दत्तात्रय सूर्यवंशी
तळोदा । तळोदा
मुंबईतील गुंडांच्या टोळ्यांचे कर्दनकाळ म्हणून परिचित असलेल्या ‘दया नाईक’ यांची मुंंबई क्राईम ब्रँचमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर मुंबई पोलीसमध्ये असतांना दया नाईक व आ.राजेश पाडवी यांचा हस्तांदोलन करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पाडवी यांच्या पोलिस दलातील कामगिरीच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
हस्तांदोलन करतानाचा फोटोमध्ये दिसणारे व्यक्तिमत्व हे मुंबई पोलीस दलातील शार्प शूटर म्हणून नावाजलेले, मुंबई गुन्हेगारी क्षेत्राचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे शार्पशूटर दया नाईक व तत्कालीन शार्पशूटर व विद्यमान आ.राजेश पाडवी आहेत. मुंबई पोलीस दलातील व त्या वेळेच्या मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्राचा थोडाफार अभ्यास असणार्या व्यक्तीलाही ही दोन नाव परिचित असतील. या जोडीने मुंबई पोलीस दलातील मान उंचावून गुन्हेगारी क्षेत्राच्या नरडीवर थयाथया नाचून ज्या पद्धतीने ठोकले ते सगळे किस्से, आठवणी जागृत झाल्या आहेत. त्यांच्या गप्पा ऐकून आपल्या नेतृत्वाचा अभिमान वाटतो. संयम आणि संधीचं सोनं करणारे व्यक्तीमत्व म्हणून आ. राजेश पाडवी यांच्याकडे पाहिले जाते.
आ.राजेश पाडवी, शार्पशूटर दया नाईक यांचा फोटो समाजातील प्रसार माध्यमांवर फिरतो आहे. ते पोलिस विभागातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात आले. मात्र ते पोलिस अधिकारी, शार्पशूटर, एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. तीन वर्षापासून ते आमदार आहेत. त्यांचा व दया नाईक यांचा सोबतचा फोटो पाहुन मित्र परिवारातून अनेकांनी आठवणींना उजाळा दिला आहे.
पोलिस अधिकारी भरतीत मैदानावर ते महाराष्ट्रातून प्रथम आले होते. कमांडो निवडीत ते महाराष्ट्रात प्रथम होते. मुंबईतील सेवेत दोन जणांचे एन्काऊंटर केले आहेत. त्यांची कामाची पद्धत, गावापासून दूर राहूनही इथल्या मातीशी, माणसांशी नाळ जोडून ठेवल्यामुळेच ते आमदार झाले. आमदारकीच्या माध्यमातून जनसेवेचा ध्यास घेऊन, शासनाच्या विविध योजना गाव पाड्यात पोहचविणे, योजना नसेल तेथे स्वखर्चाने जनसामान्यांची कामे करणे, कोरोना काळात हजेरीसाठी बाहेरगावी गेलेल्यांना गावी आणणे, अन्नपाण्याची व्यवस्था करणे,आपत्तीच्या ठिकाणी स्वतः पोहचणे, सरकारी मदत येईल तेव्हा येईल, स्वखर्चाने व्यवस्था उभ्या करणे यामुळे मतदार संघात ते सर्व पक्षीयांचे आवडते तर तरूणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. एक कार्यक्षम आणि कुशल नेतृत्व म्हणून आ.पाडवी यांची सोशल मीडियावर सतत धूम सुरू असते.