Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधलताजींसोबत गाण्याची संधी हे सुंदर स्वप्न!

लताजींसोबत गाण्याची संधी हे सुंदर स्वप्न!

गानसम्राज्ञी लता मंगेेशकर यांच्यासोबत गाण्याचे स्वप्न घेऊन मी मुंबईला आलो. संघर्षाच्या काळात मी त्यांना दुरून बघत होतो, ऐकत होतो. त्यांच्याकडून खूप काही शिकत होतो. सुदैवाने मला लताजींसोबत गाण्याची संधी मिळाली. त्यांचा माझ्यावर विशेष स्नेह राहिला. हाच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार. लतादीदींच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केलेल्या भावनांचा हा गोषवारा.

लता मंगेशकर… साक्षात गानसरस्वती… लताजींना ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. मी शेतकरी कुटुंबातला मुलगा. त्यामुळे मुंबईला येण्याचा, लताजींना भेटण्याचा तसेच त्यांच्यासोबत गाण्याचा मी कधी विचारही केला नव्हता. लताजींसोबत गायला मिळणे हे माझे अहोभाग्य. हे खरेतर एखाद्या स्वप्नासारखेच आहे. या सुंदर स्वप्नातून कधी जागे होऊ नये, असे मला वाटते. लताजींच्या रूपात माझ्या डोक्यावर कायम सरस्वतीचा वरदहस्त राहिला आहे. साक्षात लताजींसोबत गाण्याची संधी मिळावी, असे प्रत्येक गायकाला वाटत असते. माझ्या बाबतीतही तसेच होते. मला ती संधी मिळाली. मी लताजींसोबत असंख्य गाणी म्हटली आणि ती प्रचंड गाजली. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. लताजींसोबत गाताना मी समृद्ध होत गेलो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकता आले. गाण्यातले बारकावे समजले.

लताजींसोबतच्या माझ्या पहिल्या गाण्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मी त्यावेळी अगदीच नवखा होतो. वेगवेगळ्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जात होतो. लताजींना गाताना बघत होतो, ऐकत होतो. त्याकाळात पंचमदांशी माझी थोडीफार ओळख झाली होती. मी त्यांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जात असे. असेच एकदा मला लताजींसोबत चार ओळी गाण्याची संधी देऊन बघूया, असे त्यांच्या मनात आले. त्यांनी मला विचारले. लताजींसोबत गाण्याची संधी मिळणार म्हणून मी भलताच खूश झालो. पण लताजींनी ते गाणे आधीच म्हटले होते. मला फक्त गाण्यातल्या चार ओळी म्हणायच्या होत्या. पंचमदांसह सगळ्यांनीच मला प्रोत्साहन दिले, आत्मविश्वास वाढवला. ‘जीवन के दिन छोटे सही, हम भी बडे दिलवाले…’ हे ते गाणे. मी आत्मविश्वासाने ते म्हटले. सगळ्यांनी माझे कौतुक केले. त्यामुळे माझ्याही अंगावर मूठभर मांस चढले. अर्थात, लताजींना त्यावेळी याची अजिबात कल्पना नव्हती. एका नवख्या गायकाने या ओळी म्हटल्याचे त्यांना नंतर कळले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर एका कार्यक्रमात त्यांना भेटण्याचा योग आला. मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि या गाण्याविषयी सांगितले. त्यांनीही माझे कौतुक केले. माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि भविष्यात असेच चांगले गात राहा, असे म्हणून पुढे गेल्या.

- Advertisement -

यानंतर लताजींसोबत गाण्याची अजून एक संधी चालून आली. महेश भट्ट यांच्या ‘सातवां आसमान’ या चित्रपटाला राम-लक्ष्मण संगीत देत होते. या चित्रपटातले ‘तुम क्या मिले जानेजा, प्यार जिंदगी से हो गया’ हे गाणे मी लताजींसोबत गायले. यावेळीही लताजींनी माझे तोंड भरून कौतुक केले. माझे गाणे उत्तम झाल्याची पावती दिली. यानंतर लताजींसोबत गाण्याची संधी सातत्याने मिळत गेली. ‘कयामत से कयामत तक’ची गाणी तुफान गाजल्यानंतर माझ्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची कवाडे खुली झाली. मला ‘डर’ या चित्रपटासाठी यश चोप्रांनी संधी दिली. मग ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘वीर झारा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये मी लताजींसोबत गाणी म्हटली. लताजींसोबत मिळालेली गाण्याची संधी ही माझ्यावर झालेली परमेश्वराची कृपाच म्हटली पाहिजे. लताजींनी किशोरदा, रफी साहेब, मुकेशजींसोबत असंख्य गाणी म्हटली. ही मंडळी आमच्यासाठी आदर्श आहेतच. मी लताजींसोबत 250 ते 300 चित्रपटांसाठी गायलो.

