Saturday, November 2, 2024

जागरण

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

महाराष्ट्रातील परंपरागत लोकप्रिय लोककला म्हणजेच ‘जागरण’! जागरणाचा जागर जिथे चालू होता तिथे मुलांना घेऊन संजय आला व मुलांना माहिती देऊ लागला. मुलांनो, विवाहासह अनेक शुभविधींनंतरही रात्रभर जागरण केले जाते. यात विशिष्ट गट रात्रभर देव-देवतांच्या कथा सांगतो. विशेषत: खंडोबारायांचा सन्मान करण्याचा हा विधी आहे. जागरणाचा इतिहास जाणून घेताना खंडोबा पंथात ‘नवस’ हा अतिशय महत्त्वाचा! नवसाच्या बदल्यात देवाची सेवा करण्याचे व्रत घेतात. भक्तांपैकी पुरुष म्हणजे वाघ्या आणि त्यांच्या महिला (मुरळी) यांचा सहभाग असतो. खंडोबाचा सन्मान करण्यासाठी इथे गीते गायली जातात. नृत्यही केले जातात. त्याला ‘जागरण’ म्हणतात. जागरणात त्यांच्या कथाकथन केल्या जातात. देवांना आमंत्रित केले जाते.

- Advertisement -

जेजुरीच्या खंडेराया । जागरणाला या या॥

पालीच्या तुम्ही गणराया । जागरणाला या या ॥

अशा रितीने गाणे म्हटले जाते. भाविक भक्त जागरण विधी मांडतात. मल्हारी मार्तंडांना विनवणी करण्याचे काम भक्तांच्या वतीने वाघ्या-मुरळी करतात. त्यासाठी मल्हारकथा केल्या जातात. त्या पूर्ण झाल्यावर पहाटे आरती करून जागरण पूर्ण केले जाते. रात्रभर होणार्‍या जागरणात कथा, नाट्य, अभिनय सादर करण्याचे काम वाघ्या-मुरळी करतात. वाघ्या-मुरळी हे खंडोबाचे उपासक! जागरण करून खंडोबाचे जीवनचरित्र उलगडून सांगणे हे त्यांचे महत्त्वाचे कार्य! देवाला नवस करणे व तो नवस पूर्ण करण्यासाठी जागरण करणे हा यातला महत्त्वाचा भाग! लोकांच्या शुभकार्यात जागरण करणे आणि भिक्षुकी यावरच आपला उदरनिर्वाह करणे हाच या जीवनाचा प्रवास!

मुरळी म्हटले तर पिवळी साडी नेसून, कपाळावर भंडारा, गळ्यात कवड्यांची माळ, अंबाडा आणि पदराला बांधलेली घंटी वाजवत नाचणे. वाघ्या हा धोतर, सदरा, जॅकेट, गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी, त्यात भंडारा, हातात दिमडी काठी घेऊन भंडारा उधळत आनंददायी वातावरणात गाणे म्हटले जाते.

हब हब हब

त्यावेळी वाघ्या तिला साथ करतो आणि म्हणतो,

सदानंदाचा यळकोट

यळकोट यळकोट जय मल्हार…..

संजय मुलांना सांगत होता… जागरणाची मजाच वेगळी आहे. रात्रभर जागणे याचा शब्दशः अर्थ ‘जागरण’ होतो. घराण्यात एखादा कूळधर्म कुलाचार जो प्रथा परंपरेप्रमाणे घरात चालत आलेला असतो. खंडेरायाच्या कुलाचार कुळाचा उद्धार करण्यासाठी, घरातील लग्न, मुंज, घरभरणीवेळी जागरण केले जाते.

