Saturday, July 27, 2024
Homeनगरमुळा कारखान्याचा आधुनिक डिस्टीलरी व इथेनॉलचा प्रकल्प वर्षभरात उभा करणार

मुळा कारखान्याचा आधुनिक डिस्टीलरी व इथेनॉलचा प्रकल्प वर्षभरात उभा करणार

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

नवीन तंत्रज्ञानावर आधारीत व प्रदुषण मुक्त आधुनिक डिस्टीलरी व इथेनॉलचा संयुक्त प्रकल्प उभारण्यासाठी मुळा कारखान्याने दिलेल्या प्रस्तावास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतीच मंजुरी दिली असुन हा प्रकल्प वर्षभरात उभारण्यात येईल अशी माहिती मुळा उद्योग समूहाचे प्रमुख राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी दिली.

- Advertisement -

मुळा कारखाना अतिथीगृहात आज दि.2 ऑक्टोबर रोजी दै.सार्वमतला अधिक माहिती देतांना ना.गडाख म्हणाले,या नवीन आधुनिक डिस्टिलरी प्रकल्पाची क्षमता प्रतीदिन 45 हजार लिटर अल्कोहोल बनविण्याची असुन याच प्रकल्पातून तेवढ्याच क्षमतेने इथेनॉलचेही उत्पादन घेता येणार आहे. जुन्या डिस्टीलरी पासुन राज्यात जे प्रदुषणाचे प्रश्न निर्माण होत होते त्यांना आळा घालण्यासाठी प्रदूषणमुक्त प्रकल्प उभारण्यास केंद्र व राज्य सरकारने प्रोत्साहन दिले असल्याने मुळा कारखान्यानेही त्यांचा प्रस्ताव मागील वर्षी केंद्र शासनाकडे दिला होता. केंद्र शासनाकडून तो मंजूरही झाला. प्रकल्प उभारण्यासाठी आता राज्याच्या सहकार आयुक्तांनीही आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली असल्याने प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मंत्री गडाख यांनी सांगितले.

प्रकल्पाचा खर्च जवळपास 70 कोटीचा असुन 10 टक्के स्वभांडवल, 40 टक्के साखर विकास निधीतून कमी व्याजदराने कर्ज व उर्वरीत 50 टक्के रक्कम वित्तीय संस्थांकडून उपलब्ध केली जाणार आहे. प्रदुषण कायद्याच्या अडचणीमुळे जुन्या डिस्टीलरी नियमाप्रमाणे 270 दिवस चालवायला परवानगी मिळायची, त्या तुलनेत नवीन तंत्रज्ञानावर आधारीत डिस्टीलरी प्रकल्प हा जवळपास वर्षभर चालविता येणार असल्याने तो आर्थिक व तांत्रीकदृष्ट्या सक्षम व लाभदायक ठरणार आहे. शिवाय याच प्रकल्पातून इथेनॉलचेही उत्पादन होणार असल्याने व इथेनॉलचे दर केंद्र सरकारने निश्चित करुन दिल्याने भविष्यात हा प्रकल्प निश्चितच लाभदायक ठरेल असा विश्वासही नामदार गडाख यांनी व्यक्त केला.

गेल्या काही वर्षापासुन साखर कारखानदारीतले अनेक प्रश्न गुंतागुंतीचे बनत चालले असुन साखरेचे दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी मिळत असल्याने डिस्टीलरी सारखे बायप्रोडक्ट प्रकल्प कारखानदारीला पोषक ठरत आले आहेत. साखरेच्या मंदीच्या काळात अशा प्रकल्पांची साखर कारखानदारीला मदतच झाली आहे. मुळा कारखान्यानेही गेल्या 27 वर्षापुर्वीच डिस्टीलरी उभारली. त्याचे कर्जही पहिल्या 5 वर्षातच फेडले. तो प्रकल्प पुढेही लाभदायक ठरला, मात्र तो 27 वर्ष जुना झाल्याने प्रदुषण व गुणवत्तेचे प्रश्न निर्माण झाले होते. कारण डिस्टीलरी प्रकल्पात विशेषत: स्पेंटवॉश हाच प्रदुषणाचा केंद्रबिंदु ठरतो. मात्र नविन प्रकल्पात हाच स्पेंटवॉश घट्ट करुन तो आता नव्याने उभारल्या जाणाऱ्या आधुनिक बॉयलरला जळण म्हणून वापरण्याची सुविधा असल्याने प्रदुषणाला आपोआपच आळा बसणार आहे.

त्यासाठी मागच्या वर्षीच कारखान्याच्या वार्षीक सभेत नविन तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्प उभारण्याचा सभासदांनी निर्णय घेतला होता. आता आणखी वर्षभरातच हा प्रकल्प उभारण्यात येईल व प्रत्यक्ष उत्पादनालाही सुरुवात होईल असे ते म्हणाले. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल वापरण्यास प्रोत्साहन दिले असुन भविष्यात वहातुकीलाही इंधन म्हणून इथेनॉलचा वापर वाढू शकतो. त्यादृष्टीने भविष्यातही हा प्रकल्प लाभदायक ठरु शकतो असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या