Saturday, November 23, 2024
Homeअग्रलेखमन समृद्धीही असावी 

मन समृद्धीही असावी 

दिवाळीचा उत्साह भरभरून वाहतोय. गोदेचे काठ शेकडो पणत्यांनी लखलखत आहेत. घरोघरी आज लेकीबाळी माहेरवासाला येतील. लक्ष्मीपूजन देखील लोकांनी भक्तिभावाने साजरे केले. परमेश्वराचे आणि भक्तांचे नातेच मोठे विलक्षण. त्याचे कोडे भल्याभल्याना देखील उलगडत नाही. भक्तांनी मागणे मागायचे आणि ते परमेश्वराने आनंदाने पूर्ण करायचे हाच सिलसिला अनादी काळापासून चालत आला आहे. लक्ष्मीकडेही सर्वांनी सुखसमृध्दीचे मागणे मागितले असणार.

पाऊसपाणी वेळेवर पडू दे, धनधान्य पिकू दे, सर्वांच्या घरी सुखसमृद्धी येऊ दे, संपन्नता पाणी भरू दे थोडक्यात ‘ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् । हीच प्रत्येकाची मनोकामना असणार. ते स्वाभाविक देखील आहे. तथापि पूर्वसुरींनी त्याबरोबरच ‘मी’च्या पलीकडे जाण्याचा देखील उपदेश केला आहे. तो आता सर्वांनी मनावर घ्यायला हवा. स्वतःबरोबरच समाजात सज्जनांची मांदियाळी देखील वाढू दे हे मागणे मागण्याची कधी नव्हे इतकी नितांत गरज आज जाणत्यांना जाणवत आहे. माणसाच्या मूळ स्वभावाचा, ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ विसर पडला असावा का असेच अनुभव सध्या समाज मोठ्या प्रमाणावर घेत आहे. एकमेकांप्रती आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, सहजभावना हे मानवी स्वभावाचे काही मूळ गुणधर्म. माणसाचे मन मुळातच विशाल आहे. त्यामुळे करुणा आणि दया त्याच्या मनात कायमच वसतीला असतात. त्यातून माणसांची मने जोडली जातात. मनात कोणताही भेद नसतो. यामुळे परस्पर वर्तणूक, व्यवहार, सामाजिक वर्तन, माणुसकी याचीच पाठराखण केली जाते. त्यामुळेच कि काय पण वैयक्तिक आणि सामाजिक नातेसंबंधांवर फारसा ताण नसतो. अविश्वास फारसा कोणाच्याच वाट्याला येत नाही. हा गतवैभवाचा धांडोळा नाही की गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे अजिबात नाही. मन भरून टाकणारे असे वातावरण संपले आहे का, तर असेही नाही. तथापि त्याचा विसर काही प्रमाणात पडत चालला असावा का हा चिंतेचा विषय आहे.

- Advertisement -

अन्यथा सामाजिक वातावरण कलुषित का होत चालले असावे? समाजाबरोबरच माणसांची मने देखील का दुभंगायला लागली असावीत? परस्पर विश्वास का कमी होत चालला असावा? सर्व प्रकारची गुन्हेगारी का वाढत चालली असावी. क्रूरता, क्रोध, निगरगट्टता, द्वेष हा माणसाचा मूळ स्वभाव नाहीच. पण तोच वाढीला लागत चालला असावा का? तसे होऊ न देणे माणसाच्याच हातात आहे. बदलत्या काळाबरोबर कुटुंबे, घरेदारे छोटी होणे स्वाभाविक. उदरनिर्वाहाची साधने आणि ठिकाणे यात बदल होणेही अपेक्षित.

तथापि त्याबरोबर माणसाची मनेही छोटी व्हायलाच हवीत का? त्याच्या मूळ स्वभावाचा विसर त्याला पडायलाच हवा का? तसे होणे सर्वार्थाने कोणाच्याच हिताचे नाही. वाढत्या संपन्नतेबरोबर तोही कणाकणाने वाढतच राहावा, याची दिवाळीच्या निमित्ताने फक्त आठवण करून देण्याचा हा प्रयास. तेव्हा धनाच्या संपन्नतेबरोरबच सज्जनांची मांदियाळी जमू दे आणि वाढती राहू दे, समाजात विवेकाची, सौहार्दाची आणि विवेकाची समृद्धी वाढू दे आणि त्या माध्यमांतून समाजाची सज्जनतेच्या संपन्नतेकडे वाटचाल होऊ दे हे देखील मागणे मागायला हवे. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या