वैजयंती सिन्नरकर
मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..
जत्रेत फिरता फिरता आता संजय आणि त्याचे कुटुंब नृत्य कलेकडे आले. त्याबाबत संजय सांगू लागला.
शेणखांड गोवराचा राब बाबाने वाजला
काळ्या माताड्या वावरीने जीव भाताचा रुजला
अशा पद्धतीने भात लावणीची कामे आटोपतीला आल्यानंतर लगेचच पावसाचा जोरही कमी होऊ लागतो. वार्याचा एक झोका आणि त्या झोक्यावर डोलणारे हिरवेगार शेत, ते बघता बघताच कोकणातील लोकांचे लक्ष लागते अर्थातच गणरायाच्या आगमनाकडे. कोकणातील गणपती म्हटले की ‘बाल्या नृत्य’ ओघाने येतेच.
गणा धावरे, गणा पावरे
अशी गणरायाला आळवणी केल्यावर नृत्याला सुरुवात होते. नृत्य करणारे हे नृत्याच्या वेगवेगळ्या चाली सादर करत असतात. ढोलकीवाल्यासोबत एकजण चेंगाटी वाजवायला बसलेला असतो. ढोलकी उभी ठेवून त्यावर वादकाकडून वाजवण्यात येणार्या प्रकाराला ‘चेंगाटी’ म्हणतात. या नृत्यातून गण-गवळण, सवाल-जवाब, सामाजिक आणि वास्तवाचे चित्रण करणारी गाणी गायली जातात. ‘बाल्या’ नृत्यालाच ‘जाखडी नृत्य’ किंवा ‘चेऊली नृत्य’ असेही म्हणतात. या लोकनृत्याची परंपरा कोकणवासीय जपत आले असून या नृत्यातील लोकगीतातून भावनांचा आविष्कार, ताल आणि सूर यांचा मिलाफ, अध्यात्मिक मूल्यांची झालर आणि जीवनवृत्तीचे वास्तववादी चित्रण दिसते.
कामाच्या रहाटगाड्यात कानाकोपर्यात पडलेली ढोलकी, पेटी, तबला, टाळ आणि नाचांचे वेश बाहेर काढले जातात आणि गणेशचतुर्थीपासून या नाचावर पाय थिरकू लागतात. ते नृत्य म्हणजे ‘बाल्या नृत्य’. हा बाल्या शब्द कसा आला, त्यासाठी एक व्युत्पत्ती सांगितले जाते. त्यामागे कोकण परिसरातील लोकजीवनाचा संबंध आहे. पूर्वी शेती हा एकमेव उत्पन्नाचा मार्ग असल्याने बरेचसे लोक मुंबई आणि पुणे शहरामध्ये कामासाठी जात होते. या पांढरपेशा लोकांच्या कानात पूर्वी बाळ्या असायच्या. गणेशोत्सव जवळ आला की हे पांढरपेशी शहरात असतानाही आपल्या नृत्याची परंपरा जतन करायचे. त्यांच्या कानातील बाळी या आभूषणावरून त्या नृत्याला ‘बाळ्या नृत्य’ असे म्हटले जाऊ लागले. कोकणातील बोलीभाषेतील ‘ळ’ या वर्णऐवजी ‘ल’ वापरला जातो, त्यामुळे बाळीचे बाली आणि त्यावरून ‘बाल्या’ झाले.
परंतु याला ‘जाखडी नृत्य’ असे का म्हणतात हे पण लक्षात घ्या. ‘जाखडी’ या शब्दाचा विचार करताना खडी याचा अर्थ उभे राहणे असा आहे. हे नृत्य गोलाकार उभे राहून केले जाते. त्यावरून हा शब्दप्रयोग केला जातो. याप्रमाणेच ‘चेऊली नृत्य’ असेही या नृत्याला म्हटले जाते. कोकणात चौल बंदर आहे. त्या बंदरावरून हा शब्दप्रयोग केला जाऊ लागला. बाल्या नृत्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यावर आधारित रचना आढळून येतात, हे यादव गवळी द्वारकेमार्गे कोकणात आल्यावर प्रथम ‘चौल’ किंवा ‘चेऊळ’ या बंदरावर उतरवल्यामुळे त्यांना ‘चेऊळी गवळी’ असे संबोधण्यात येऊ लागले. त्यावरून ते करत असलेल्या नृत्याला ‘चेऊली नृत्य’ असे संबोधले जाऊ लागले. आता तुमच्या लक्षात आले असेल, बाल्या नृत्याची विविध नावे. यानंतर या नृत्याची अधिक माहिती नीट लक्ष देऊन ऐका.
