मुंबई । प्रतिनिधी Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प उद्या, सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल हे आज दुपारी दोन वाजता सन २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प विधान परिषदेत मांडणार आहेत. सरकारी जमा – खर्चाचा बिघडलेला ताळमेळ, वाढती महसुली तूट, राज्य सरकारवरील सुमारे आठ लाख कोटी रुपये कर्जाचा बोजा आणि विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान या पार्श्वभूमीवर महसूल वाढीचे नवे मार्ग शोधताना सरकारला उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, मद्य, इंधन यावरील करात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी सरकारी तिजोरीवर भार टाकणाऱ्या नव्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात होण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या अंमलबजावणीमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. निधी नसल्याने सरकारला आर्थिक वर्षाच्या शेवटी काटकसरीवर भर द्यावा लागला. त्यामुळे शासकीय खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी आर्थिक शिस्तीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत बहुमत मिळाल्याने निवडणूक जाहिरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्याचा दबाव सरकारवर आहे. त्यासाठी महसूल वाढीचे नवे मार्ग शोधताना सरकारला उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, मद्य, इंधन यावरील करात वाढ होण्याची शक्यता आहे.