Sunday, September 8, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर

जिल्ह्यात जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात आता जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होत असून 30 सप्टेंंबरपर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक असून वन विभाग क्षेत्रावरील उपलब्ध चार्‍याचा विचार करता चार महिने हा चारा पुरू शकेल.गरज भासल्यास जिल्हा नियोजनच्या निधीतून पालघर व विक्रमगड येथील डोंगर माथ्यावरील चार्‍याचे भारे खरेदी करण्याचा विचार सुरु आहे.

- Advertisement -

पावसाअभावी अनेक भागात पिके करपली असून चार्‍याची टंचाई भेडसावणार आहे. जिल्ह्यात एकूण 11 लाख 16 हजार 284 जनावरे आहेत. यात आठ लाख 92 हजार 604 मोठी तर दोन लाख 23 हजार 680 लहान जनावरांचा समावेश आहे. या जनावरांसाठी प्रत्येक महिन्याला एक लाख 80 हजार 800 मेट्रिक टन चार्‍याची आवश्यकता भासते. सध्या तरी सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल इतकाच साठा शिल्लक असला तरी सध्या वन विभागासह इतरत्र मिळून आठ लाख 52 हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. पुढील चार महिने तो पशूधनाची गरज भागवू शकेल.

पुढील काळात चारा उपलब्ध होण्यासाठी ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी चारा लागवड करण्याची सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी केली आहे. अशा भागातील शेतकर्यांना दीड हजार रुपयांच्या मर्यादेत बियाणे देऊन चारा लागवड करण्यात येईल. नंतर हा चारा शासन खरेदी करणार आहे. जिल्ह्यातील वन विभागाच्या क्षेत्रावरील 57 हजार 114 मेट्रिक टन चार्यासह अन्य ठिकाणचा चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये म्हणून वाहतुकीवर निर्बंध घातले जाणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

चारा टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पशुपालकांना चारा लागवडीसाठी वैरण पिकांचे बियाणे उपलब्ध करण्यासाठी अर्थात अतिरिक्त चारा उत्पादनासाठी एक कोटींची तरतुदीची मागणी करण्यात आली आहे. यातून तीन लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.

वन विभाग, वन विकास महामंडळ, आदिवासी विकास विभाग यांच्याकडील चारा राखीव केला जाईल. वैरण विकास योजनेसाठी निधी उपलब्ध करणे, कडबाकुट्टी यंत्र खरेदी, मूरघासासाठी पिशव्या, गाळपेरा क्षेत्रात वैरण बियाण्यांची लागवड अशा उपाययोजना सुचविल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर, गरज भासल्यास जिल्हा नियोजनच्या निधीतून पालघर व विक्रमगड येथील डोंगर माथ्यावरील चार्‍याचे भारे खरेदी करण्याचा विचार आहे. पशुसंवर्धन विभागाने राज्यस्तरावर चा़र्‍यासाठी एक लाख 32 हजार किलो बियाण्यांची मागणी नोंदविली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या