धुळे । Dhule । प्रतिनिधी
शाळेतील शिक्षकाकडूनच लाच घेणार्या सोनगीर (Songir) येथील एन.जी.बागुल हायस्कूलच्या (N.G. Bagul High School) मुख्याध्यापकासह (principal) सहाय्यक शिक्षकाला (Assistant Teacher) एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. कारणे दाखवा नोटीसीवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी दहा हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती पाच हजारांची लाच (bribe) स्विकारल्यानंतर एसीबीने दोघांना पकडले. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात (field of education) खळबळ उडाली आहे.
धुळे तालुक्यातील सोनगीर येथील एन.बी.बागुल हायस्कुलमध्ये (N.G. Bagul High School) तक्रारदार हे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी यांनी कसुरी केल्याच्या कारणास्तव नोटीस दिली होती. त्याबाबत तक्रारदार हे मुख्याध्यापक माळी यांना भेटण्यास गेले असता त्यांनी शाळेतील सहाय्यक शिक्षक हाफीजखान पठाण यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सहायक शिक्षक पठाण यांची भेट घेतली असता पठाण यांनी तक्रारदार यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसवर कारवाई न करण्यासाठी 10 हजारांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यादरम्यान सहायक शिक्षक पठाण यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 5 हजार रुपये लाचेची मागणी केली.
लाचेच्या मागणीच्या अनुषंगाने काल दि.18 रोजी तक्रारदार यांना पडताळणी कामी मुख्याध्यापक भानुदास माळी यांच्याकडे पाठविले असता त्यांनी देखील कारणे दाखवा नोटीसवर कारवाई न करण्यासाठी लाचेची रक्कम सहायक शिक्षक पठाण यांना देण्यास सांगितले. त्यानंतर आज पथकाने सापळा लावला.
या कारवाईत सहायक शिक्षक हाफीजखान पठाण यांनी तक्रारदाराकडून मुख्याध्यापक माळी यांच्या सांगण्यावरुन 5 हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम त्यांनी सोनगीर येथील पोलीस ठाण्यासमोरील मुंबई-आग्रा महामार्गलगत स्विकारतांना त्यांना आज रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरूध्द सोनगीर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर, संतोष पावरा, भुषण शेटे, संदीप कदम, रोहीणी पवार, रामदास बारेला, गायत्री पाटील, वनश्री बोरसे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.