या नृत्याची विशिष्ट परंपरा आहे. या नृत्यांमध्ये ‘शक्तिवाले’ आणि ‘तुरेवाले’ असे दोन पंथ असतात. सर्वप्रथम ‘शक्तिवाले’ नृत्य सादर करतात. त्यानंतर ‘तुरेवाले’ कला सादर करतात. या नृत्यांमध्ये सवाल-जवाबातून सादर केले जाणारे नृत्य हे लक्षवेधक असते. जोडचाल, एक पावली, दोन पावली,तीन पावली अशा चालींवर हे नृत्य सादर करताना लयबद्ध रचना गायल्या जातात. सहाव्या शतकातील कवी नागेश यांनी कलगी या पंथाला सुरुवात केली. त्यांच्या समकालीन असलेले कवी हरिदास यांनी तुरेवाली या पंथाची सुरुवात केली. कलगीवाले हे शक्ती म्हणजे पार्वतीचा मोठेपणा नृत्य आणि गीतातून वर्णन करतात. तुरेवाले हे शिवाचा मोठेपणा सांगतात. कलगीवाल्यांमध्ये ‘कलगी’ या चिन्हाचा तर तुरेवाल्यांमध्ये पंचरंगांचा तुरा लावण्याची पद्धत आहे. दोन पंथांमध्ये काव्यात्मक जुगलबंदी रंगत असते. या नृत्याचे सामने होतात त्याला ‘बारी’ असे बोलले जाते. हे नृत्य नुसते सादर होत नाही तर त्याची पद्धतही विशेष विशिष्ट असते. ढोलकीवादक, गायक आणि कोरस देणारे सर्वजण मध्यभागी बसतात. त्यांच्या सोबतीला नृत्य करणारे कलाकार हे गोलाकार उभे राहतात. त्यांनी भरजरी कपडे घालून उजव्या पायात चाळ बांधलेले असतात.
श्रीकृष्णांसारखे बाजुबंद, गळ्यात माळा, डोक्यावर मुकुट अशा पद्धतीने पोशाख करून भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा संदर्भ घेऊन नृत्यांमध्ये गाणी सादर केली जातात. सवाल- जबाबाबरोबरच गोफ नृत्य हे प्रमुख आकर्षण असते. हातात गोफ घेऊन नृत्य करत गोफ विणला जातो आणि तो सोडवण्यात येतो. गोफ विणण्यासाठी विविध रंगांच्या साड्या किंवा कापडांचा वापर केला जातो. मध्यभागी खांब असतो, त्याला गोफ बांधला जातो. त्याची टोके अधांतरीत सोडलेली असतात. नृत्य सुरू झाल्यावर नृत्य करणारे हे विशिष्ट पद्धतीने फेरा मारत गुंफण करतात. त्यामध्ये नृत्य करणार्यांचा एकसूत्रीपणा महत्त्वाचा असतो. या नृत्यांमध्ये सादर होणारी गाणी ही प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण यांच्या लीलांवर आधारित असतात .
भगवान श्रीकृष्ण बाललीलांवरही बाल्या नृत्याच्या वेळी गाणी म्हटली जातात. त्यातून त्यांच्या खोडकरपणाचेही दर्शन घडते. त्यामध्ये बाळकृष्णांचे वेगळे रूप दाखवण्याचा प्रयत्न असतो.
राधा यमुनेतिरी उभी होती काठावर
गेली पेंद्याची नजर हिच्या पिचल्या माठावर
दही दूध लोणी चोरून खाता माठ तिचे फोडले
आता सांगू मी कशी जाणार घरावर
त्या कान्हाची तक्रार करे यशोदेकडे
मथुरेच्या बाजारात निघालेल्या राधेपासून सगळ्या गवळणींची खोड काढणारे बाळकृष्ण त्यांचे बाल सवंगडी पेंद्या यांचे यथार्थ वर्णन या गीतातून दिसून येते. त्यातून भावनांचा आविष्कार झालेला आहे. ताल आणि सूर यांचा मिलाफ यामध्ये दिसतो.
हरी, सुदाम, पेंद्या, बोबडा
गवलनी सांभाल आपला घडा
रातीच्या वेळी घरी हा जातो.. घरी हा जातो
दही दुधाची हा चोरी करितो
ह्याची नजर पडेल भरभरा
या गीतामधून भगवान श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी सुदामा, पेंद्या यांचे वर्णन करण्यात आले आहे. त्यातून प्रखर संवेदना व्यक्त झाली आहे. ‘जीवनातील आदर्शवाद’ या गीतातील शब्दातून अधोरेखित झाला आहे. वास्तववादी जीवनमूल्यांचा शोध हे गीत घेते. या गीताला अध्यात्मिक मूल्यांची झालर आहे. जीवनवृत्तीचे वास्तववादी चित्रण यातून व्यक्त होते .
या जुन्या लोकगीतांच्या जोडीला आता काळानुरूप चित्रपटातील गाण्यांच्या चालींवर गाणी रचली जाऊ लागली आहेत. बाल्या नृत्याची पथके आजही तग धरून आहेत. या नृत्याच्या ‘बार्या’ म्हणजे स्पर्धा भरवल्या जातात. पिढ्यान्पिढ्या ही लोककला कोकणवासीय जतन करत आले आहेत. हा ठेवा जपून ठेवण्यासाठी आता हवाय राजाश्रय..