Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधपहाटेच्या शपथविधीचे कालबाह्य कवित्व

पहाटेच्या शपथविधीचे कालबाह्य कवित्व

भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे माजी मुख्य व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या कमी-अधिक चार वर्षांपूर्वीच्या पहाटेच्या शपथविधिबाबत हल्ली महाराष्ट्रात सुरु असलेली चर्चा केवळ ‘जिसम् मया’ या भावनेभोवती फिरत असून विद्यमान राजकारणासंदर्भात तर ती केवळ अनावश्यक कालबाह्य बनली आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. फक्त त्या घटनेचे केंद्रबिंदू असलेले शरद पवार, अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस हे तीन नेते आजही राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असल्यामुळे त्या विषयाला प्रसिद्धी मिळत आहे एवढेच.

त्यावेळी ‘त्या’ शपथविधिला असलेले महत्त्व खरे तर वादातीत होते. कारण विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसंदर्भात जवळपास सर्व गमावले असताना तो शपथविधी होणे हा देवेंद्र फडणविसांसाठी केवळ मास्टरस्ट्रोक होता व त्यावेळी काहीकाळ तरी तो तसा मानला गेलाही होता. त्यावेळी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले नसते व न्यायालयाचा तसा आदेश आला नसता तर ती व्यवस्था म्हणजे भाजपा व राष्ट्रवादीतील अजितदादांचा गट यांचे संयुक्त सरकार कदाचित तरुनही गेले असते. पण न्यायालयाने खूप तपशीलवार आदेश दिल्याने त्यापुढे अजितदादांचे बंड व फडणविसांचे सरकार टिकणे केवळ अशक्य होते. त्यामुळे तो प्रयोग फसला. पण राजकारणात विजयाचे वाटेकरी सर्वच असतात, अपयशाची जबाबदारी घ्यायला मात्र कुणीच तयार नसतो. तथापि देवेंद्र फडणवीस यांनी ती जबाबदारी स्वीकारली व त्याची पटेल अशी कारणमीमांसाही त्याचवेळी सादरही केली होती. त्यांचे त्यावेळी म्हणणे असे होते की, त्या संघर्षात आमच्याकडचे सर्व पर्याय संपले होते. हुकुमाची सर्व पाने महाविकास आघाडीकडे म्हणजेच शरद पवारांच्या हातात होती. अशास्थितीत त्यांच्या हातातील एखादी खेळी आमच्या हातात येणे आवश्यक होते. पहाटेच्या शपथविधिच्या निमित्ताने ती संधी आम्हाला मिळणार होती, ती आम्ही घेतली.

- Advertisement -

खरे तर पहाटेच्या शपथविधिचे महत्त्व त्याठिकाणी संपले होते.पण शेवटी हे राजकारण आहे. त्यातील हितसंबंध कधीच संपत नसतात. ते जाण्याचा प्रयत्न सतत सुरु असतो. आज त्या विषयावर सुरु असलेली चर्चा हा त्या प्रयत्नाचाच पुढचा अध्याय आहे, एवढेच या चर्चेबद्दल म्हणता येईल. त्यावेळी पडद्याआड काय घडले किंवा घडत होते? हे आता कोणीच खरे सांगणार नाही.कारण त्या सर्वसंबंधिताना आजही राजकारणात राहायचे आहे. त्यामुळे आपली अडचण होईल, अशी कोणतीही बाब कुणीही मान्य करणार नाही. दावे-प्रतिदावे होतच राहणार पण लोकांसमोर जे घडले ते तर कुणी नाकारु शकत नाही. फडणवीस आणि अजितदादांचा शपथविधी सर्वांनी पाहिला. पहाटेचा जरी म्हटले जात असले तरी तो अंधारात झालेला नव्हता. दिवसाउजेडी झाला होता. त्यात केवळ अजितदादाच नव्हे तर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार उपस्थितही होते. फक्त ते पुरेशा संख्येत उपस्थित नसल्याने दादांचे अवसान गळाले व ते लगेच नॉट-रिचेबल झाले.त्यांना शोधण्याची मोहीम कशी राबविण्यात आली हे त्यावेळी वाहिन्यांवर झळकणार्‍या बातम्यांवरुन स्पष्ट होत होते. दरम्यान काय झाले हे कुणालाच ठाऊक नाही. फक्त एवढे ठाऊक आहे की, दादा रिचेबल झाले. त्यांच्याशी चर्चा होणे स्वाभाविकच होते. त्या चर्चेचा निचोड म्हणजे बंडोबा थंडोबा झाले. पुढच्या घडामोडी सर्वांसमोर आहेतच. आता वेगळे एवढेच घडले आहे की, त्यावेळचे उद्धव सरकार गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ते गेले असे मात्र म्हणता येणार नाही. कारण ठाकरे सरकारवर अविश्वास प्रस्ताव संमत झाला किंवा शक्तीपरीक्षेत ते असफल झाले म्हणून ते गेले नाही. तशी कोणतीही गरज नसतांना आणि मविआ नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी अकारण राजीनामा देवून ते सरकार मोडले ही वस्तुस्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयातही तेच सिद्ध झाले. दरम्यान गेल्या एक वर्षात राष्ट्रवादीतील अस्वस्थता उघड झाली. अजितदादा हेच तिचे केंद्रबिंदू होते हेही स्पष्ट झाले.

त्यावर शरद पवार यांनी त्यांच्या सोयीची उपाययोजनाही त्यांच्या पद्धतीने केली. तरीही दादा अस्वस्थ आहेत ही वस्तुस्थिती ना शरद पवारांना लपविता आली, ना दादांना लपविता आली. त्यातूनच पहाटेचा शपथविधी समोर आला व तोच विषय हल्ली चिघळला जात आहे.‘त्या’ चघळण्यात गुगली, विकेट या क्रिकेटमधील शब्दांचा वापर होत आहे. चर्चेत रंग भरण्यासाठी त्यांचा वापर होत आहे. त्यातील एकेक तथ्य सांगणार्‍याच्या सोयीनुसार पुढे येत आहे. पण त्याचा शेवट कुणीच करीत नाही. आपल्याजवळ आणखी काही मसाला आहे, असे दावेच सर्व जण करीत आहेत. त्याचा अंतिम खुलासा तेव्हाच होवू शकतो जेव्हा दादा काही तरी निर्णायक बोलतील. एक बाब तर दादा आणि फडणवीस यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट झाली आहे की, पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीने झाला होता. पवारांनीही ते मान्य केले आहेच. फक्त त्यांनी गुगलीची पळवाट तेवढी शोधली आहे. जोपर्यंत दादांचे नॉट-रिचेबल होणे व नंतर रिचेबल होणे यादरम्यानच्या घटनांचा उलगडा होत नाही तोपर्यंत ही चर्चा पूर्ण होवू शकत नाही. त्याबाबत दादांचा निर्णय अद्याप झाला नाही. तो होतो की, नाही हे शेवटी दादांनाच ठरवावे लागणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या