नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही योजना राबवित असून नेवासा तालुक्यासह जिल्हयात यशस्वीपणे राबवताना प्रत्येक कुटुंबाच सर्वेक्षण करुन त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे पथकामार्फत तपासणी करण्यात येईल. या मोहीमेमुळे जिल्हयात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची ओळख होईल व त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना करोना आजारापासून टाळता येण्यास मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे महाराष्ट्र शासनाच्या “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहीमेचा शुभारंभ ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ना.गडाख पुढे म्हणाले, ही मोहीम एक लोक चळवळ असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, प्रशासकीय यंत्रणा व नागरिक यांनी एकत्र येऊन कोरोनाचा आजाराचा विनाश करण्यासाठी या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे.
ना.गडाख यांनी करोना विषयक प्रशासन करीत असलेल्या उपाय योजनांची संबंधितांकडून माहिती जाणून घेतली.तसेच चाचण्यांचीही संख्या वाढवली आहे. नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील करोना बाधीत रुग्णांना वेळेवर सर्व आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. गरजू बाधित रुग्णांना ऑक्सीजनची व्यवस्था व बेडची सुविधा तात्काळ उपलब्ध करुन दिली पाहिजे. करोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन बेड, ऑक्सीजन पुरवठा, व्हेन्टीलेटरची सुविधा उपलब्ध असुन यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी वाढ करण्याची सूचना दिल्या आहेत.
करोनाच्या आजारापासून आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी “माझे कुटुंब ,माझी जबाबदारी” या योजनेत सर्व जनतेने सहभागी होवून 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करावे.
कार्यक्रमास मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे,नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सुर्यवंशी,गटविकास अधिकारी शेखर शेलार यांच्यासह आशा सेवीका,आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी,तलाठी, सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.