माणसे स्वार्थी होत आहेत. मी आणि माझे अशी संकुचित विचारसरणी प्रबळ होत आहे असे सातत्याने बोलले जाते. त्याच्या पुष्ट्यर्थ माणसे एकमेकांच्या मदतीला कशी उभी राहात नाहीत अशा प्रसंगांचे दाखलेही दिले जातात. पण असे प्रसंग अपवादानेच अनुभवास येतात. त्याउलट माणूसपण जपणार्यांची संख्या वाढत आहे याची साक्ष अनेक प्रसंग देतात. नाशिक सिन्नर रस्त्यावर नुकताच मोठा अपघात झाला. अपघात झालेल्या बसला आग लागली. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरीकांनी धाव घेतली. पेटत्या बसच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. दरवाजा उघडला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. लोकांनी केलेल्या तातडीच्या मदतीमुळे बसमधील 43 प्रवाशांचा जीव वाचला. दोन लोकांचा जीव मात्र वाचू शकला नाही. संकटसमयी मदत करणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि सुखदु:ख जाणून घेणे ही माणसाची काही अंगभूत वैशिष्ट्ये. पण केवळ पोलीसांचा ससेमिरा मागे लागू शकतो आणि कोर्टात चकरा माराव्या लागू शकतात या भीती पोटी विशेषत: अपघातासारख्या प्रसंगांमध्ये गरजूंना मदत करणे टाळण्याकडेच माणसांचा कल असतो. यातही दोन प्रकारच्या वृत्ती आढळतात. किरकोळ अपघाताच्या घटनांकडे माणसे दुर्लक्ष करतात. मदतीसाठी थांबत नाहीत. जे थांबतात तेही बर्याचदा जखमींना मदत करण्याऐवजी मोबाईलमध्ये चित्रिकरण करतात. तथापि मोठ्या अपघातांमध्ये माणसांचा जमाव मदतकार्य करतो. अशा मदतकार्याची एकल जबाबदारी येणार नाही, ती सामुहिकरत्या पेलली जाईल असे त्यांना वाटते. त्यामुळेच जेवढा अपघात मोठा तेवढी मदत करणार्यांची संख्या मोठी असा अनुभव समाजाला येतो. मदतीच्या याच सामाजिक भावनेला प्रशिक्षणाची जोड दिली जायला हवी. पूर्वी शाळाशाळांमध्ये प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले जायचे. कदाचित तसे ते आजही दिले जात असावे. डॉक्टरांच्या संघटना ‘सीपीआर (हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी पुनरुत्थान) चे प्रशिक्षण देतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयाशी संबंधित त्रास झाला तर त्याच्या भोवती असलेली माणसे त्याचा जीव कसा वाचवू शकतात हे त्यात शिकवतात. समाजात अनेक प्रकारच्या दुर्घटना घडतात. अपघात होतात. पूर येतो. शॉर्टसर्किट होते. सिलेंडरचे स्फोट होतात. त्यामुळे आग लागते. दुर्घटनेनुसार मदतीचे स्वरुपही बदलते. अशा प्रसंगांमध्ये मदत कशी करावी? ती करताना कोणते भान राखावे? मदत करणार्याने त्याचा जीव जोखमीत न टाकता इतरांचा जीव कसा वाचवावा? मदतीमध्ये समन्वय कसा साधता येईल? हे शिकवले जायला हवे. अपघातासारख्या प्रसंगांंमध्ये सर्वजण मदतीच्या भावनेनेच धावतात. पण त्यात सुसुत्रता नसल्याने गोंधळही उडतो. त्या गोंधळामुळेच अपघाताची तीव्रता वाढण्याचा धोकाही संभवतो. अशा अनेक उणीवा प्रशिक्षणामुळे दूर होऊ शकतात. माणसे प्रशिक्षित झाली तर मदतीचे रुपांतर जबाबदारीने केलेल्या मदतकार्यात होऊ शकेल. त्यासाठी शासनासहित सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा.