धुळे । प्रतिनिधी Dhule
करोनाचे महासंकट असले तरी त्याला घाबरुन जाण्याचे काही कारण नाही, मुळात आपल्याला कोरोना झाला यामुळे बिघडणारी मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. योग्य उपचाराने कोरोना निश्चित बरा होतो, त्याआधी डोक्यात शिरलेल्या कोरोनाला पिटाळून लावण्याची खरी गरज असल्याचे मत देशदूत संवाद कट्ट्यावर उमटले.
दै.देशदूतच्या (Deshdoot) लाईव्ह संवाद कट्ट्यावर ‘यांना न वाटे मरणाचे भय’ या विषयावर चर्चा करण्यात आली. यासाठी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष तथा महापालिकेतील गटनेते अमीन पटेल, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे सदस्य तथा भाजपाचे शहर उपाध्यक्ष सचिन शेवतकर आणि मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांची उपस्थिती होती. ब्यूरोचिफ अनिल चव्हाण यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
एकीकडे करोना बाधितांशी इतर अनेकजण तोडत असलेले संबंध, कुटुंबातीलच सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी होणारा विरोध आणि दुसरीकडे जात-पात- धर्माच्या भिंती छेदून हिंदू, मुस्लिमांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वखुशीने पुढे येवून काम करणारे तरुण या अनुशंगाने आजची चर्चा रंगली.
नगरसेवक अमीन पटेल म्हणाले मुळात कोरोना हा मोठा आजार नाही. मृत्यू होण्याचे इतरही अनेक कारणे आहेत. समजा कोरोनामुळे मृत्यू झाला तरी मृत व्यक्तीपासून कोरोना होत नाही. कारण शिंकणे, खोकलणे किंवा बोलतांना उडणार्या थूंकीतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शारिरीक अंतर राखण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
मृत व्यक्तीचा श्वासच बंद असल्यामुळे विषाणू बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय मृतदेह हा पूर्णपणे किटमध्ये बंदीस्थ असतो. त्यामुळे अशा मृतदेहाला हात लावल्याने कोरोना होत नाही ही बाब सगळ्यांनी समजून घ्यावी, असे सांगतांनाच स्वतःच्या आई-वडिलांच्या, कुटुंबातील सदस्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नकार देणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे ते म्हणाले. मात्र प्रशासनाने रुग्णांची कोवीड-नॉनकोवीड अशी वर्गवारी करुन शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात कोवीडच्या सामान्य रुग्णांवर उपचार सुरु करावेत. तसेच छोट्या स्वरुपात वैद्यकीय व्यवसाय करणार्या डॉक्टरांना मान्यता द्यावी, असे आवाहनही श्री.पटेल यांनी केले.
शेवतकर यांनी कोरोनाबाबत भिती घालवण्याच्या मुद्यावर भर दिला. कोरोना बाधित झालेल्या रुग्णाची मानसीकता बिघडलेली असते. त्यामुळे त्याची व त्याच्या कुटुंबियांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. योग्य उपचाराने कोरोना निश्चित बरा होतो. मात्र डोक्यात शिरलेला कोरोना मानसिकता खराब करीत असल्यामुळे आधी त्याला डोक्यातून पिटाळून लावा, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी योगा, ध्यान, मानसोपचार यासारखे प्रयोग व्हायला हवेत. शिवाय रुग्णालयात येणार्या प्रत्येक व्यक्तीची आस्थेवाईकपणे विचारपूस होवून कामाची गती वाढायला हवी असेही ते म्हणाले.
करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कार प्रसंगी मनपाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून उपस्थित राहण्याची जबादारी सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांची आहे. आपले अनुभव कथन करतांना ते म्हणाले बर्याचदा नातेवाईकच पुढे येत नाहीत. मात्र नियमानुसार संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आणि अधिकारी असल्याशिवाय अंत्यसंस्कार करता येत नाही.
मनपा प्रशासन लाकडांसह इतर सुविधा मोफत पुरविते आहे. अंत्यसंस्कारासाठी हिंदू-मुस्लीम दोन्ही धर्मीयांसाठी जागा निश्चित झाली आहे. आयुक्त अजीज शेख, महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी स्वतः लक्ष देत आहेत. बाधितांच्या परिसरात सर्व्हेक्षणाचे काम वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून करण्यात येत असून संशयीतांचे नमूनेही घेण्यात येत आहेत. मात्र नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे.
सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा. गर्दी करु नये, असे वारंवार सांगितले जात असूनही नागरिकांकडून अजूनही तेव्हढ्या गांभीर्याने नियमांचे पालन होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे येणारे अनुभव, अंत्यविधीसाठी करावी लागणारी धावपळ, नागरिकांकडून मिळणारे आशिर्वाद याबाबत अनेक किस्सेही या मान्यवरांनी देशदूतच्या दर्शकांशी संवाद साधतांना सांगितले.
ना हिंदू, ना मुस्लिम; मग काय? शहरात हिंदू, मुस्लिम धर्मियांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र एखादा बेवारस व्यक्ती मृत असेल, त्याचा धर्मच माहित नसेल तर त्याचे काय? या प्रश्नावर घडलेला अनुभव विषद करण्यात आला. मालेगावमधील एका बेवारस व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कोणी पुढे येत नसल्याचे बघून प्रशासनाच्या आदेशाने कब्रस्थानमध्ये दफन करण्यात आले. समजा नंतर कोणी नातेवाईक पुढे आले तर प्रेत उकरुन देता येवू शकते, हा यामागील उद्देश होता.
अमीन पटेल