Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगशिक्षणातून सत्याची पाऊलवाट

शिक्षणातून सत्याची पाऊलवाट

शिक्षणाचा हेतू हा माहितीचे संकलन करणे नाही, तर ज्ञानाची निर्मिती करणे हा आहे. त्याच बरोबर आत्मज्ञानाचा शोध घेणे हाही आहे. शिक्षणांतून ज्ञानाची प्रक्रिया होऊन सत्याचा साक्षात्कार होत असतो. तो ज्यांना झाला त्यांनी जगावर ठसा उमटविला आहे. त्यासाठी निरंतर शिक्षणाची साधना केली जाते. शिक्षण जर सत्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करणार नसेल, तर ते शिक्षण पोटभरू स्वरूपाचे आहे असे म्हणायला हवे .

शिक्षणातून माहिती साठवून आणि ती परीक्षेच्या वेळी पेपरमध्ये ओकून आपणाला केवळ पदवी मिळविता येईल, पण आयुष्याच्या वाटचालीत जगण्याला जीवनाच्या उंचीवर पोहचविता येणार नाही. जीवन ही साधना आहे ती सत्याची. शिक्षण हे स्वतःला घडविण्याचे साधन आहे. त्यामुळे शिक्षणातून सत्याचा प्रवास घडायला हवा. तो थांबेल तर व्यक्तिचा जीवनप्रवासही थांबेल. सत्याचा शोध थांबला, की राष्ट्र व समाजाच्या प्रगतीचे चक्रेही रूतून बसतात. त्यामुळे स्वराज्याकडून अंधारयुगाकडे प्रवासाला सुरूवात होते. सत्याची धारणा मस्तकात प्रकाश निर्माण करते आणि त्याव्दारे भवताल प्रकाशमान होण्यास सुरूवात होते. शिक्षण हेच मुळतः प्रकाशाचा स्त्रोत आहे. त्यामुळे शिक्षणातून सत्याची पाऊलवाट निर्माण करावी अशी अपेक्षा चुकीची नाही.

- Advertisement -

शिक्षण हे समाज व राष्ट्रनिर्मितीचे साधन आहे असे सातत्याने बोलले जाते. कोणताही समाज व राष्ट्र हे व्यक्ति विकासावर मोठे होत असते. ज्या देशात स्वतःला झोकून देणारा, कार्यसंस्कृतीचे जतन करणारा, समर्पणाची वृत्ती धारण करणारा समाज असतो तेथे राष्ट्र उभे राहाते. जेथे व्यक्तिपेक्षा राष्ट्र अशी धारणा असेल तेथे समाज अधिक उन्नत असतो. अशा उन्नत समाजावरती राष्ट्र उभे राहात असते. शिक्षणातून असा उन्नत समाज निर्माण करण्याचे आव्हान असते. शिक्षणांने सत्याचा सतत पाठलाग करायचा असतो. सत्य हे जीवनाचे सार आहे. त्याचे मागे धावत राहाणे, त्याचा शोध घेणे, त्या दिशेने प्रवास सुरू ठेवणे महत्वाचे असते.

कधीकाळी आपल्या गुरूकूल परंपरेच्या अनुषंगाने जेव्हा चर्चा होत राहाते. तेव्हा गुरू आपल्या शिष्यांना संदेश देत असत. तो संदेश म्हणजे शिक्षणांचे सार होते. त्या संदेशाचे जीवनभर पालन करणे हाच शिष्यासाठी जीवन दिशा होती. त्यावेळी “सत्यं वद्, धर्मं चर, स्वाध्यायात न प्रमदा ” असा विचार होता. यातील सत्य ही धारणा होती. त्या वाटेवर चालत राहावे यासाठी गुरूकूल परंपरेतील गुरूजी प्रयत्न करीत होते.त्यांचा जीवनप्रवास हाच सत्याचा अनुभव होता. ते ख-या अर्थाने आचार्य होते. त्यांना शिष्यांनी कसे जगावे यासाठी उपदेश करण्यापेक्षा जीवन वस्तूपाठ घालून दिला होता.