मला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगदरम्यानचा एक प्रसंग आठवतो. मी रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये पोहोचलो तेव्हा लताजी, यश चोप्रा, त्यांच्या पत्नी, संगीतकार जतीन-ललित तसेच अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. ‘मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना’ या गाण्याचे रेकॉर्डिंग होते. स्टुडिओमध्ये प्रवेश करताच मला लताजींचे दर्शन झाले. मी खाली वाकून नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मीही सगळ्यांसोबत बसलो. तेवढ्यात लताजी म्हणाल्या, ‘उदित, आज मी तुझे गाणे इथे बसून ऐकणार आहे. तू गाणे म्हण’. मी पुरता गोंधळून गेलो. काय बोलावे हे कळेना. तुमच्या स्वरुपात साक्षात सरस्वती इथे विराजमान असताना मी गाणे कसे म्हणू, असे मी त्यांना म्हणालो. पण लताजी काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. काहीही झाले तरी आपण समोर बसून गाणे ऐकणार, असे त्या म्हणाल्या. तेवढ्यात जेवण आल्यामुळे आपण जेवून घेऊ आणि मग रेकॉर्डिंग करू, असे यशजी म्हणाले. मधल्या काळात मला लताजींच्या मिश्किल स्वभावाची प्रचिती आली. त्यांनी आम्हाला अनेक विनोद ऐकवले. आमची अक्षरश: हसून हसून पुरेवाट झाली. लताजी अगदी मोकळ्या स्वभावाच्या. एकदा का तुमच्याशी सूर जुळले की त्या अगदी खुलेपणाने व्यक्त होतात, आपलेपणाने संवाद साधतात. अर्थात, त्या दिवशी लताजींनी माझे गाणे ऐकण्याचा हट्ट काही सोडला नाही. तुझे गाणे ऐकल्याशिवाय मी इथून जाणार नाही, असे म्हणाल्या. माझा नाईलाज झाला. मी प्रयत्न करतो. काही चूकभुल झाली तर मला क्षमा करा आणि डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद द्या, असे मी त्यांना म्हणालो. माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे. तू गाणे म्हण, असे म्हणत त्यांनीही मला प्रोत्साहन दिले आणि मी ‘मेहंदी लगाके रखना’ हे गाणे त्यांना ऐकवले. पुढे मला या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

मी लताजींसोबत बर्‍याच स्टेज शोमध्येही सहभागी झालो. 1992 मध्ये बंगळुरूमध्ये आमचा एक कार्यक़्रम होता. 1 डिसेंबर हा माझा वाढदिवस. योगायोगाने त्याच दिवशी हा कार्यक्रम होता. मदनमोहन यांच्या मुलाने, संजीव कोहली यांनी लताजींना माझ्या वाढदिवसाबद्दल सांगितले. त्या कार्यक्रमाला तीन लाख लोक उपस्थित होते. लताजींनी त्यावेळी मला सोन्याची चेन भेट दिली आणि उदित नारायण ‘पार्श्वगायनाचे राजकुमार’ असल्याचे कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाला जाहीर करायला सांगितले. हा माझ्या आयुष्यातला सर्वात खास आणि अविस्मरणीय असा क्षण होता. लताजींनी नेहमीच आपल्या सहगायकांचे कौतुक केले. मी अनेकदा हा अनुभव घेतला आहे. ‘वीर झारा’मधल्या ‘जानम देख लो मिट गई दुरियां’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी स्वत: मला फोन करून भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. माझ्यासाठी हे सगळे अनपेक्षित होते. खुद्द गानसम्राज्ञीने फोन करून आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्यावेळी त्या अंधेरीतल्या एका स्टुडिओमध्ये आल्या होत्या. पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये त्यांची गाडी माझ्या घराबाहेर उभी होती. त्या माझ्या घरी बराच वेळ थांबल्या. त्यावेळी माझे आई-वडीलही होते. त्यांनाही त्या भेटल्या. खूप गप्पा मारल्या.

लताजींसोबतचे अनेक किस्से आहेत, अनेक प्रसंग आहेत, अनेक आठवणी आहेत. त्यांच्याबद्दल बोलावे तितके कमीच आहे. मला त्यांच्या नावाने दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कारही मिळाला आहे. उदितचा आवाज अस्सल असून मला मनापासून आवडतो, असे त्यांनी अनेकदा सांगितले. साक्षात गानसरस्वतीने केलेले हे कौतुक म्हणजे माझा सर्वोच्च सन्मान आहे. मला यापेक्षा अधिक काहीही नको.

लताजींनी विविध भाषांमध्ये अगणित गाणी म्हटली. त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या सागरातून ठराविक मोती निवडणे खरे तर खूप अवघड आहे. लहान असताना मी ‘मेरा नाम है चमेली, मैं हू मालन अलबेली’ हे गाणे नेहमी म्हणायचो. हे गाणे मला तेव्हा खूप आवडायचे. मोठा होत असताना लताजींची एकापेक्षा एक सुरेल गाणी कानांवर पडत होती. कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, मदनमोहन, आर.डी. बर्मन अशा महनीय संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली अवीट गोडीची गाणी लताजींनी म्हटली. त्यामुळे त्यांची उत्तम गाणी म्हणून ठराविक गाण्यांचा उल्लेख करणे शक्य होणार नाही. लताजींसारख्या महनीय आणि मातृतुल्य व्यक्तीचा सहवास लाभला, त्यांच्या छत्रछायेत वावरण्याची संधी मिळाली, हे माझे सुदैव आणि त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहावा, हीच इच्छा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या