Friday, May 3, 2024
HomeUncategorizedगणिताचा पाया पक्का करण्याची गरज

गणिताचा पाया पक्का करण्याची गरज

– अनिल गोरे, समर्थ मराठी संस्था

महाराष्ट्र शासनाने 1972 ते1975 दरम्यान आठवी ते दहावीसाठी तयार केलेला गणिताचा अभ्यासक्रम सर्वोत्तम अभ्यासक्रम ठरावा, असा होता. पण यापैकी जवळजवळ 85 टक्के घटक गेल्या 43 वर्षात काढून टाकले आहेत.

- Advertisement -

गणित हा असा विषय आहे की सातवीचे गणित शिकवणार्‍या शिक्षकाला आणि शिकणार्‍या विद्यार्थ्याला अशा दोघांनाही पहिली ते सहावीचा संपूर्ण अभ्यासक्रम उत्तम अवगत असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने असे शिक्षक आणि विद्यार्थी आत्ताच्या वातावरणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे ‘उद्याचे शिक्षण’ या विषयाचा विचार कराना गणितात हुशार असणारी पिढी घडवण्यासाठी प्रत्येक शाळेतील गणित शिक्षकाला गणितातील प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

गणिताचा पाया शाळेमध्ये पक्का होणे उपयुक्त असते. यासंदर्भात प्राथमिक आणि माध्यमिक दोन्हीचा विचार करता माध्यमिक शालेय अभ्यासक्रम अतिशय दुबळा झाला आहे आणि गणितातील संकल्पना समजावेल असा राहिलेला नाही. 1972 ते1975 दरम्यान महाराष्ट्र शासनाने आठवी ते दहावीसाठी तयार केलेला गणिताचा अभ्यासक्रम जगातील सर्वोत्तम अभ्यासक्रम ठरावा, असा होता. या सर्वोत्तम अभ्यासक्रमापैकी जवळजवळ 85 टक्के घटक अलीकडील काळात म्हणजे गेल्या 43 वर्षात आठवी ते दहावी दरम्यानच्या अभ्यासक्रमातून काढून टाकले आहेत. अभ्यासक्रमातून इतका प्रचंड भाग वगळून टाकण्याची वेळ का आली असेल ?

1972 ते 1975 दरम्यान वरील अभ्यासक्रम लागू केला तेव्हा गणित विषयाचे पूर्वज्ञान असलेले शिक्षक मुळात मोठ्या संख्येने उपलब्ध नव्हते. 1975 पूर्वी गणित विषय सोडून मॅट्रिक होण्याची परवानगी होती. 1972 ते 1975 दरम्यान गणित विषय प्रथमच सक्तीचा झाला. मात्र त्यापूर्वी गणित विषय सक्तीचा नसल्याने गावच्या शाळेत स्वतः मॅट्रिक होताना गणित विषय न घेतलेले शिक्षक फळ्याजवळ गणित शिक्षक म्हणून उभे राहत असत.

त्यानंतर 1975 ते 1985 दरम्यान अशा शिक्षकांनी गणिताचा अभ्यासक्रम फार अवघड आहे अशा तक्रारींचा सपाटा लावला. प्रचंड संख्येने येणार्‍या अशा तक्रारींमुळे अखेर प्रथम 1986 मध्ये सदर अभ्यासक्रमातील बराच भाग वगळला गेला. 1986 नंतर शिकलेल्या शिक्षकांना अशा वागण्यामुळे स्वतः शिकत असताना तुटक तुटक अभ्यासक्रम शिकावा लागला. असा तुटक अभ्यासक्रम शिकलेले विद्यार्थी माध्यमिक शाळेत गणित शिकवण्यासाठी शिक्षक बनले तेव्हा त्यांना मुळात कमी केलेल्या अभ्यासक्रमातील बराच भाग झेपेना.

आणखी काही भाग वगळण्याच्या मागण्या यामुळे वाढू लागल्या. हे दुष्टचक्र जोरात फिरू लागले. या दुष्टचक्रामुळे 1972 ते 1975 दरम्यानच्या अभ्यासक्रमातील 85 टक्के अभ्यासक्रम आजपर्यंत वगळावा लागला आहे. 1972 ते 1975 दरम्यान गणित शिकवण्यासाठी नेमलेल्या शिक्षकांना जर सदर अभ्यासक्रमातील आशयाचे योग्य प्रशिक्षण दिले असते तर हे पुढील दुष्टचक्र थांबले असते.

आजही माध्यमिक स्तरावर गणित विषय शिकवणार्‍या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता सदर विषय शिकविण्यास सुयोग्य नाही. महाराष्ट्रात अनुदानित मराठी माध्यम शाळा, अनुदानित इंग्रजी माध्यम शाळा, विनाअनुदानित विविध माध्यमाच्या शाळा, महाराष्ट्राबाहेरील शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या विविध खाजगी शाळा अशा अनेक प्रकारच्या शाळा आहेत. सध्या सर्वच माध्यमिक शाळांमध्ये बी. एस्सी.