व्यांसानी आपल्या गुरूकुलातील विद्यार्थ्यांना “सत्यं वद” असा स्वाध्याय दिला होता. तो स्वाध्याय अनेक शिष्यांनी पूर्ण केला होता. पण तो स्वाध्याय धर्मराजाने पूर्ण केला नव्हता. मग गुरूनीं त्याला दोन तीन दिवसांनी पुन्हा विचारले तरी अभ्यास अपूर्ण होता. अखेर काही दिवसांनी धर्मराजा गुरूनां म्हणाले “आता माझा स्वाध्याय पूर्ण झाला आहे”. खरेतर एवढया हुशार असलेल्या विद्यार्थ्याला इतका छोटा अभ्यास करण्यासाठी इतके दिवस कसे लागले? गुरूजींना त्याला विचारले, तर ते म्हणाले तुम्ही जे सांगितले होते ते तर पहिल्या दिवशीच मी पाठ केले होते. पण जे पाठ केले होते ते शिकणे नाही आणि स्वाध्याय करणे तर नाहीच. मी तो स्वाध्याय करतांना पहिल्या दिवशी काही खोटे बोललो. हळूहळू खोटे बोलणे कमी होत गेले. आज दिवसभरात एकदाही खोटे बोललो नाही. सत्यं वद हे पाठ करणे नव्हे तर ती सत्याची साधना आहे. शिक्षणातून हे पेरले जाणे महत्वाचे आहे. त्या पाऊलवाटेचा महामार्ग झाला, की समाज व राष्ट्र प्रगतीची उंच भरारी घेते.

भारतीय स्वातंत्र्याचे अध्यर्यू मोहनदास करमचंद गांधी यांचे आत्मचरित्र “ माझे सत्याचे प्रयोग ” म्हणजे सत्याच्या दिशेने चालण्यासाठीचा संघर्ष आहे. सत्याची पाऊलवाट म्हणजे सहज चालण्याचा मार्ग नाही. त्या वाटेने जातांना हितसंबंधाला बाधा येते. स्वहिताच्या आड अनेकदा सत्य येते. त्यामुळे सत्याच्या वाटेने जसे कमावणे होते त्या प्रमाणे गमावणे पण होते. सत्याने पारलौकिक समाधानाचा मार्ग निश्चित मिळतो पण भौतिक आणि वास्तवाच्या जगात हव्या असलेल्या गोष्टी कशा मिळणार? अनेकदा सत्याने मन संभाळणे होत नाही. सत्य बोलले तरी अनेकांची मने दुखवली जाण्याची शक्यता असते. सत्य म्हणजे अंजन असते आणि ते जीवनाच्या सुखासाठीचे अंतिम साधनही. त्यामुळे गांधीजीनी जीवनभर सत्याची धारणा केली. त्या वाटेने प्रवास सुरू ठेवला. राजकारणात राहूनही त्यांनी तत्व आणि विचाराशी प्रतारणा केली नाही.तेव्हा सत्य हा विचार आणि जगण्याचा मार्ग म्हणून अधोरेखित केला होता. त्यांनी लहानवयापासून झालेल्या चुका कबूल करण्याची क्षमता आणि चूकांबददलचा पश्चाताप व्यक्त केला होता. कधीकाळी लहान वयात हरिश्चंद्र तारामती यांची गोष्ट ऐकली होती. सत्यव्रती हरिश्चंद्राचा प्रभाव पडला होता. शिक्षणात हजारो गोष्टी येतात पण त्या गोष्टीचा मार्ग अनुसरणे होत नाही. कारण तो प्रवास सत्याच्या दिशेने घडत नाही.

कृष्णमूर्ती म्हणत असे, की सत्यासारखा दुसरा धर्म नाही. सत्य तर शिक्षकापेक्षा महत्वाचे आहे.सत्य हे नेहमीच स्वतंत्र असते. त्याला कोणी बंधिस्त करू शकत नाही आणि तेही बंधिस्त राहू शकत नाही. सत्यावरती कोणाची मालकी असत नाही. ज्या दिवशी सत्याचा शोध थांबतो त्या दिवशी व्यक्ती असू दे नाहीतर राष्ट्र त्यांची अधोगती ठरलेलीच. जगात शिक्षणाने ज्ञानाची आराधना करावी असे म्हटले जाते याचे कारण ज्ञान हे सत्य असते. ज्ञानाच्या निर्मितीकरीता अनेक टप्प्यातून जावे लागते त्या प्रत्येक टप्प्याच्या प्रक्रियेतून जे हाती येते ते सत्याच्या शिवाय दुसरे काहीच नसते. संशोधनाच्या प्रक्रियेतून जे हाती येते ते कितीही वाईट असले तरी स्विकारावे लागते, कारण ते प्रक्रियेचे फलित असते. ते फलित हे सत्य असते. सत्याची धारणा जागृत करण्यासाठी बरेच काही पेरावे लागणार असते. त्यासाठी ज्यांने पेरायचे त्यालाच सत्याच्या काटेरी मार्गावर चालावे लागते.

