भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांच
इतिहासातील राजकारणात थेट सक्रिय असणार्या महिलांमध्ये उमाबाई दाभाडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मराठी साम्राज्यातील पहिली सरसेनापती म्हणून उमाबाई दाभाडे यांना ओळखले जाते. पती सेनापती खंडेराव व ज्येष्ठ पुत्र त्रिंबकराव यांच्या निधनानंतर खुद्द उमाबाईंनी अत्यंत कठीण अशा सेनापतीपदाची जबाबदारी वीस वर्षे निभावली. राजकारण करण्याबरोबरच प्रत्यक्ष युद्धभूमीवरही त्या लढल्या. एका महिलेला अबला समजून चहुबाजूंनी संकटांनी घेरले. तरी उमाबाई दाभाडे यांचे धैर्य, शौर्य, आत्मविश्वास आणि करारी स्वभाव त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा परिचय देतात. जबरदस्त ताकदीचा मुत्सद्दीपणा त्यांच्याकडे होता.
उमाबाईंचा जन्म सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी असणार्या अभोणा गावातील सरदार देवराव ठोक देशमुख सरदार घराण्यातला. त्यांच्या माहेरी सरदारकी असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्यात लढवय्येपणा होता. लहान वयात राज्यकारभारातील घडामोडी त्या जाणून होत्या. शस्त्र चालवण्यात आणि घोडेस्वारीत त्या अव्वल होत्या. त्यांचा विवाह पुण्याजवळील तळेगाव येथील वतनदार खंडेराव दाभाडे यांच्याबरोबर झाला. तळेगावच्या दाभाडे यांचे घराणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांच्या सैन्यात होते. खंडेराव दाभाडे यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. शाहू महाराजांनी 1717 मध्ये खंडेराव दाभाडे यांना सेनापतीपदी नेमले. एका शिलालेखात खंडेराव दाभाडे यांचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे, नुसते सेनापती म्हटले म्हणजे खंडेराव दाभाडे हे नाव घेतल्याचा कार्यभाग होतो. अशा शूर सेनापतीची पत्नी म्हणून उमाबाईंनी खर्या अर्थाने पुढे आपली भूमिका सार्थ केली.
1729 मध्ये खंडेराव दाभाडे यांचे निधन झाले. उमाबाईंचे ज्येष्ठ पुत्र त्रिंबकराव दाभाडे यांना शाहू महाराजांनी गुजरातच्या मुलुखगिरीची व बाजीराव पेशवे यांना माळव्याच्या मुलखगिरीची जबाबदारी दिली. परंतु पुढे पेशवे व त्रिंबकराव यांच्यामधील वादामुळे 1731 च्या डभईच्या लढाईत त्रिंबकराव मारले गेले. पुत्राच्या मृत्यूमुळे उमाबाई बाजीराव पेशवे यांच्यावर अतिशय संतप्त झाल्या. त्यावेळी खुद्द शाहू महाराजांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. बाजीरावांना उमाबाईंची माफी मागायला लावून हा वाद शांत केला. पती आणि ज्येष्ठ मुलाच्या निधनाने आणि बाकी मुले लहान असल्याने वतनाची जबाबदारी उमाबाईंच्या अंगावर पडली व ती त्यांनी समर्थपणे पेलली.
त्रिंबकराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर दाभाडे यांची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचा राजा अभयसिंग याने मुघलांची मदत मागितली आणि दाभाडे यांच्या गुजरातच्या भागावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यासाठी अभयसिंग याने प्रथम बडोदा हस्तगत करून डभई प्रांतास वेढा घातला. या युद्धात उमाबाईंचे सरदार पिलाजी गायकवाड यांचा मृत्यू झाला. आता उमाबाईंची ताकद कमी झाली आहे आणि त्या नक्कीच आपले वतन सांभाळू शकणार नाही, असे अभयसिंगास वाटले. परंतु उमाबाई आल्या परिस्थितीला शरण न जाता हिंमतीने सामोर्या गेल्या. लहानपणापासूनच क्षत्रियत्वाचे शिक्षण घेतलेल्या उमाबाई स्वतः युद्धात उतरल्या आणि त्यांनी थेट अभयसिंगवर स्वारी केली. हत्तीवरील हौदात स्वतः तीर कामठा घेऊन सैन्याचे नेतृत्व करणार्या शुभ्र पोशाखातील वीर उमाबाईंनी त्या युद्धात पराक्रम गाजवला. उमाबाईंचा विजय झाला. अभयसिंग यास गुजरातमधून पलायन करावे लागले.
