भुसावळ-Bhusawal प्रतिनिधी
पावसाळा सुरू झाला आणि काही दिवसांतच शहरातील सर्वच रस्त्यांवर जागोजागी जीव घेणे खड्डे व चिखल दिसू लागला आहे. हे खड्डे त्वरीत बुजवण्याचे काम येथील नगरपालिकेने हाती घेण्याची इच्छा सुद्धा दाखवली नाही. यामुळे लोकांनी, वाहनचालकांनी ‘रस्त्यात खड्डा की खड्डयांत रस्ता’ अशी शेरेबाजी सुरू केली त्यामुळे २४ रोजी शहर शिवसेनेच्या वतीने कागदी नावा खड्डयातील साचलेल्या पाण्यात सोडण्यात आल्या., व्हीडीयोसह, सविस्तर वाचा….
सोशल डिस्टन्सचे पालन करीत पुढे खड्डा आहे, अपघात होऊ शकतो, वाहन सावकाश हाका अश्या सूचना प्रवाश्यांना देत झेंडू बाम व आयोडेक्स वाटप करण्यात आले. हे आंदोलन जिल्हाप्रमुख आ.चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संघटक धिरज पाटील, शहर प्रमुख बबलू बर्हाटे, विभाग प्रमुख निखिल बर्हाटे, दिव्यांग सेना तालुका प्रमुख फिरोज तडवी उपस्थित होते. झेंडू बाम व आयोडेक्सचे वाटप- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या वर्षी दोन वेळेस भुसावळात आले तेव्हा नुसत्या देखाव्यासाठी, नंतर गणेश विसर्जन व दुर्गामाता विसर्जन वेळेस खड्डे दुरुस्त केले गेले. यावर्षी समस्या जास्त वाढली तरी दुरुस्ती नाही.
अपरिहार्यपणे वाहनांतून प्रवास करावा लागणार्या महिला, बालके, वयोवृद्ध महिला-पुरुष, आजारी रुग्ण, तसेच मानेची व कंबरेची व्याधी सहन कराव्या लागणार्यांना यातून प्रवास करताना आणखी हाल सोसावे लागत आहेत. भुसावळच्या सत्ताधार्यांना खड्डे कमी करता आले नाही परंतु वेदना वाढवल्या म्हणून स्वखर्चाने शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी ५०० प्रवाश्यांना झेंडू बाम व आयोडेक्स वाटले. खड्यांना नागरिक वैतागले- सत्ताधार्यांना समाजाचं काहीही सोयरसुतक नाहीय.
‘जनता गेली खड्डयात’ असंच त्यांचं वागणं आहे. कोणता नगरसेवक कोणत्या पक्षाकडून पुढील निवडणुक लढेल यातच त्यांना रस आहे. नगरसेवक कंटाळले आहेत आणि त्यामुळेच आता वार्डात चांगले कार्य करणार्या आजी माजी नगरसेवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पदरमोड सुरू केली आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. गाडी, सायकल किंवा कारऐवजी जणू बैलगाडी चालवतोय असे वाटते. विस्तारलेल्या खड्डयांमुळे वाहनचालकांना आणि प्रवाशांवर ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची वेळ आली असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.