पैठण । प्रतिनिधी
यंदा जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने दरवर्षी धरणात येणाऱ्या विदेशी पाहुण्या पक्षांची संख्या रोडावली आहे. दलदलीचा व पाणथळ भाग पाण्याखाली आल्याने दलदलीतील भक्ष्यांवर अवलंबून असलेल्या पक्षांना अन्नाची वाणवा झाल्याने विदेशी पाहुण्या पक्षांनी जायकवाडीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत असून यामुळे पक्षीप्रेमी व पक्षी निरीक्षकांना विदेशी पक्षांच्या आगमनाची काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये येणारे विदेशी पाहूणे पक्ष्यांचे आगमन होत असते. यात विशेषतः फ्लेमिंगो, बार हेडेड गुस, स्पुन बिल, पेंटेड स्टॉर्क, चक्रवाक आदी पक्षांची संख्या अधिक असते. यंदा जायकवाडी धरण क्षमतेने भरले असल्याने विदेशी पाहुण्या पक्षांची संख्या रोडावली असुन यंदा धरणाच्या परिसरात हे पक्षी कमी संख्येने आढळून येत आहेत.
सध्या रिव्हर टर्न व सिगल पक्षांची संख्या जास्त आहे. पैठण शहरातील भाजी मंडई ,छ्त्रपति शिवाजी महाराज पुतळा परिसरातील झाडावर डोमेशियल क्रेन, आयबीएस सारखे पक्षी सायंकाळी वास्तव्य करुन राहात आहेत.
जायकवाडी पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणथळ जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे पक्षांना आवश्यक खाद्य शेवाळ, पाणकीटक, छोटे मासे, माशांची अंडी, शंख आदि कमी प्रमाणात उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षात उशिराने जानेवारी फेब्रुवारी मधे येथे फ्लेमिंगो सारखे पक्षी आढळून येतात. बदलते पर्यावरण आदीचा परदेशी पक्षांवर परिणाम होतो आहे का याचा अभ्यास करण्याची ही गरज आहे असे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.
जायकवाडी पूर्ण भरल्याने पाणथळ जागा कमी झाल्या आहेत, पक्षांना आवश्य खाद्य उपलब्ध नसल्याने परदेशी पक्षी कमी असले तरी यंदा जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसरात स्थानीक पक्षांची संख्या लक्षणीय वाढली आहे. व्हाईट ब्रेस्टेड किंग फिशर, लिटल, कॅटल इग्रेट, वेडा राघू, व्हाईट वेगटेल, सुतार, सन बर्ड, हॉर्न बिल, चिमण्या आदी मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. पैठण वनविभागाने परदेशी पक्ष्याच्या घटत्या संख्ये बाबत उपाययोजना कराव्यात.
प्रा.संतोष गव्हाणे, पक्षी अभ्यासक