बडोदा व डभई हे प्रांत उमाबाईंच्या ताब्यात आले होते. परंतु अहमदाबाद येथे अजूनही मुघलांचे ठाणे अस्तित्वात होते. त्यामुळे उमाबाईंनी पुन्हा एकदा गुजरातवर दुसरी स्वारी केली. अहमदाबाद येथील मुघलांचा सरदार जोरावर खान बाबी याने उमाबाई यांना पत्र लिहून त्यांची वल्गना केली, एक विधवा माझ्याशी काय लढणार? तुमचा निभाव या युद्धात लागणार नाही. जोरावर खानच्या या पत्रास उमाबाईंनी राणांगणात शौर्य गाजवून चोख उत्तर दिले. उमाबाईंच्या सैन्याने अहमदाबादवर जोरदार हल्ला चढवला. या जबरदस्त हल्ल्याने मुघल सैन्य बिथरले. उमाबाईंचे रौद्ररूप पाहून सरदार जोरावर खान तटात जाऊन लपला. मराठ्यांच्या सैन्याने मुघलांची धूळधाण उडवली. मराठ्यांच्या सैन्याने मोगल सैनिकांचे मृतदेह एकावर एक ठेवून तटावर जाण्याचा मार्ग तयार केला व अहमदाबाद ताब्यात घेतले.
सेनापती उमाबाई दाभाडे यांनी स्वतः मोहिमेत भाग घेऊन गुजरात सर केले. उमाबाईंच्या या शौर्यामुळे खूश होऊन छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाई यांचा मोठा सन्मान करून पायात सोन्याचे तोडे घातले. सोन्याचे तोडे मिळवण्याचा मान उमाबाईंनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळवला. शाहू महाराजांच्या निधनानंतर सरदार दाभाडे यांचा मुख्य आधार कोसळला.
शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर परिस्थिती बरीच बदलली. बाजीराव पेशवे व त्रिंबकराव दाभाडे यांच्यापासून पेशवे व दाभाडे घराण्यात सुरू झालेले वैर कायम होते. नानासाहेब पेशवे सर्व कारभार बघत होते.सरदार मंडळी प्रबळ होऊन आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत होते. उमाबाई स्री आहे, त्यांचे काय चालणार, त्यांचे अधिकार कमी करून त्यांचा मुलुख कमी करण्याचा प्रयत्न अनेकजण पेशवाईत करत होते. उमाबाई आपला मुलुख कमी करून देण्यास तयार नव्हत्या.
उमाबाईंनी पेशव्यांसोबत बोलणी करण्यासाठी वकील पाठवला. पण उपयोग झाला नाही. स्वतः उमाबाईंनी आळंदी येथे पेशव्यांची भेट घेतली. त्या एकट्याच त्यांच्या बाजूने वाटाघाटी करण्यासाठी बसल्या. आपला मुलुख मोडून देण्याऐवजी आपल्याकडून पैसा घ्यावेत, असा विचार उमाबाईंनी नानासाहेबांसमोर ठामपणे मांडला. यावरून उमाबाई किती धाडसी होत्या हे दिसते. त्या धोरणी व हुशार होत्या याचा प्रत्यय राज्यकारभारतील अनेक घटनांमधील गोष्टीतून दिसून येतो. परंतु नानासाहेबांनी उमाबाईंचा प्रस्ताव स्वीकारला नाही. पेशव्यांच्या या अन्यायामुळे उमाबाई नाराज झाल्या. त्या रामराजे भोसले यांच्या गादीस जाऊन मिळाल्या.
त्यांनी दामाजी गायकवाड यांना पेशव्यांवर चाल करून पाठवले. या युद्धात दामाजी गायकवाड यांचा पराभव झाला. नाईलाजास्त त्यांना 30 एप्रिल 1751 साली पेशव्यांबरोबर वेणेचा तह करावा लागला. त्यात त्यांना गुजरात प्रांत पेशव्यांचा स्वाधीन करावा लागला. 1751 साली पेशव्यांनी उमाबाई दाभाडे व त्यांच्या कुटुंबियांना कैद करून होळकर वाड्यात ठेवले. नंतर सिंहगडावर नजरकैदेत ठेवले. नजरकैदेतून उमाबाईंचे पुत्र यशवंतराव व नातू त्रिंबकराव यांनी आपली सुटका करून घेतली. त्यानंतर उमाबाईंना पुण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले.
पुन्हा एप्रिल 1752 साली पेशवे व दाभाडे यांच्यात तह झाला. त्यामध्ये उमाबाईंनी छत्रपती रामराजे गादीस अनुकूल होऊ नये व शाहू महाराजांच्या राज्यमंडळाचे प्रधान असलेल्या पेशव्यांना अनुकूल राहावे, असे ठरले. यानंतर पेशव्यांनी उमाबाई यांचा जप्त केलेला सरंजाम त्यांना सन्मानाने परत केला. नानासाहेब पेशवे उमाबाईंबरोबर आदराने वागत. या तहामुळे पेशवे व दाभाडे यांचे संबंध पुन्हा सुधारले.
पुढे उमाबाईंची प्रकृती बिघडत गेली. त्यांना मुठा नदीच्या किनार्यावरील नाडगममोडी येथे उपचाराकरता काही दिवस ठेवले गेले. तेथे नोव्हेंबर 1753 मध्ये त्यांनी आपला देह ठेवला. तळेगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठी बनेश्वर मंदिराजवळ ‘श्रीमंत सरसेनापती दाभाडे’ असे नाव असलेली त्यांची समाधी बांधण्यात आली.