Saturday, November 23, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये २९ जुलैला होणारे रस्ता रोको आंदोलन स्थगित

नाशिकमध्ये २९ जुलैला होणारे रस्ता रोको आंदोलन स्थगित

जितूभाई ठक्कर, धनंजय बेळे यांची माहिती





- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेकडे तसेच शहराच्या महत्वाच्या अन्य प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यास सोमवार दि. 29 जुलै रोजी विल्होळीच्या जैन मंदिराजवळ मोठ्या संख्येने चारचाकी वाहने नेऊन रस्ता रोको करण्याचा नाशिकच्या प्रमुख संघटनांनी घेतलेला निर्णय पालकमंत्री दादा भुसे यांच्या विनंतीला मान देऊन तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती नाशिक सिटीझन फोरमचे मार्गदर्शक जितूभाई ठक्कर आणि निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिककरांच्या भावना तीव्र आहेत याची आपणास जाणीव आहे. महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे तसेच वाहतूक कोंडी रोखण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाल्याची माहिती देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती ना.भुसे यांनी केल्याने त्यास सकारात्मक प्रतिसाद म्हणून रास्ता रोको तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ठक्कर आणि बेळे यांनी स्पष्ट केले.

नाशिक-मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.ठीकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने तसेच वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने हे अंतर कापण्यासाठी प्रचंड वेळ लागतो.तसेच मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करण्याचीही वेळ येत असल्याने नाशिकमधील विविध संघटनांनी एकत्र येऊन 29 जुलै रोजी विल्होळीच्या जैन मंदिराजवळ दोन हजाराहून अधिक वाहने नेऊन चक्काजाम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व यंत्रणांना खळबडून जाग आली.

यानंतर पोलीस तसेच संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या संघटनांच्या नेत्यांना तातडीने पाचारण केले व त्यांच्याशी चर्चा केली.आंदोलन स्थगित करण्याची विनंतीही त्यांना करण्यात आली.त्यामुळे याबाबत काय तोच निर्णय घेण्यासाठी नाशिकच्या सर्व प्रमुख संघटनांची बैठक रविवारी (दि. 28 जुलै) घेण्यात आली.त्यात साधक-बाधक चर्चा झाली.पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींशी फोनवरून संवाद साधला.महामार्गाच्या नादुरुस्त रस्त्यांबद्दल नाशिककरांच्या भावना तीव्र असल्याची जाणीव आपणास आहे.

या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.लवकरच नाशिककरांचा प्रवास सुखकर आणि वेळेत व्हावा यादृष्टीने सरकारतर्फे आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत.लवकरच यासंदर्भात नाशिकच्या प्रमुख संघटनांचे पदाधिकाऱी आणि विविध यंत्रणांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यात नाशिक-मुंबई महामार्ग दुरुस्ती तसेच अन्य समस्यांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल.दोन ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री नाशकात येत असून त्यावेळी त्यांच्यासमवेत तुम्हा सर्वांची चर्चा घडवून आणतो,असे आश्वासनही मंत्री.भुसे यांनी दिले.

नितीन गडकरींनी घेतली माहिती
दरम्यान केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनीही नाशिक मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबद्दलची माहिती मागवली असता त्यांना ती प्रदान करण्यात आल्याचे निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले. बैठकीस चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय सोनवणे,आयमाचे अध्यक्ष ललित बूब,निमाचे सचिव निखिल पांचाळ,उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे,कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे,मनीष रावल,डॉ.सचिन गुळवे, नितीन आव्हाड,भूषण मटकरी,भावेश ब्राह्मणकर, सचिन अहिरराव,अनिल कडभाने, कायदेतज्ज्ञ आशुतोष राठोड यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या