Monday, November 25, 2024
Homeअग्रलेख'सफर गोदावरीची' सुरु

‘सफर गोदावरीची’ सुरु

नदीच्या अस्तित्वाची तुलना कदाचित फक्त माणसाच्या श्वासाशी करता येऊ शकेल. माणसाच्या जगण्यासाठी श्वास जितका महत्वाचा असतो तितकीच नदी माणसाच्या आणि सृष्टीच्या अस्तित्वासाठी महत्वाची आहे. नदी माणसाला जगवते. जगातील, देशातील आणि राज्यातील दुष्काळी प्रदेश आणि गावांची दुर्दशा याची साक्ष आहेत. नदीकाठीच संस्कृती बहरते.  आद्योगिकरण होते. शेती फळतेफुलते. माणसाचा विकास होतो. किती जण गोदावरीशिवाय नाशिकची कल्पना करू शकतील?  मानवी जीवनचक्र सुरळीत सुरु राहण्यासाठी प्रदूषण मुक्त नदीचा अखंड प्रवाह गरजेचा आहे. दुर्दैवाने राज्यातील प्रदूषित नद्यांची संख्या वाढत आहे.

राज्यातील ५३ नद्या प्रदूषित असून त्यापैकी गोदावरी अती प्रदूषित मानली जाते. तिला नदी म्हणावे की गटारगंगा असा प्रश्न कोणालाही पडावा अशीच सद्यस्थिती आहे. थेट नदीत सोडलेले सांडपाणी आणि औद्योगिक परिसरातील प्रदुषित पाणी, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची कमतरता, पाण्यात मिसळणारी रासायनिक द्रव्ये, नदीपात्रात फेकले जाणारे निर्माल्य आणि टाकाऊ वस्तू ही नदी प्रदुषणाची काही मुख्य कारणे सांगितली जातात. प्रदूषणामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी पाणी मृत होते.

- Advertisement -

गोदावरी नदीही त्याला अपवाद नाही. याच मुद्यावर ‘देशदूत’ने  ‘सफर गोदावरीची’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्याचे उदघाटन प्रसिद्ध जलतद्न्य डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. गोदावरीच्या सद्यस्थितीविषयी आणि तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम लोकसहभागासाठी व्यासपीठ ठरावा. गोदावरीला लोक आईच्या रुपात बघतात. सगळ्यांनी तिला त्याच प्रकारचा सन्मान दिला पाहीजे.

गोदावरीच्या कॉंक्रिटीकरणामुळे गोदावरीचा श्वास कोंडला गेला असून तिला काँक्रिटमुक्त केले पाहीजे. त्यासाठी गोदावरी वाचवण्यास सहाय्य करणाऱ्या या उप्रकमात नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशी अपेक्षा डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली. सरकारची भूमिकाही यात अत्यंत महत्वाची असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी सरकारचे कर्तव्य आणि समाजाची जबाबदारी यावर भर दिला. नद्यांचे संवर्धन करण्यात समाजाचा सहभागही सरकार इतकाच मोलाचा आहे. माणसांच्या काही सवयी नदीच्या जीवावर उठल्या आहेत. लोक निर्माल्य, नदीकाठच्या वस्त्यांमधील कचरा नदीपात्रात टाकला जातो.   गोदेत डुबकी मारली की ओले कपडे नदीपात्रात किंवा तिच्या काठावर टाकून देण्याची परंपरा आजही आढळते.  गोदावरीचा आक्रोश लोकांच्या कानी पडावा आणि नदी मरणे म्हणजे केवळ शहर-जिल्हाच नव्हे तर मानवी जीवनालाच धोका निर्माण होतो याचे भान रुजवण्यासाठी ‘सफर गोदावरीची’ उपक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी जाणत्यांचा सहभाग असलेली समिती गठीत करण्यात आली आहे. या उपक्रमात नाशिककर मोठ्या संख्येने सहभागी होतील याची खात्री आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या