Monday, October 26, 2026
HomeनगरAhilyanagar : 50 टक्के खर्चासह उत्पन्न वाढवले तरच पुढील हप्ता

Ahilyanagar : 50 टक्के खर्चासह उत्पन्न वाढवले तरच पुढील हप्ता

16 व्या वित्त आयोगाच्या अटी शर्ती || प्रशासक असलेल्या ठिकाणाचा निधी रखडणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सरकारच्या 15 व्या वित्त आयोगाची मुदत संपुष्टात आली असून 16 व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी अटी व शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारच्या आदेशानूसार नगर जिल्ह्याला मिळणार्‍या 16 व्या वित्त आयोगाच्या निधीत 10 टक्के वाढ होणार आहे. मात्र, पहिल्या वर्षी मिळालेल्या हप्त्यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च झाला व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नात वाढ झाली, तरच पुढील हप्ता मिळणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना उत्पन्नात वाढ करण्याचे मार्ग शोधावे लागणार आहेत. कामगिरीच्या प्रमाणात या संस्थांना प्रोत्साहनपर अनुदानही मिळणार आहे. दरम्यान, 15 व्या वित्त आयोगाची मुदत 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी होती. आता 16 व्या वित्त आयोगाची मुदत सन 2026-27 ते सन 2030-31 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे. लोकनियुक्त प्रतिनिधी अस्तित्वात असेल, आपला गाव- आपला विकास आराखडा संकेतस्थळावर सादर केलेल्या व लेखापरीक्षण झालेल्या ग्रामपंचायतींना हा निधी वितरित केला जाणार आहे. प्रशासक असणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि 843 ग्रामपंचायत यांचा 16 व्या वित्त आयोगाचा निधी रखडणार आहे. नगर जिल्ह्यात 1 हजार 328 ग्रामपंचायती, 14 पंचायत समिती व एक जिल्हा परिषद आहे. पूर्वीप्रमाणे या ठिकाणी अनुक्रमे 80 टक्के व प्रत्येकी 10 टक्के असा निधी वितरित केला जाणार आहे. मात्र, लोकसंख्येबरोबरच आता क्षेत्रफळाचाही विचार अनुदान वितरणासाठी केला जाणार आहे.

15 वित्त आयोगात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला होता. आता 16 व्या वित्त आयोगात संस्थांच्या स्व: उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेला स्वतःचे उत्पन्नात 2.5 टक्के, पंचायत समितीला कार्यक्षेत्रातील 75 टक्के ग्रामपंचायतींनी व ग्रामपंचायतींनी प्रतिमाणशी 1 हजार 200 रुपये दरमहा उत्पन्न वाढवले तरच पुढील अनुदान मिळणार आहे. पंचायत राज मधील त्रिस्तरीय व्यवस्थेतील या संस्थांचा निधी परस्परांच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहे. अबंधित अनुदानाच्या कामात अधिक लवचिकता व कार्यक्षमतेवर आधारित वितरण केले जाणार आहे. रस्त्यांसाठी केवळ 20 टक्के निधी खर्च करता येणार आहे तर उर्वरित निधी गावाच्या गरजेनुसार ग्रामसभेत निर्णय होऊन खर्च करावा लागणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी असेल तरच निधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेसह 843 ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहे. 16 व्या वित्त आयोगाचा पहिल्या हप्त्याचा 80 टक्के, म्हणजे 199 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत, मात्र त्याचे वितरण झालेले नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे जिल्हा परिषद व 843 ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षीचा निधी मिळणार नाही.

निधी मिळण्यासाठी ग्रामपंचायतींना लेखापरीक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी गेल्या पाच वर्षातील प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींचे जिल्हा परिषदेमध्ये शिबिर आयोजित करून लेखापरीक्षण करून घेतले. जिल्ह्यातील जवळपास 99 टक्के ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले आहे.

आधीचे सव्वा तीनशे कोटी शिल्लक
15 व्या वित्त आयोगाचा गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पंचायत राज व्यवस्थेला 1 हजार 452 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मिळाला. त्यातील 1 हजार 113 कोटी 75 लाखांचा निधी खर्च करण्यात आला. अद्याप 348 कोटी 47 लाख रुपयांचा निधी अखर्चित आहे. हा निधी खर्च करण्याची मुदत येत्या डिसेंबर अखेरीपर्यंत देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : यंदा टंचाई आराखड्यात माणसांसह जनावरांच्या पाण्याचा ताळेबंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात आतापासून निर्णय झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्यावतीने टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा...