Wednesday, December 4, 2024
Homeमुख्य बातम्याभुजबळांच्या पालकमंत्रिपदाला आमदारांचा विरोध

भुजबळांच्या पालकमंत्रिपदाला आमदारांचा विरोध

उद्धव ढगे-पाटील

मुंबई | प्रतिनिधी

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपविण्यास खुद्द नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा विरोध आहे. या विरोधामुळे भुजबळ यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात राहूनही जिल्हा पालकमंत्री पदापासून वंचित राहावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित यांच्या नाराजीनाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ ऑक्टोबरला पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. या यादीत तुलनेने नवख्या असलेल्या संजय बनसोडे, अनिल पाटील यांना पालकमंत्री पदाची लॉटरी लागली. मात्र, ज्येष्ठ आणि अनुभवी भुजबळ यांना पालकमंत्रिपद मिळू शकले नाही.

ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाला त्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असे महायुतीचे सर्वसाधारण धोरण आहे.मात्र, नाशिक जिल्हा या धोरणाला अपवाद केला गेला. नाशिक जिल्ह्यात १५ विधानसभा सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे सर्वाधिक सहा आमदार आहेत. काँग्रेसचे हिरामण खोसकर हे आमचेच असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. त्या खालोखाल भाजपचे पाच आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. जिल्ह्यातील आमदारांचे पक्षनिहाय संख्याबळ पाहता नाशिकचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळायला हवे. परंतु, पक्षाच्या आमदारांचा भुजबळ यांना पालकमंत्री करण्यास विरोध आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये भुजबळ नाशिकचे पालकमंत्री असताना राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांमध्ये नाराजी होती. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भुजबळ आणि शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्यात संघर्ष झाला होता. त्यामुळे आमदारांची नाराजी टाळण्यासाठी भुजबळ यांना नाशिकच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आल्याचे या मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

शिवसेना आणि स्वपक्षीय आमदारांच्या विरोधामुळे छगन भुजबळ यांना गेल्या २३ वर्षात प्रथमच मंत्रिमंडळात असताना पालकमंत्री पदाने हुलकावणी दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात म्हणजे १९९९ ते २००३ या दरम्यान भुजबळ हे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर २००४ ते २०१४ अशी सलग १० वर्ष ते नाशिकचे पालकमंत्री होते. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागले होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भुजबळ यांच्या गळ्यात नाशिकच्या पालकमंत्रिपदाची माळ पडली होती.

दरम्यान, नाशिकप्रमाणे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास शिवसेना आमदारांचा विरोध आहे. शिवाय रायगडमध्ये शिंदे गटाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही, असे या नेत्याने सांगितले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या