दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरु होईल. दुसऱ्या आठवड्यात त्याचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने नुकताच जाहीर केला होता. काल पावसाने नाशिकला चांगलेच झोडपले. पाऊस पडायलाच पाहिजे. राज्यातील धरणे जेमतेम साठ टक्के भरली आहेत. पावसाने ओढ दिल्याने शेतकरीही धास्तावले होते. त्यांनाही या पावसाने हायसे वाटत असावे. पाऊस कमी झाला की महागाई वाढते एवढेच सामान्य माणसांना कळते. तेही पावसाच्या प्रतीक्षेत होते. तथापि या पावसाने त्यांना कात्रीत पकडले आहे. पावसाचा आनंद व्यक्त करावा की नाशिक शहर आणि रस्ते पाण्यात बुडाल्याने संताप व्यक्त करावा अशी त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. पावसाचा अंदाज असतांनाही पावसामुळे निर्माण होऊ शकणाऱ्याआपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास शहर सज्ज नाही हे सिद्ध झाले आहे.
थोडासा जरी पाऊस पडला तर वीज असहकार पुकारते. रस्ते पाण्याखाली जातात. शहराच्या विविध भागात पाणी साचते. गटारी तुंबतात. ढप्यांची झाकणे उघडून दूषित पाणी नदीपात्रात मिसळते. दर पावसाळ्यात मागच्या पानावरून हेच पुढे सुरू राहाते. त्याचे कोणाला काही वाटेनासे झाले आहे. पावसाळ्यात रस्त्यांची कामे करू नयेत असा सर्वसाधारण दंडक आहे. तरीही नाशिकमधील ठिकठिकाणचे रस्ते खणून ठेवले आहेत. ते खड्डे पाण्याने भरले आहेत. रस्त्यांवर चिखल आणि खडी पसरत आहे. वाहने पाण्यात बुडून बंद पडत आहेत. माणसांची तारांबळ आणि गैरसोय होत आहे. हे पाप स्मार्ट सिटी, महानगर पालिका आणि कंत्राटदारांचे मानावे का? दंडक असतांनाही स्मार्ट सिटी रस्ते कसे खणते? वेगवेगळ्या कामांच्या नावाखाली एकच रस्ता वारंवार खणला जातो.
पावसाळापूर्व कामे नेमकी कोणती असतात? ती केली गेल्याचे दरवर्षी जाहीर केले जाते. पण तसा अनुभव जनतेला अभावानेच का येतो? विजेच्या खांबांना वेलींचा विळखा तसाच असतो. रस्ते खणणे सुरूच असते. गटारींची झाकणे फुटतच असतात. झाकणांची पातळी नेहमी रस्त्याच्या वरच आलेली असते. यालाच सरकारी सज्जता म्हणत असावेत का? आपत्ती व्यवस्थापन खातेही असते. ते नेमके कशाचे व्यवस्थापन करते असा प्रश्न लोकांना पडला आहे. त्या खात्याला पाऊस झाल्यानंतरच जाग येत असावी का? सरकारी काम आणि सहा महिने थांब असा अनुभव सामान्य माणसे घाटात. आपत्ती व्यवस्थापन खात्याचाही असाच खाक्या असू शकेल का? तसे असेल तर ती लोकांवरच आपत्ती म्हणावी का? लोकांनी ओरडा केला की रस्ते तात्पुरते बुजवले जातात. म्हणजे काय केले जाते? त्याच रस्त्याची खणलेली खडी परत त्याच रस्त्याच्या खड्यांमध्ये टाकली जाते. त्यावर डांबर ओतले जाते. डांबर आणि पाण्याचे हाडवैर जगजाहीर आहे. त्यामुळे थोडासा जरी पाऊस झाला तरी डांबराने दबलेली खडी रस्त्यावर पसरते. असे झाले की लोकांवर मात्र ‘भीक नको पण कुत्रे आवर’ असे म्हणण्याची वेळ येते. दरवर्षीच्या पावसाळ्यात नेमके तेच ते आणि तेच ते का घडते? त्यामागे काही अर्थकारण असू शकेल का? नेतेमंडळी देखील याचा उल्लेख त्यांच्या सभांमध्ये करतात. तेव्हा टाळ्या आणि शिट्ट्यांनी ती सभा गाजते. तो लोकांचा वैताग असावा का? तसे असेल तर तो कधी संपेल?
हा वैताग कधी संपेल?