वर्गात कधीकाळी तपासणीसाठी अधिकारी येणार असतील, तर कालचाच घटक दृढ करून पुन्हा दुस-या दिवशी शिकविला जात होता. पहिल्या दिवशीचे प्रश्न आणि उत्तरे घेतली जात होती आणि त्यादिवशी फळ्यावरती सुविचार लिहिलेला होता “नेहमी खरे बोलावे ”. आता सुविचार खरा की कृती खरी असा प्रश्न पडतोच ? विदयार्थी शब्दांनी नाही, तर कृतीने शिकतात म्हणून त्यांचा प्रवास सुरू राहातो कोणत्याही सत्याच्या प्रवासाशिवाय. सत्य हे जीवन व्यवहारात दिसायला हवे. सत्याची कास धरून चालणे कठिण असले तरी त्याच मार्गाने जाणे हे अंतिम ध्येय राखायला हवे. समाजात सत्याचे बोल दिसत नाही.त्या मार्गाने जाणा-याला प्रतिष्ठा मिळत नाही. कधीकाळी गांधीजी देखील राजकारण सत्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही असे म्हणत होते.आज ती सत्याची वाट सत्तेने घेतली आहे. राजकारणात सत्याचा स्पर्शाचा छाया हळूहळू हरवत चालली आहे. व्यवस्थेत आश्वासनाचा पाऊस पडतो, मात्र ती आश्वासन माणसांचा आधार बनत नाही. जाहीर व्यासपीठावरील भाषणावरील समाजाचा विश्वास उडत चालला आहे हे लक्षण सत्यापासून दूर जाण्याचे आहे. त्यामुळे समाजाचा –हास होतांना पाहावयास लागतो आहे. जे बोललो ते हे नव्हते असे लोक जाहीरपणे सांगतात, तेव्हा आपण व्यक्तिगत जीवना बरोबर सामाजिक जीवनात देखील सत्याचे उच्चाटन केले आहे का असा प्रश्न पडतो.

आज शिक्षणात सत्याचा शोध नाही. सत्याचा विचार असला तरी वर्तन नाही आणि अनुकरणासाठीची पाऊलवाट नाही.सत्य म्हणजे प्रकाश असतो.आपल्या अवतीभोवती जेव्हा अंधार असतो तेव्हा त्याचा अर्थ सत्याचा अभाव असणे आहे.शिक्षण घेऊन भविष्यासाठीची पाऊलवाट दिसत नाही याचा अर्थ विद्यार्थ्याच्या आय़ुष्यात ज्ञानाचा प्रकाश नाही.जीवनात चालत राहूनही दुःख संपत नाही म्हणजे सत्याचे बोट सुटले आहे.जेथे जेथे सत्य दूर जाते तिथे तिथे खोटा सन्मान,आदर मिळत राहातो पण आंतरिक नाही.डोळ्यात अश्रू असले तरी सुखाचे, आंनदाचे अजिबात नाही.त्यामुळे शिक्षणातून सत्याचा प्रवास सुरू होणे हेच राष्ट्राच्या उत्थानाचा एकमेव मार्ग आहे. शिक्षणातून माहिती मिळेल पण त्यातून ज्ञानाची प्रक्रिया करीत आपल्याला सत्याच्या प्रकाशात समाज व राष्ट्राला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. ते प्रयत्न सर्वांना सुखी ठेवण्याचा असणार आहे. त्यामुळे सत्य पेरत राहण्याची गरज आहे. शिक्षणातून सत्याची पेरणी म्हणजे अवघे जग प्रकाशमान करण्याचा प्रयत्न असणार आहे.

– संदीप वाकचौरे

(लेखक-शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या