐकले ते म्हणजे गोंधळी देवीला आवाहन करत होते. म्हणजेच सुरुवातीला सर्व देवी-देवतांना आवाहन, श्री गणेशाला वंदन, आदिशक्ती कुलस्वामिनीला आवाहन, तिचा महिमा गाण्याच्या स्वरुपात सादर करून श्रीकृष्ण, आदिशक्ती देवी यांच्या सामाजिक, आध्यात्मिक किंवा तत्सम कथा सांगितल्या जातात. नंतर जोगवा किंवा पाऊड गायले जाते. भैरवीच्या माध्यमातून समारोपाकडे जाताना शेवटी देवीची आरती करून गोंधळाचा शेवट केला जातो. असा गोंधळीच्या सादरीकरणाचा क्रम. परशुरामांनी गोंधळाची निर्मिती कशी केली हे जसेच्या तसे कवणांमधून ते सांगतात. तसेच उदरनिर्वाहाची तरतूद भवानीमातेने आशीर्वाद दिल्यामुळे कशी झाली यासंबंधीची कथाही ते त्यांच्या कवनातून गातात. संजय म्हणाला, गोंधळी समाज ही लोककला जोपासत आहे. आजही कोणतेही शुभकार्य करताना बहुतेक समाजात गोंधळ घालून कुलदेवतेला आवाहन केले जाते. अंगात झब्बा, धोतर, पायजमा किंवा पायघोळ अंगरखा, मुंडासे, उपरणे तसेच मुख्य गोंधळीच्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरलेला असतो. गळ्यात कवड्यांच्या माळा, देवीची प्रतिमा असा पोशाख तर संबळ, तुणतुणे, टाळ, झांजरी डिमडी हातातील दिवटी हे वाद्य. या समवेत अंबामातेचा जयजयकार करत गोंधळ सादर करणारे गोंधळी संबळाच्या तालावर लोकगीत सादर करताना नृत्यदेखील करत असतात.

महाराष्ट्रातील गोंधळी ‘गोंधळ’ हे पारंपरिक विधी नाट्य सादर करतात. हे लोक विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये दिसून येतात. यांनी एकप्रकारे स्वतंत्र अशी रंगभूमी विकसित करून रंगभूमीवरील रंग आविष्काराला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून दिल्याचे दिसून येते. ‘गोंधळी’ हे देवीचे उपासक असून विधी नाट्यद्वारे मंगलकार्याची सांगता करतात. परंतु ते आपल्या लोककलेतून खालील प्रकारचे गीतही गाताना दिसून येतात.

हात जोडूनी वंदन करतो

अंबाबाई तुला

दिवा लावूनी फुल वहातो

जगन्माते तुला

आदिशक्ती तू धरतीवरची

तूच आदिमाया

तुझ्या कृपेची सदा राहू दे

अम्हावरी छाया

यांच्यातही ‘रेणुराई’ आणि ‘कदमराई’ असे दोन प्रकार दिसून येतात. रेणुराई हे माहूरच्या रेणुकेचे भक्त, ते रेणुकामातेची उपासना करतात. कदमराई हे तुळजापूरच्या भवानीचे भक्त. ते भक्त भवानीदेवी (माते)ची पूजा मांडतात.

