Tuesday, November 26, 2024
Homeअग्रलेखसंस्कारीत समाजाची गरज

संस्कारीत समाजाची गरज

अनेक पालक त्यांच्या हयातीतच त्यांची संपत्ती मुलांच्या नावे करतात. असे करताना पालकांनी काळजी घ्यावी. आईवडिलांची म्हातारपणी काळजी घेऊ असे मुलांकडून लेखी घ्यावे. मुलांनी तसे लिहून दिल्यानंतरच संपत्ती त्यांच्या नावे करावी अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. एका आईने तिच्या मुलांना मालमत्ता भेट दिली होती. पण वयाच्या उत्तरार्धात मुले व्यवस्थित देखभाल करत नाहीत. परिणामी त्यांना मालमत्ता भेट दिल्याचा करार रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका त्या आईने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. भारतीय संस्कृतीने ‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात हे विश्वचि माझे घर, असे मूल्य जगाला दिले.  आईवडिलांचा आदर करा, त्यांची प्रेमाने देखभाल करा असा सुविचार आहे. शाळेतही तो शिकवला जातो. तथापि आपल्याच समाजातील कुटुंबांची परस्परप्रेमाची वीण उसवत आहे का? मुले सांभाळ करत नाहीत म्हणून न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ म्हातार्‍या पालकांवर का येते? संपत्तीसाठी जन्मदात्या पालकांचाच जीव मुले कशी घेऊ शकतात? या प्रश्नांची उत्तरे जाणत्यांनी शोधायला हवी. मुंबईतील जुहू परिसरात अशी एक घटना नुकतीच उघडकीस आली. संपत्ती नावावर करत नाही म्हणून मुलाने आईचा जीव घेतला. तंबाखू घेण्यासाठी पैसे दिले नाहीत याचा राग आलेल्या मुलाने आईची हत्या केल्याची घटना जुन्नरमध्ये घडली. मैत्रीणीला खुश करण्यासाठी एका दिवट्याने स्वत:च्याच घरात दरोडा घातला. दरोड्याला विरोध करणार्‍या आईवडिलांना मारहाण केली. अशा घटनांची संख्या आणि तीव्रता वाढत आहे. अशा घटना मुूल्यांची वीण उसवत चालल्याच्या निदर्शक मानायला हव्या. त्याची दखल समाजाने घ्यायला हवी. पूर्वी घराघरात घरगुती शिक्षणाची शाळा भरायची. ज्येष्ठांकडून लहानांवर मूल्यसंस्कार आपसूकच केले जायचे. कारणे कितीही असली तरी बहुसंख्य घरांमधील ती शाळा आता बंद आहे. मूल्यसंस्कारांसाठी पालकांची शाळांवरच भिस्त आहे. शाळांमधून मूल्यशिक्षण दिलेही जाते. परंतू त्यातून शिकणे किती घडते? शाळेतील मूल्यशिक्षणाचे काही तास चांगला माणूस घडवण्याला पुरेसे ठरतात का? मूल्यांचा र्‍हास होत असल्याची तक्रार सगळेच करतात. पण तो र्‍हास थांबवण्याची जबाबदारी कोणाची हा कळीचा मुद्दा आहे. मुले पालकांना त्यांचा आदर्श माननात आणि पालकांच्या वर्तनातून शिकतात असे जाणते म्हणतात. पालक याचा सखोल विचार करतील का? वाचनातूनही माणसाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. तथापि मुलांना वाचनाची सवय लागावी असे किती पालकांना वाटते? किती पालक स्वत: वाचक आहेत? वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी किती शाळांमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात? माध्यमांमध्ये पालक आणि मुलांच्या नातेसंबंधांवर प्रश्न उपस्थित करणार्‍या अशा बातम्या प्रसिद्ध होतात. पण त्याची कारणमीमांसा माध्यमांनीही करायला हवी. लोकशिक्षण ही माध्यमांची देखील जबाबदारी आहे. राजकारणात सध्या द्वेषाची पेरणी झाली आहे. त्याचाही कळतनकळत परिणाम पुढच्या पिढीवर होत असावा का? अतिरेकी व्यक्तिस्वातंत्र्याला भर घालणारी फौज समाजमाध्यमांवरही आहे. त्याचाही हा परिणाम असावा का? कुटुंबसंस्था आणि नातेसंबंधांमधील ताणतणावांचा आणि त्यांच्या विपरित परिणामांचा असा अनेकांगाने विचार केला जायला हवा. समाजाबद्दल कळकळ असणार्‍या सर्वांनीच तो करायला हवा. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या