मॅथेमॅटिक्स व बी.एड. हे शिक्षण असलेले शिक्षक जवळजवळ नाहीतच. जिथे आहेत तिथे त्यांचे प्रमाण दोन टक्क्यांहून अधिक नाही. या स्थितीमुळे गणिताच्या वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकातील आशय मुळात गणित शिक्षक म्हणून फळ्याजवळ उभ्या राहणार्‍या शिक्षकांना स्वतःलाच समजलेला नाही. असे शिक्षक मुलांना गणित समाधानकारकरित्या शिकू शकतील अशी कोणतीही शक्यता नाही.

अनुदानित शाळांच्या बाबत निदान सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण मिळते. शिक्षकांना स्वतःला समजत नसलेला भाग शिक्षकाने उत्सुकता दाखवली तर त्याला समजावून देण्याची सोय असते. खाजगी विनाअनुदानित शाळा शिक्षकांना मात्र प्रशिक्षण नाही, शिक्षकांना आशय समजावून देण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण सुरू आहे. गणित हा असा विषय आहे की सातवीचे गणित शिकवणार्‍या शिक्षकाला आणि शिकणार्‍या विद्यार्थ्याला अशा दोघांनाही पहिली ते सहावीचा संपूर्ण अभ्यासक्रम उत्तम अवगत असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने असे शिक्षक आणि विद्यार्थी आत्ताच्या वातावरणात उपलब्ध नाहीत.

नुसत्या तक्रारी सांगून काय उपयोग आहे ? ती परिस्थिती सुधारण्याकरिता उपाय सुचवले पाहिजेत असे अनेक लोक नेहमी सांगतात. मी वरील भीषण परिस्थितीसाठी एक उपाय सुचवत आहे. शिक्षकांचे उत्तम प्रशिक्षण हा तो उपाय आहे. प्रत्येक शाळेतील गणित शिक्षकाला गणितातील असे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम होतात, परंतु या कार्यक्रमांमध्ये गणित कसे शिकवावे किंवा इतिहास कसा शिकवावा किंवा एखादा विषय कसा शिकवावा हे शिकवले जाते. थोडक्यात, कसे शिकवावे याचे प्रशिक्षण उदंड प्रमाणात उपलब्ध आहे.

काय शिकवावे याचे प्रशिक्षण मात्र दुर्दैवाने उपलब्ध नाही. कसे शिकवावे या प्रकारच्या प्रशिक्षणाचे आता शिक्षकांना अजीर्ण झाले आहे. काय शिकवावे याच्या प्रशिक्षणाबाबत आजही शिक्षक भुकेलेले आहेत. प्रत्येक विषयाच्या शिक्षकांना त्या त्या वर्गात शिकविण्याकरिता संबंधित वर्गाच्या पाठ्यपुस्तकांचा स्वतः विद्यार्थी आहोत अशा भावनेतून अभ्यास करणे आवश्यक आहे. या अभ्यासासोबतच पाठ्यपुस्तकात जो काही आशय दिलेला असतो त्याच्याशी जोडलेला पण पुस्तकाबाहेर असलेला व ग्रंथातून उपलब्ध असणारा जास्तीचा आशय शिक्षकाने अभ्यासला पाहिजे.

आता या काळात इतके कष्ट कशाला? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो, परंतु असे कष्ट घेण्याची सवय लागली तर त्याचे अनेक फायदे होतात. पहिला फायदा विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढणे, दुसरा फायदा शिक्षकांचे ज्ञान वाढणे, यासोबत एक तिसरा आणि महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे शिक्षकांना एखादा धडा शिकवण्यास लागणारा वेळ जवळजवळ साठ टक्के इतका कमी होईल.

अनेक शिक्षकांना वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण पाठ्यपुस्तक शिकवणे ही एक मोठी जबाबदारी वाटत असते. मात्र विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त केल्यास शिक्षकांना तेच पुस्तक, तेच धडे आणि तोच आशय अधिक उत्तमरित्या शिकवता येईल, कमी वेळात शिकवता येईल.

उरलेल्या वेळात विविध प्रकारचे प्रकल्प घेता येतील विद्यार्थ्यांचे भले होईल आणि शिक्षकांचे शिकवणे देखील अधिक रंजक होईल. शिक्षकांना मिळणारा आनंद वर्णनाच्या पलीकडील असेल.

‘उद्याचे शिक्षण’ या विषयाचा विचार करताना शिक्षण संस्था, सरकार आणि सरकारतर्फे शिक्षण प्रशिक्षण/शिक्षक प्रशिक्षण देणार्‍या यंत्रणा यांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. शिक्षकाला शाळा भरण्याच्या वेळेपासून शाळा सुटण्याच्या वेळेपर्यंत शाळेत हजर राहणे नियमानुसार भागच आहे.

हा वेळ सत्कारणी लागावा यासाठी आपल्या विषयाचे पाठ्यपुस्तकांच्या पलीकडील ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर कोणत्याही विषयांपेक्षा गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांसाठी हे अधिक आवश्यक आहे. यासंदर्भात कोणत्याही संस्था किंवा यंत्रणा प्रशिक्षण आयोजित करू इच्छित असतील तर अशा संस्थांना मी गणित प्रशिक्षणाचा एक उत्तम आराखडा करून देण्यास तयार आहे.

(लेखक शिक्षक असून त्यांना 33 वर्षे गणित विषय शिकवण्याचा दीर्घ अनुभव आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या