Sunday, September 29, 2024
Homeधुळेसावकाराच्या छळाला कंटाळून व्यावसायीकाचे विषप्राशन ; दोघांवर गुन्हा

सावकाराच्या छळाला कंटाळून व्यावसायीकाचे विषप्राशन ; दोघांवर गुन्हा

धुळे । प्रतिनिधी dhule

व्याजासह पैशासाठी सावकाराकडून होणार्‍या छळाला कंटाळून व्यावसायीकाने विषप्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना छडवेल कोर्डे (ता. साक्री) येथे घडली. याप्रकरणी दोघांवर निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

समाधान हिरामण सोनवणे (वय 31 रा. छडवेल कोर्डे ता. साक्री) असे व्यावसायीकाचे नाव असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची चायनीजची हॉटेल असून त्याने गावातील चंदु विजय बेडसे याच्याकडून 2 लाख रूपये व योगेश बबन चौधरी याच्याकडून दीड लाख रूपये 10 टक्के व्याजाने घेतले होते. दोघांनी वेळोवेळी व्याजासह पैशांची मागणी करीत समाधान यास दमदाटी करीत होते. दि. 8 जुन रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजेदरम्यान समाधान हा त्याच्या हॉटेलवर हजर असतांना बबन चौधरी याने त्यास फोन करून 2 लाख 10 हजार रूपये आज परत दे, असे सांगत मारण्याची धमकी दिली. तर चंदु बेडसे याने हॉटेलवर येवून समाधान याच्याकडून 3 लाख 95 हजार रूपये आजच दे, नाहीतर चेकवर लिहून दे, अशी धमकी दिली. त्यामुळे दोघांच्या कर्जाला कंटाळून समाधान याने राहत्या घरी तननाशक विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून वरील दोघांवर भांदवी कलम 384, 385, 116, 506, 34 सह सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39, 45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या