दिल्ली | Delhi
आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. पाच दिवस हे अधिवेश चालणार आहे. यंदाचे अधिवेशन हे नवीन संसद भवनात पार पडणार आहे. विशेष अधिवेशनाच्याकाळात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण ५ बैठका होतील.
या अधिवेशनात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांतील देशाच्या कामगिरीपासून ते संविधान सभेपर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा होणार आहे. विषयपत्रिकेत चार विधेयकेही मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे. संसदेच्या विशेष सत्राच्या पहिल्या दिवशी १८ सप्टेंबर रोजी राज्यसभेमध्ये ‘संविधान सभेपासून ७५ वर्षांत संसदेचा प्रवास, काय साध्य केले. अनुभव, आठवणी आणि शिकवण’ यावर चर्चा होईल. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावरही चर्चा केली जाणार आहे. तसेच चांद्रयान-३ आणि जी-२० शिखर परिषदेबद्दलचे प्रस्तावही मांडले जातील.
दरम्यान अधिवेशापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक पार्लमेंट लायब्ररी इमारतीत पार पडली होती. यावेळी विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद करावी, अशी विरोधकांची मागणी आहे. परंतु असं असलं तरीही अधिवेशनात कोणते निर्णय होणार हे गुलदस्त्यात आहे. विरोधकांची मागणी नसताना पंतप्रधान मोदी यांनी हे अधिवेशन बोलावल्याने आजच्या अधिवेशनात मोदींचं धक्कातंत्र पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.