Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यागुप्तधनाच्या लालसेपोटी नऊ वर्षीय मुलाची हत्या; पाच संशयित अटकेत

गुप्तधनाच्या लालसेपोटी नऊ वर्षीय मुलाची हत्या; पाच संशयित अटकेत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथून गुप्तधनाच्या लालसेपोटी अपहरण व नंतर हत्या झालेल्या नऊ वर्षीय मुलाच्या खुनातील पाच संशयितांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली. तपास पथकातील चांगली कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना 15 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर खाकुर्डी पोलिसांनी संशयित उमाजी गुलाब मोरे (42, रा. पोहाणे, मांजरी नाला शिवार, ता. मालेगाव) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोली चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार रोमा बापू मोरे (25), रमेश लक्ष्मण सोनवणे, (21), गणेश लक्ष्मण सोनवणे (19), लक्ष्मण नवल सोनवणे (45, सर्व रा. पोहाणे, मांजरी नाला शिवार, ता. मालेगाव) यांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथील नऊ वर्षीय कृष्णा अनिल सोनवणे याचे मागील रविवारी दि. 16 जुलै रोजी शेतात खेळण्यासाठी गेला असताना अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना समोर आली होती, तर 18 जुलै रोजी पोहाणे गावातील मांजरी नाला येथे त्याचे प्रेत पुरल्याचे आढळून आले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गळा कापून जिवे ठार मारणे व पुरावा नष्ट करणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी मालेगावचे पोलीस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, अंकुश नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, विजय वाघ, नितीन सपकाळे, गौतम बोराळे, संतोष हजारे, कदम, हिंमत चव्हाण, बापू महाजन, निशा साळवे, रणजित साळुंके, गजानन कासार, महेंद्र पवार, किरण दुकळे यांच्या पथकाच्या पाच टीम तयार करण्यात आल्या होत्या.

त्यांनी याबाबत तपास सुरू केला असता मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी कृष्णा अनिल सोनवणे यास फूस लावून पळवून नेले व त्याची हत्या केल्याचे समोर आले. या आरोपींनी हा खून गुप्तधनाच्या लालसेपोटी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या