मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. अजाणत्या वयाच्या एका मुलीवरील निघृण अत्याचाराच्या घटनेने राज्य पुन्हा एकदा हादरले आहे. ही घटना नागपूरमध्ये नुकतीच घडली. गावातील तरुणांच्या टवाळखोरी आणि दहशतीला कंटाळून एका मुलीने आत्महत्या केली. सिन्नर तालुक्यातील शहा गावातील ही घटना. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने लिहून ठेवलेली चिट्ठी पोलिसांना सापडली. त्यात त्रासाचे वर्णन मुलीने केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही मुलगी दहावीत शिकत होती. अशा घटना घडतच असतात.
अशा घटनांची यथावकाश चौकशी होते. पोलीस तपास करतात. अनेक प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झाल्यावर दोषींना न्यायालायने शिक्षा सुनावल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध होते. तसे ते व्हायलाच हवे. तथापि समाजही अशा घटनांचा सखोल विचार कधी करणार? अशा घटना नेहमी अंधारातच घडतात का? दिवसाढवळ्या देखील अत्याचाराच्या किंवा अन्यायाच्या घटना घडतात. राजस्थानच्या उपला कोटा गावात अशी घटना उघडकीस आली. पतीनेच पत्नीला विवस्त्र करून तिची गावात धिंड काढली. गावातील लोक बघत राहिले. यावर कळस म्हणजे काहींनी या घटनेचे त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले. केवळ याच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक घटनांमध्ये समाज त्या त्या वेळी घेत असलेली बघ्याची भूमिका अधिक त्रासदायक नाही का? महिलांसाठी असुरक्षित सामाजिक वातावरण जितके चिंतेचे तितकेच, किंबहुना त्याहूनही कांकणभर अधिकच समाजाची भूमिका अधिक अस्वस्थ करणारी आहे.
तरुण तरुणींची छेड काढतात. अनोळखी व्यक्तीने भर रस्त्यातुन एखाद्या लहानगीला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड होते. माणसे एखाद्या महिलेला मारहाण करतात. अशाप्रसंगी माणसे बघ्याची भूमिका कशी घेऊ शकतात? त्यांना संशय का येत नसावा? अन्यायाचे साक्षीदार बनून सुद्धा ‘मला काय त्याचे’, कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडा, ते पाहून घेतील त्यांचे.. असेच माणसांना वाटत असेल तर समाजाचे बधिरलेपण जास्त धोकादायक नाही का? तथापि ठरवले तर एकटा माणूस देखील अन्यायाला अटकाव करू शकतो हे पुण्यातील लेशपाल जवळगे याने स्वकृतीतून दाखवून दिले. गुंड आपल्याला काही करतील याची भीती अनेकांना वाटू शकते आणि ते स्वाभाविकही मानले जाऊ शकेल. सामान्य माणसे गुंडगिरी, भाईगिरी आणि मारामाऱ्यांना घाबरतात. प्रतिकार करण्याची क्षमता किंवा धाडस सगळेच दाखवू शकत नाहीत हेही स्वीकारार्ह. डोळ्यासमोर घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांकडे माणसे डोळेझाक करतात हेही अन्याय घडण्याचे एक प्रमुख कारण आहे. तथापि सामूहिक धाडस प्रसंगी गुंडांच्या देखील छातीत धडकी भरवू शकते. त्यांना माघार घ्यायला भाग पाडू शकते. फक्त गरज आहे ती, तशी जाणीव रुजण्याची.