उद्या भाऊबीज. या दिवशी दिवाळी संपली असे मानले जात असले तरी फराळाच्या निमित्ताने भेटीगाठींच्या दिवाळीचे कवित्व अजून काही दिवस सुरूच राहील. आप्तेष्टाना हक्काने घरी बोलावून फराळाचा आग्रह केला जाईल. पहाटेचे अभ्यंगस्नान, दिवाळीचे फराळाचे पदार्थ यांची पूर्वसुरींनी आरोग्याशी सांगड घातली आहे. त्यातील मर्म सांगणारे आयुर्वेदाचार्यांचे ब्लॉग्स आणि लेख याकाळात प्रसिद्ध होतात.
काळ बदलत आहे. प्रदूषण कमालीचे वाढत आहे. नवनवे विषाणू संशोधकांसमोर आव्हाने निर्माण करत आहेत. त्यांना मानवी शरीरे सहज बळी पडत आहेत. साथीचे रोग वेगाने हल्ला करत आहेत. वैद्यकीय उपचार अधिकाधिक खर्चिक बनत आहेत. त्याकडे किती सामान्य माणसे दुर्लक्ष करू शकतील? सणाच्या वातावरणात कशाला अशा मुद्दयांची चर्चा असा प्रश्न कदाचीत उपस्थित होऊ शकेल. ते स्वाभाविकचा मानायला हवे. तथापि आगामी काळात ‘आरोग्य धनसंपदा’ ही तितकीच महत्वाची आहे हा संदेश देत दिवाळीचे दिवस समाप्त होत आहेत. सार्वजनिक आरोग्य या मुद्याला धरून जगात विविध प्रकारची सर्वेक्षणे सतत सुरु असतात. त्यांचे निष्कर्ष ‘आरोग्य धनसंपदा’ याचीच आठवण करून देणारे असतात.
राज्यातील अनेक शहरे प्रदूषणच्या विळख्यात आहेत. त्यात अलीकडच्या काळात नाशिकचा देखील समावेश होऊ लागला आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये गोदावरी देखील समाविष्ट आहे. सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा सार्वजनिक आरोग्यावर विपरीत प्रभाव पडतो. महिलांमध्ये ऍनिमिया वाढत आहे. लोकांची प्रतिकार क्षमता कमी होत आहे. आरोग्य राखण्यासाठी ती किती महत्वाची असते याची करोनाने प्रकर्षाने जाणीव करून दिली. त्याकाळात लोकांचे आरोग्यभान वाढल्यासारखे वाटले होते. आहार आणि विहार याबाबतीत जाणिवा वाढल्या होत्या. तो बदल तात्कालिक ठरला असावा का? धनतेरसला सर्वानी आरोग्याच्या देवतेची पूजा केली. तो फक्त उपचार राहू नये अशी जाणत्यांची अपेक्षा आहे. परंपरेबरोबरच वैयक्तिक आरोग्याची पूजा म्हणून त्याकडे पाहिले जाण्याची आवश्यकता आहे. ते राखण्यात आहार, विहार आणि निसर्ग मोलाची भूमिका बजावतो. शरीराची चयापचय क्रिया (मेटॅबॉलिझम) समजावून घेतला जायला हवा. त्यामुळे आहाराविषयीचा किमान विवेक वाढू शकेल.
यात चालत आलेल्या परंपरांचे पालन किती गरजेचे असू शकते याचा आढावा ‘देशदूत’ने ‘परंपरा’ या यंदाच्या डिजिटल दिवाळी अंकात घेतला आहे. खाद्यसंस्कृतीची चर्चा केली आहे. सार्वजनिक आणि वैयक्तिक आरोग्य राखण्यासाठी निसर्ग आणि नदी जपली जायला हवी. त्यासाठीच ‘देशदूत’ ने ‘सफर गोदावरीची’ हा उपक्रम हाती घेतला आहे. गोदावरी प्लास्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी चळवळ उभी करणे हा देखील त्यामागचा एक उद्देश आहे. व्याख्याने, चर्चा आणि शाळाशाळांत जाऊन विद्यार्थ्यांची गप्पा असे टप्पे पार पडत आहे.
माणसांनी त्यांचे आरोग्य जपावे यासाठीच सर्वांचा आटापिटा सुरु असतो. हा जागर सार्वत्रिक व्हायला हवा. कारण निसर्गाचे आरोग्य राखले गेले तर मानवी आरोग्य राखले जायला मदतच होते. तेव्हा या दिवाळीपासून आरोग्याचे व्रत सर्वानी स्वीकारावे. त्यासाठी कटिबद्ध व्हावे आणि आरोग्याचा घेतला वसा टाकू नये हीच अपेक्षा.