Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधवारकरी-दिंडी

वारकरी-दिंडी

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

संजय मुलांना माहिती सांगत असतानाच मुलांचे लक्ष एका वेगळ्याच ठिकाणी गेले.

- Advertisement -

एक मंदिर पंढरपुरी

विठ्ठल रुक्मिणी दोन गाभारी

जय जय विठ्ठल रखुमाई

विठ्ठल विठ्ठल रखुमाई

असा गजर मुलांच्या कानावर पडत होता. तिथे विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, आजूबाजूने काही मंडळी टाळ- मृदुंगाच्या गजरात नृत्यात दंग झालेली होती. हे दृश्य पाहून संजय म्हणाला, महाराष्ट्राचे लाडके दैवत अर्थातच ‘पंढरपूरचा विठोबा’ आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संतांच्या दिंड्या आणि पालख्या निघतात. पादुका हे संतांचे प्रतीक पालखीत घालून गावोगावचे वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात त्यात सहभागी होतात.

वारी करण्याची परंपरा 800 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. परंतु वारी नक्की कधीपासून सुरू झाली याचा स्पष्ट उल्लेख सापडत नाही. वारीमध्ये समावेश होणार्‍या पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली-आळंदी, संत निवृत्तिनाथ – त्र्यंबकेश्वर, संत सोपानदेव-सासवड, संत मुक्ताबाई – एदलाबाद (मुक्ताईनगर), संत विसोबा खेचर-औंढा नागनाथ, संत गोरा कुंभार-तेर, संत चांगदेव- पुणतांबे, संत भानुदास आणि एकनाथ-पैठण, संत तुकाराम महाराज- देहू , जगन्मित्र नागा – परळी वैजनाथ, राघव चैतन्य – आळंद गुजौरीज, केशव चैतन्य – ओतूर, बोधलेबुवा – धामगाव, मुकुंदराय – आंबेजोगाई, जोगा परमानंद – बार्शी, कान्होराज महाराज – केंदूर, संताजी जगनाडे – सुंदुंबरे या पालख्यांचा प्रामुख्याने समावेश असतो. या सर्व पालख्या वाखरीजवळ एकत्रित येतात. विठुरायाच्या नामाचा भक्तिमय जागर होत अवघे आसमंत दुमदुमून जाते.

एक तरी वारी

अनुभवावी घरोघरी

म्हणजेच वारीला जरी जाता आले नाही तरी विठ्ठल नामाचा गजर करून आपण आपल्या घरी वारी अनुभवावी, या अर्थाने अनेक गावागावांत, शाळांमध्ये विठ्ठलाचा गजर करून, वारकरी पोशाख करून, गळ्यामध्ये तुळशीमाळा, डोक्यावरती तुळस, टाळ, मृदुंग या सर्वांचा समावेश करून जवळच्या भागात सर्वजण एकत्र येऊन वारीचा अनुभव घेत असतात.

आषाढी एकादशीच का? याचे कारणही तसेच आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असे चार महिने देव विश्रांती घेतात असा समज आहे. म्हणून हे चार महिने चातुर्मास विविध व्रतवैकल्य करण्याचे मानले जातात आणि म्हणूनच आषाढी, कार्तिकी एकादशी पंढरपूरच्या वारीचे महत्त्व अनन्य साधारण आहे. पालखीबरोबरच्या एका अधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालत राहणारा लोकांचा समूह म्हणजे दिंडी आणि वारी करणारा वारकरी.

स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारी ही वारी स्वावलंबन शिकवते. समाजमनात मिसळायला शिकवते, वृत्तीतील ताठरपणा, अहंकार बाजूला सारून अंतर्मुख व्हायला शिकवते, जीवनातील खरा प्रामाणिकपणा शिकवते, समाजात हरवलेली अनेक जीवनमूल्य मिळवता येतात

आजि म्या देखिली पंढरी

नाचतात वारकरी

असाच अनुभव वारीचा मिळतो.

सर्वात प्रथम संत तुकाराम महाराजांची पालखी देहू या पुण्याजवळच्या गावातून ज्येष्ठ वैद्य सप्तमी या दिवशी निघते, त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून प्रयाण करते. या पालख्यांचे मिलन शिवाजीनगर पुणे येथे होते. पुणे येथे आल्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम पुणे येथे भवानी पेठ येथील विठोबा मंदिरात असतो, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुणे येथील भवानी पेठेतच निवडुंगा विठोबा देवस्थान येथे असतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीचा मार्ग आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपोते, माळशिरस, वेळापूर, वाखरी व शेवटी पंढरपूर असा असतो, तर संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूरमार्गे पंढरपूरला जाते. मार्गात असलेला चार किलोमीटर अंतराचा दिवेघाट हा अत्यंत खडतर प्रवास आहे. दिंडीची सुरुवात संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या जयघोषाने होते. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे अश्व असतो. दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणांहून सहभागी होतात. परंपरागत दिंड्यांना अनुक्रमांक देण्यात येतात. त्यातील अनेक दिंड्या मानाच्या असतात. त्यांचे क्रमांकही ठरलेले असतात. अनेकांच्या हातात टाळ असतात. दिंडीत पारंपरिक अभंग म्हटले जातात. भारूड, गवळण इत्यादी भजन प्रकारांचा समावेश असतो. दिंडीतील वारकरी रोज सुमारे 25 किलोमीटरचे अंतर चालतात. दिंडीचा मुक्काम रस्त्यातील एखाद्या गावात असतो. गावातील कुटुंबे या वारकर्‍यांना चहा-नाश्ता व जेवणाची सोय करतात. वारकर्‍यांची सोय करणे म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची सेवा करणे असा समज आहे. वारीत गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव नसतो. वारी केल्याने अहंकार गळून पडतो, असा समज आहे.

वारीच्या मार्गात मेंढ्यांचे रिंगण, अश्व रिंगण, उभे रिंगण इत्यादी रिंगण प्रकार होतात. हे ठराविक गावातच असतात. अश्व रिंगण इंदापुरात होते. यात आधी झेंडेकर्‍यांचे, तुळशीधारक महिलांचे, विणेकरी व नंतर मानाच्या अश्वांचे रिंगण असा कार्यक्रम साधारणत: असतो.

दास करी दासांचे । उणे न साहे तयाचे । वाढिले ठायीचे भाणे टेकोनिया धावे ॥ ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटी कर । सर्वस्वे उदार । भक्तालादी प्रगटे

वारीचे अजूनही महत्त्व तुम्हाला सांगायचे आहे. तुम्ही असेच लक्षपूर्वक ऐका.

वारीचे दोन प्रकार आहेत

1) आषाढी वारी – सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपल्या गावाहून पंढरपुरात येतात.

2) कार्तिकी वारी – संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून गावाला जातात.

वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखारी येथे रिंगण होते. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर माऊलींचा घोडा धावतो.

धावा-धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की, पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. त्यांचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज की जय

असाच जयघोष करत मुले विठ्ठल माऊलीला नमस्कार करत पुढच्या कलाकाराकडे वळाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या