Friday, July 5, 2024
Homeक्राईममुंढेगावात बेकायदा घोडा बैल शर्यत आयोजित करणे भोवले; उपसरपंचासह सदस्यांवर गुन्हा

मुंढेगावात बेकायदा घोडा बैल शर्यत आयोजित करणे भोवले; उपसरपंचासह सदस्यांवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

बेकायदेशिररित्या घोडा बैल शर्यतीचे (Horse Bull Race) आयोजन करुन शर्यत पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तिवर तांगा उलटून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी घोटी पोलिसांनी (Ghoti Police) मुंढेगावच्या उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून प्राणीप्रेमींनी मात्र, पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शर्यतीचे आयोजक व मुंढेगावचे (Mundegaon) उपसरपंच हितेश बुधा हंबीर यांसह ग्रामपंचायत सदस्य विनायक चंद्रकांत गतीर, ऋषिकेश रामलाल गतीर, सुनिल गतीर, वैभव साळवे व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या संदर्भाने पोलीस शिपाई सतिष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढेगाव शिवारातील दारणा नदीपात्राजवळील (Darna River) मैदानात रविवारी(दि. २६) सायंकाळी पाच वाजता संशयित हंबीर व इतरांनी भैरवनाथ यात्रेनिमित्त तांगा व बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. त्यावेळी पोपट कचरु मुंजे (वय ५२, रा. सारुळ, विल्होळी, ता. जि. नाशिक) हे शर्यत पाहण्यासाठी आले होते. मैदान प्रेक्षक व बैलगाड्यांनी भरून गेले होते. याचवेळी शर्यत सुरु असतानाच एक बैलगाडा शर्यतीच्या मैदानातून बाहेर उधळला. त्यानंतर तो थेट बघ्यांच्या व गावकऱ्यांच्या गर्दीत शिरला. त्यामुळे तिघे जण जखमी झाले. धावपळ उडताच बघे सैरावैरा धावले.

त्यानंतर बैलगाडीच्या चाकासह लोखंडी रॉड खाली येऊन पोपट मुंजे जबर जखमी झाल्याचे दिसले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या शर्यतीत एका व्यक्तिचा मृत्यू (Death) झाल्याचे कळताच घोटी पोलीस दाखल झाले. त्यांनी प्रकरणाची माहिती घेतली असता, आयोजित करण्यात आलेली शर्यत बेकायदेशिर असल्याचे आढळले.

यानुसार कारवाई

उपसरपंचासह इतरांनी विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन करु नये असे महाराष्ट्र शासनाचे आदेश असतांना देखील निष्काळजीपणाने व सुरक्षिततेची काळजी न घेता विनापरवाना शर्यतीचे आयोजन केले. ही शर्यत पाहण्यासाठी आलेल्या पोपट मुंजे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यासह शासनाच्या आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन गुन्हा नोंद केला आहे. तपास उपनिरीक्षक प्रविण उदे करत आहेत. संशयितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या