Saturday, September 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSinnar : तुतारीला निवडून आणण्याची जबाबदारी खा.वाजेंची- आ.जयंत पाटील

Sinnar : तुतारीला निवडून आणण्याची जबाबदारी खा.वाजेंची- आ.जयंत पाटील

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

- Advertisement -

लोकसभेला राजाभाऊ वाजे निवडून येणारच होते. ते निवडून आल्यानंतर अनेक लोक आता आम्ही राजाभाऊंचे आतून काम करत होतो, असे म्हणत आहेत. अशा आतून काम करणार्‍यांना आता इकडे आणा. राजाभाऊंचे वेलविशर सर्वच पक्षांमध्ये आहेत. त्यामुळेच त्यांना सिन्नरमधून 1 लाख 61 हजार मते मिळाली. आता विधानसभेला तुतारीधारी माणूस निवडून आणण्याची जबाबदारी राजाभाऊंची असल्याचे आ. जयंत पाटील यांनी म्हणत सिन्नरची जागा तुतारीला मिळणार असल्याचे सूतोवाच करत सिन्नरची सीट निवडून आणली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सिन्नरला पोहोचल्यानंतर ज्वालामाता लॉन्सवर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

खा. अमोल कोल्हे, खा. राजाभाऊ वाजे, खा. भास्कर भगरे, आ. सुनील भुसारा, श्रीराम शेटे, मेहबूब शेख, माजी आमदार हेमंत टकले, नितीन भोसले, बाळासाहेब वाघ, भारत कोकाटे, संजय सानप, डॉ. रवींद्र पवार, राजेश गडाख, पुरुषोत्तम कडलग, सुनील गव्हाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व्यासपीठावर उपस्थित होते. .

लोकसभा निवडणुकीत राजाभाऊंना निवडून आणल्याबद्दल आ.पाटील यांनी सिन्नरकरांचे आभार मानले. राज्य सरकारकडे लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटींचे कर्ज मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला असून ‘खिशात नाही दमडा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी राज्य सरकारची गत असल्याचे आ. पाटील म्हणाले. पंजाबमध्ये अफगाणिस्तानमधून कांदा आणून मोदी-शहांनी शेतकर्‍यांच्या कांद्याचे पानिपत केले असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकर्‍यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळू नये, अशी भाजपची मानसिकता आहे. शेतमालाचा दर वाढला तर महागाई वाढते असे त्यांना वाटते.

वीज, स्टील, सिमेंट, खतांच्या किमती वाढल्या तर महागाई वाढत नाही असे त्यांना वाटते. औरंगजेब 26 वर्षे महाराष्ट्रात राहिला तरी त्याला मराठी राज्य जिंकता आले नाही. शहा-मोदींनी कितीही आढावा घेतला तरी त्यांनाही महाराष्ट्र जिंकता येणार नाही असे म्हणत त्यांनी नाशिकला आढावा घेण्यासाठी आलेल्या शहा यांना चिमटा काढला. महाराष्ट्रात शिवसेना मोठी होती. राष्ट्रवादी काँग्रेस मोठी होती. त्यांना फोडण्याचे पाप भाजपने केले असून त्याचा प्रचंड राग महाराष्ट्राच्या माणसांमध्ये आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्याचे काम ते येत्या विधानसभा निवडणुकीत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीमंतांचे चोचले पुरवण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत असून मोटारसायकलवर 12 टक्के जीएसटी तर हेलिकॉप्टरवर 5 टक्के जीएसटी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकरीविरोधी तीन काळे कायदे परत आणण्याची भाषा कंगना रणावतसारख्या भाजपच्या खासदार करू लागल्या असल्याचे खा. कोल्हे यांनी सांगितले. सिन्नर तालुक्यात आठ वर्षांच्या चिमुरड्याला बिबट्या उचलून नेतो. माझ्या मतदारसंघातही आजच एका चिमुरड्याला बिबट्याने उचलून नेले आहे. निष्पाप लेकरांचे बळी जात असतानाही राज्य शासनाला त्याचे सोयरसुतक नाही. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी केरळच्या धर्तीवर राज्य आपत्ती घोषित करून बिबटे प्रजनन नियंत्रित करण्यावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यावेळी पक्षाचे राज्य सचिव राजाराम मुरकुटे, संभाजी कांबळे, बाळासाहेब वाघ, कोंडाजीमामा आव्हाड यांचीही भाषणे झाली. तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संजय सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.

त्या फक्त वर्क ऑर्डर
महायुतीबरोबर गेलेले हजारो कोटींच्या गप्पा करत आहेत. मात्र, या सगळ्या फक्त वर्क ऑर्डर आहेत. टेंडर झाले तरी बिले होणार नाहीत. तीन वर्षांपासून ठेकेदारांची 60 हजार कोटींची बिले त्यांना देता आलेली नाहीत. पुढची बिले देण्यासाठी त्यांच्या तिजोरीत पैसे तर पाहिजेत. लोकसभेच्या निकालानंतर घाबरलेल्या राज्य सरकारने राज्याची सगळी तिजोरीच उघडी करून दिली असून सरकारची पत गेली असल्याचा टोला आ. पाटील यांनी लगावला.

बाळासाहेब, तुम्हीतरी थांबा..
आ. पाटील यांचे भाषण सुरू असताना खासदार राजाभाऊ उठून गेले. त्यांच्यानंतर काही वेळाने यापूर्वी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष असणारे व आता शिवसेनेत असणारे बाळासाहेब वाघही उठून जाऊ लागताच ‘बाळासाहेब, तुम्ही तरी थांबा’ असे आ. पाटील म्हणाले. आम्ही तुम्हाला पक्षातून काढून टाकले होते, त्याचा राग म्हणून तुम्ही निघून चाललात का? माझे भाषण ऐका. बाळासाहेब खरे निष्ठावान होते. मात्र, मधल्या काळात त्यांना त्रास झाल्याची कबुलीही आ. पाटील यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या