Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमअवघ्या काही तासांतच हरविलेल्या रोख रक्कमेचा पोलिसांनी घेतला शोध

अवघ्या काही तासांतच हरविलेल्या रोख रक्कमेचा पोलिसांनी घेतला शोध

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अवघ्या दहा महिन्यांच्या कॅन्सरग्रस्त चिमुकलीला घेऊन वैद्यकीय उपचारासाठी नाशिकला आलेल्या वडिलांकडील पैसे व बालिकेच्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे असलेली बॅग रिक्षातच राहिली. पैसे व बॅग हरविल्याचा माहिती मिळताच शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अवघ्या काही तासात प्रवासी रिक्षा शोधून बॅग अन्‌ उपचारासाठीचे पैसे त्या व्यक्तीला परत केले आहेत.

- Advertisement -

नितीन सुरेश जाधव (रा. खर्दे, ता. शिरपूर, जि. धुळे) यांच्या दहा महिन्यांच्या चिमुरडीला कॅन्सर आहे. तिला उपचारासाठी गुरुवारी (ता. १६) सकाळी ते नाशिकला आले. आरटीओ कॉर्नर परिसरातील नामको हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी मुलीच्या सिटीस्कॅनसाठी पुन्हा राजीव गांधी भवन परिसरात यावे लागले. येताना ते रिक्षाने आले. परंतु रिक्षातून उतरताना ते रिक्षातून त्यांची बॅग घेण्यास विसरले. रिक्षाही निघून गेली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

बॅगेत वैद्यकीय उपचाराचे कागदपत्रे आणि उपचारासाठी नातलग-मित्रांकडून घेतलेले उसनवार ३२ हजार ७०० रुपये होते. ही माहिती त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना कळविली असता, त्यांनी तत्काळ गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना दिली.

त्यानुसार गुंडाविरोधी पथकाला कळविण्यात आले. पथकाने नितीन जाधव यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी रिक्षावर ‘जय मल्हार’ नाव होते. तर रिक्षाचा क्रमांक त्यांनी पाहिला नाही. त्यामुळे पथकाने पेठरोड, म्हसरुळ रोडवर त्या रिक्षाचा शोध सुरू केला असता, रिक्षा शिरीष आसाराम वाघस्कर (६२) यांची असल्याची माहिती मिळाली. त्यांचा शोध घेतला असता, रिक्षात बॅग तशीच होती.

ही बॅग जाधव यांना देण्यात आली असता, त्यात पैशांसह सर्व कागदपत्रे मिळून आले. याबाबत जाधव यांनी नाशिक पोलीस आणि रिक्षाचालकाचे आभार मानले. गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी कामगिरी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या