महाराष्ट्रातील एक समृद्ध लोककला म्हणून जागरणाकडे पाहिले जाते. वाघ्या-मुरळीच्या साथीने घरासमोरील अंगणात जागरण पार पाडतात. जागरण आणि गोंधळ यात बर्‍यापैकी साम्य आहे. अंगणात मध्यभागी पाट, त्यावर स्वच्छ वस्त्र, वस्त्रावर अष्टदल काढून धान्याची रास ठेवून त्यावर कलश आणि नारळ ठेवला जातो. कलशाजवळ विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून खंडोबाचे टाक किंवा मूर्ती ठेवली जाते. पाटाभोवती उसाच्या पाच तटांचा मखर करून त्यावर फूलमाळ अडकवली जाते. भंडारा लावून जागरणाला सुरुवात होते. पूजा मांडलेल्या जागेला ‘चौक’ म्हणतात. या चौकासमोर वाघ्या-मुरळी नृत्य करत देवाला जागरणाला येण्याचे अवतन देतात. वाघ्याच्या हातात दिमडी आणि मुरळीच्या हातात घाटी (घंटी) असते. सोबतीला असलेल्या लोकांच्या हातात तुणतुणे असते. या वाद्यांबरोबर ते जागरण गीत म्हणतात.

जेजुरी दारी जागरण, गोंधळ करी

सपकाळाच्या तालावरी, चिमणीच्या तालावरी

अन् वाघ्या मुरळी जागरण, गोंधळ करी

जेजुरी दारी जागरण, गोंधळ करी

अशा पद्धतीने जागरण करण्याची प्रथा! संजयची बायको संजयला म्हणाली, जागरणांमधल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची माहितीदेखील मुलांना द्या. संजय सांगू लागला. ते पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. जागरणात पाच पावली, तळी भरणे, कोटम भरणे, देव भेटणे, घटस्थापना, लंगरतोड, ओझे उतरवणे असे धार्मिक विधी केले जातात. तळी भरताना खंडोबाचा जयघोष केला जातो.

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।

फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।

कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥1॥

या शिवस्तुतीने जागरणाला सुरुवात होते. भगवान शंकर कैलास पर्वताचा स्वामी, भाळावर अर्ध्या चंद्र धारण करणारा, मस्तकावर नागराजांच्या फण्याचा मुकुट धारण करत झळकणारा करुणासागर भ्रांतीमुळे उत्पन्न झालेले दुःख हरण करणारा असा तू, तुझ्याखेरीज मला कोण तारू शकेल? असे म्हणत श्री शंकराची आराधना करत जागरणाला सुरुवात हाते. देवतांना आवाहन करत गण-गौळण म्हटली जाते. खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांचे वर्णन करणारे मल्हारी कथन केले जाते. या सर्व पात्रांचे नाट्यरूपी कथा सादरीकरण वाघ्या- मुरळी करतात. जागरणाचे पूर्वरंग व उत्तररंग असे दोन भाग होतात. यात खंडोबाने दैत्यांचा केलेला संहार, खंडोबा-म्हाळसाचे लग्न, खंडोबा-बाणाईचे लग्न, खंडोबा-म्हाळसा-बाणाई यांचे वर्णन केले जाते. सोबत नल-दमयंती, हरिश्चंद्र-तारामती, सत्यवान-सावित्री आदींच्या कथादेखील नाट्यरूपात सादर करतात. देवाचे दैवी रूप व मानवी रूप सादर करून खंडोबाच्या जीवनाचे दर्शन घडते. गायन, नृत्य, वादन सादरीकरणात वाघ्या-मुरळी व यजमान तल्लीन होतात. वाघ्या-मुरळी खंडोबाचे दूत असतात. खंडोबाच्या या उपासकांचा उल्लेख संत साहित्यात आढळतो. रात्र जागवताना कोणाकोणाला जागरणाला बोलतात हे पण पुढील गीतातून दिसून येते.

सदानंदाचा यळकोट

यळकोट यळकोट जय मल्हार

चौक मांडिला, घट भरिला

जागरण पावन व्हावे

अन् जेजुरीच्या मल्हारी देवा

जागरणाला यावे.

वाघ्या मुरळी देवा तुझं

गुणगान गाती

अन् भांडारा खोबर उतरवुनी

धावुनिया जाती

इडा पिडा भक्तांची

घेऊनिया जावे

जेजुरीच्या मल्हारी देवा

जागरणाला यावे.

अशा पद्धतीने जागरण केले जाते. जागरणाची पार्श्वभूमी आणि त्याचे महत्व आज आपल्या लक्षात आले म्हणूनच या अशा कलाकारांचा आपण आदर राखून कलेचाही सन्मान केला पाहिजे. मुले संजयला होकारा देत, यळकोट यळकोट जयमल्हार म्हणत पुढील कलाकाराकडे निघाली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या