लग्नाचे विधी, कुळाचार, मुंज, वास्तुशांती, बारसे, जावळ अशा समारंभांच्या वेळी गोंधळाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. आपल्याला होणार्‍या आनंदात दुसर्‍यांना सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ घातला जातो, या कार्यक्रमात सर्वांना अन्नदानही केले जाते. एक विशेष असे की, गोंधळी महिला असत नाहीत. परंतु या महिलांना देवीची गाणी मात्र येत असतात. गोंधळी चार किंवा आठ अशा संख्येत असतात. यामध्ये एक प्रमुख गोंधळी, इतर त्याचे साथीदार असतात. ज्याप्रमाणे संबळ आणि तुणतुणे या वाद्यांचा वापर केला जातो त्याचप्रमाणे कधी कधी गोंधळी हाच वादकाची भूमिका बजावत असतो, एखादा साथीदार साथ करताना वेगवेगळे वाद्य वापरतो. याच पद्धतीने गोंधळात पुढे जाऊन काही बदल झालेलेदेखील दिसून येतात. अलीकडे बदल झालेल्या पद्धतीनुसार ‘काकड्या गोंधळ व सांबळ्या गोंधळ’ असे दोन प्रकार दिसून येतात. काकड्या गोंधळ कोणतेही लोक करू शकतात, तर सांबळ्या गोंधळ फक्त गोंधळीच करतात. तसेच यामध्ये काही सांकेतिक फरकदेखील दिसून येतात. रेणुराई गोंधळी विधी नाट्याच्या वेळी समोर दिवटी ठेवतो, तर कदमराई गोंधळी हातात जळता पोत घेऊन गाणी म्हणताना दुसर्‍या हाताने संबळ वाजवतात. त्यांचे सादरीकरण फक्त चमत्कारिक नसून ते नाट्यपूर्ण व रंजकही असते.

पूर्वरंग व उत्तररंग अशा दोन विभागात गोंधळ सादर केला जातो. गोंधळ सुरू होण्यापूर्वी पाच उसांची मखर, त्यामध्ये देवीच्या स्वरुपात घट ठेऊन गोंधळ सुरू केला जातो.

गोंधळातील गीतांत देवीची स्तुतिगीते, कृष्ण कथा सांगणार्‍या गौळणी, वीरांचे पराक्रम गाणारे पोवाडे, आध्यात्मिक भेदिक रचना तर ग्रामीण भागातील वास्तवावर उपरोधक भाषेत प्रकाश टाकणारी गीते यामध्ये असतात. याशिवाय कीर्तनकार उत्तररंगाची आख्याने रंगवतात ती तर असतात शिवाय गोंधळाच्या उत्तररंगात आख्यान लावले जाते त्यात अंबरीष राजा, विक्रम राजा, जांभूळ आख्यान, चांगुना आख्यान यांसारखी आख्याने निरूपण, निवेदन, विनोदी बतावणी, गंंमतीशीर संवाद या सर्व माध्यमातून गोंधळी रंगवून रंगवून सांगतो.

मी मिरचीचे भांडण ।

एक रोज खटखटीन जी ॥

मिरची अंगी लईच ताठा ।

म्हणोनिया मी होई तिखटजी ॥

असे विनोदी गीतही सादर केले जात.

महाराष्ट्रातील लोकगीतात ‘गोंधळ’ या लोककलेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. आज अनेक लोककला लोप पावत असताना गोंधळी समाज ‘गोंधळ’ ही कला जपून आहे, थोडक्यात, गोंधळ लोककला आजही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, ही आनंदाची बाब आहे. सर्वसाधारणपणे रात्रीच्या सुमारास सुरू झालेला गोंधळ पहाटेपर्यंत चालतो. भविष्यात तो संपू नये ही देवीचरणी प्रार्थना. संतशिरोमणी तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यासहित सर्व संत-महंतांनीही गोंधळ मांडला आहे.

अनादी निर्गुणी

प्रकटली भवानी ।

मोह महिषासूर मर्दना लागुनी ॥

त्रिविध तापाची करावया झाडणी ।

भक्ता लागोनी पावसी निर्वाणी ॥

आईचा जोगवा, जोगवा मागेन ॥

संत एकनाथ महाराज म्हणतात, जिला आदि (प्रारंभ) नाही अशी निर्गुण भवानी माता प्रकटली आहे. ती मोहरुपी महिषासुराचे मर्दन करणार असून ती भक्तांवर प्रसन्न झाली आहे, अशा आईचा मी जोगवा मागेन (म्हणजे तिच्या कृपेची याचना करेन)

अशा पद्धतीने संजय आणि त्याच्या पत्नीने मुलांना गोंधळ समजावून सांगत पुढील कलाकाराकडे नेले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या