Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याआज वाजणार शाळांची घंटा

आज वाजणार शाळांची घंटा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोना संसर्गाचा आलेख घसरल्यानंतर अखेर आजपासून (दि.4) राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरणार आहेत.

- Advertisement -

राज्य सरकारने आज शाळांसाठी एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांनी शिक्षणोत्सव साजरा करायचा आहे. या कार्यक्रमांसह अधिकार्यांच्या भेटींची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर प्रदर्शित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पोस्ट कशी करावी? त्यात कोणता हॅशटॅग वापरावा आदी तपशीलही परिपत्रकात देण्यात आले आहेत.

शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे संबोधन ऐकण्याबाबतही सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बजावण्यात आले आहे.

तयारी पूर्ण, पण पालकांचा विरोध

नाशिकचा करोना संसर्ग निवळल्याने आजपासून शहरातील आठवी ते बारावी तर ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडणार आहेत. शाळा उघडण्यासाठी व्यवस्थापनाने जय्यत तयारी केली आहे, पण पालक अद्याप संभ्रमातच आहेत. पाल्यांना शाळेत पाठवण्यास अनेक पालकांनी विरोध दर्शवला आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण 2,802 शाळा असून एकूण 3 लाख 6 हजार 914 विद्यार्थी शिक्षण घेतात. जिल्हा परिषदेसह खासगी शिक्षण संस्थांचे 14,580 शिक्षक आहेत. त्यांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भातील सर्व सूचना शाळांना देण्यात आल्या असून गरज पडल्यास दोन सत्रात शाळा भरवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत.

नाशिक शहरातील 227 शाळा सुरू होणार असून यामध्ये साधारणत: 1 लाख 10 हजार विद्यार्थी आहेत. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी पुष्पावती पाटील व महापालिकेच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी शहरातील शाळांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील. एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवले जाईल. ज्या शाळांमध्ये सकाळी व दुपारी अशा पद्धतीने सत्र करणे शक्य असेल त्यांनी तो पर्यायही निवडण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव पाहिजे तसा कमी झालेला नाही. त्यामुळे पाल्यांना शाळेत कसे पाठवणार? करोना झाल्यास जबाबदारी कोण घेणार? आदी प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत. अनेक पालकांनी शाळेत पाठवण्यास विरोध केला आहे. काही शाळांनी पालकांकडून हमीपत्र लिहून घेतल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे काही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची तयारी केली आहे.

मुलांची मानसिकता जपावी

राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सोमवारी (दि.4) सुरू होत आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे. बहुतांशी भागात आठवीचे पुढील वर्ग सुरू आहेत. मात्र ग्रामीण भागातील अपवाद वगळला तर सर्व शाळा सुरू होतील. शिक्षण विभागातील कोंडलेली स्थिती मोकळी होईल. दीड वर्षाहून अधिक काळ हा एका कोंडीत गेलेला आहे.पुन्हा शैक्षणिक वातावरण तयार होईल. मात्र दोन वर्षे थांबलेले शिक्षण सुरू होताना शिक्षकांसह पालकांनी काळजी घ्यायची आहे. मुलांची मानसिकता जपावी लागेल, काळजी घ्यावी लागेल.

चंद्रकांत कुशारे, सरचिटणीस, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना.

- Advertisment -

ताज्या बातम्या