मुंबई | उद्धव ढगे पाटील | Mumbai
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच सर्व राजकीय पक्षांना येत्या ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे (Vidhansabha Election) वेध लागल्याने मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) शक्यता जवळपास मावळली आहे. २०१९ मध्ये चौदाव्या विधानसभा निवडणुकीची घोषणा २१ सप्टेंबर २०१९ रोजी झाली होती. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यातील निवडणुकीची घोषणा पुढील दोन महिन्यात म्हणजे २० ते २२ सप्टेंबर दरम्यान अपेक्षित आहे. निवडणुकीला अवघे दोन महिने बाकी असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा थंडावली आहे.
हे देखील वाचा : विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील; राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान
राज्यातील महाविकास आघडीचे सरकारने (Mahavikas Aaghadi) खाली खेचून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार जुलै २०२२ मध्ये स्थापन झाले. जवळपास ४० दिवस शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेच राज्य सरकारचा कारभार हाकत होते. त्यानंतर ९ ऑगस्ट २०२२ रोजी शिंदे गट आणि भाजपचे प्रत्येकी ९ अशा एकूण १८ आमदारांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली. तेव्हापासून पुढील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे सांगण्यात आले. शिंदे, फडणवीस यांनी दिल्लीत चकरा मारूनही त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी मिळाली नाही.
हे देखील वाचा : नाशिक जिल्ह्यात डेंग्यू रूग्णसंख्या ४७४ वर; पालकमंत्री भुसेंनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश
गेल्या वर्षी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांच्यासह १० आमदारांना (MLA) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार होती. वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा मंत्रिमंडळात समवेश होणार होता. मात्र, पक्षातील फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत राहायचे की अजितदादांना साथ द्यायची याचा निर्णय पाटील यांना लवकर घेता आला नाही. त्यामुळे अजित पवार तसेच त्यांच्या आठ सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर गेले वर्षभर मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय चर्चेत आला. पण त्याला मुहूर्त काही लागला नाही. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांची संख्या २८ इतकी आहे. संदीपान भुमरे हे एकमेव मंत्री लोकसभेवर निवडून गेले आहेत. नियमानुसार राज्य मंत्रिमंडळाचा आकार ४३ सदस्यांचा आहे. त्यामुळे आणखी १५ मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात होऊ शकतो.
हे देखील वाचा : मुंबईतील जमिनीचे अधिकार अदानीला देण्याचे केंद्राचे निर्देश – नाना पटोलेंचा आरोप
लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे सरकारला (Shinde Government) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अधिवेशनाच्या तोंडावर किंवा अधिवेशनाच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता अधिवेशनानंतर महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय मागे पडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्यास फक्त दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आता आमदाराला मंत्रिमंडळ विस्तारात फार काही रस राहिलेला नाही. तसेच सरकारच्या शेवटच्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करून आमदारांची नाराजी ओढून घेण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची तयारी नाही. त्यामुळे महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय बाजूला ठेवल्याचे सांगण्यात येते.
हे देखील वाचा : Uddhav Thackeray : मोदी-शाहांचा मुंबईला ‘अदानी सिटी’ बनवण्याचा डाव; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
गोगावले, शिरसाट यांचा हिरमोड
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता नसल्याने मुखमंत्री शिंदे गटातील अनेक इच्छुकांचा विशेषतः भरत गोगावले,संजय शिरसाट यांचा हिरमोड झाला आहे. हे दोघेही गेली दोन वर्ष मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले होते. गोगावले तर आपण लवकरच रायगडचे पालकमंत्री बनू, असे जाहीरपणे सांगत होते. मात्र, या दोघांच्या पदरी निराशा पडली आहे. तसेच भाजपमधील अनेक इच्छुकांचा स्वप्नभंग झाला आहे.
राज्यमंत्री नसलेले मंत्रिमंडळ
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२२ रोजी अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ९ ऑगस्ट २०२२ रोजी पार पडला. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार यांच्या पक्षाला सरकारमध्ये सामावून घेण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार करावा लागला. दोन्ही वेळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यामुळे राज्याच्या इतिहासात राज्यमंत्र्यांच्या समावेश नसलेले शिंदे यांचे पहिले मंत्रिमंडळ ठरले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा