Saturday, November 23, 2024
Homeशब्दगंधकहाणी रश्मीच्या रॉकेट इतक्या संघर्षाची !

कहाणी रश्मीच्या रॉकेट इतक्या संघर्षाची !

‘रश्मी रॉकेट’ हा फक्त चित्रपट नाही तर ती आहे एका महिला खेळाडूची संघर्षगाथा… एका ठराविक चौकटीतले जगणे नाकारून स्वत:ला सिद्ध करणारी रश्मी असंख्य महिलांच्या स्वप्नांचे, आशा-आकाक्षांचे प्रतीक. हा चित्रपट द्युती चंदच्या आयुष्यावर बेतला आहे. महिलांचा खेळाडू म्हणून आघाडीवर जाण्याचा संघर्ष कसा आणि किती जीवघेणा असतो याची ही प्रेरणादायी कहाणी. म्हणूनच हा चित्रपट कुटुंबासोबत पाहणे आवश्यक आहे.

ओटीटी व्यासपीठांवर सर्वसाधारणपणे दाखवल्या जाणार्‍या वेब सीरिजमध्ये प्रणय आणि हिंसा ठासून भरलेली असतात. म्हणून या सीरिज पाहणार्‍यांचा जसा एक वर्ग आहे तसाच तो न पाहणार्‍यांचाही एक वर्ग आहे. मी दुसर्‍या वर्गातला प्रेक्षक आहे. ‘झी फाईव्ह’वर ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट पाहिला आणि तोच आपण आवर्जून पाहावा, असे मी नक्की सांगेन. हा चित्रपट मी पाहण्याचे प्रमुख कारण म्हणजे तो स्पोर्टस् मुव्ही आहे आणि दुसरे कारण म्हणजे तापसी पन्नू ही या दशकातली समर्थ अभिनेत्री. हा चित्रपट सुरू होतो रात्रीच्या अंधारात मुलींच्या वसतिगृहावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीच्या दृश्यापासून आणि त्या क्षणापासून चित्रपट तुम्हाला कवेत घेतो. यातली रश्मी ही खरे तर एक प्रतीक आहे स्त्रियांच्या प्रगतीच्या, गतीच्या स्वप्नांचे,अथक प्रयत्नांचे. स्वत:चे ऐकणार्‍या एका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या मुलीची ही गोष्ट आहे. प्रवाहाविरुद्ध पोहावे असे वाटणार्‍या प्रत्येक महिलेची ‘बकेट लिस्ट’ म्हणजे ‘रश्मी रॉकेट’. चित्रपट द्युती चंद या महिला अ‍ॅथलिटच्या जीवनावर आधारित आहे. द्युती ही एकेकाळची भारतातली सर्वात ‘प्रॉमिसिंग अ‍ॅथलिट’. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्वत:च्या चमकदार कामगिरीने लक्ष वेधून घेणारी आणि याच क्षेत्रातल्या राजकारणाचा बळी ठरलेली. हा चित्रपट आविष्कार स्वातंत्र्य घेऊनही द्युती चंदच्या सत्य घटनेची नाळ सोडत नाही हे महत्त्वाचे.

2014 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धांमधून द्युती चंदला ऐनवेळी वगळण्यात आले, तेही अत्यंत अपमानस्पदरीत्या. तिच्या खेळाचा दर्जा, गुणवत्ता याविषयी कोणालाही शंका नव्हती. पण शंका होती ती तिच्या महिला असण्याबद्दल. एखादी खेळाडू महिला आहे की नाही हे ठरवण्यासाठी वापरली जाणारी पद्धत ‘टेस्टोस्टेरॉन’च्या पातळीवर आधारित असते. महिला खेळाडूच्या शरीरात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त ‘टेस्टोस्टेरॉन’ असेल तर ती खेळाडू महिला म्हणून खेळण्यास अपात्र ठरवली जाते. या अन्याय्य पद्धतीविरुद्ध आपल्या देशात कोणी फारसा कायदेशीर आवाज उठवला नाही. पण द्युती चंदचे वेगळेपण तिथेच दिसते. तिचे बालपण गरिबीत गेले, यशाची वाटचाल खडतर, संघर्षाने भरली होती, हे ते वेगळेपण नाही. आजचा निम्मा भारतीय महिला हॉकी संघ गरिबीतूनच वर आला आहे. अर्धपोटी राहून बुटांविना त्यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली होती. पण इथे लढाई फक्त दारिद्य्राशी, परिस्थितीशी नाही तर पुरुषी मानसिकता आणि महिला असण्याच्या अन्याय्य ताकदीविरोधात होती. द्युती चंदने मग लुसान इथल्या ‘कोर्ट ऑफ अर्बिट्रेशन’मध्ये आवाज उठवला. इतकेच नाही तर स्वत:च्या समलैंगिक असण्याची जाहीर कबुली देखील दिली. त्याचवेळी म्हणजे 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतात ‘कलम 377’ संदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि समलैंगिकत्व निर्विवाद आहे, तो गुन्हा नाही असा निर्वाळा दिला.

- Advertisement -

द्युती चंद अथवा चित्रपटातल्या रश्मीची लढाई महिला खेळाडू म्हणून महत्त्वाची आहे. अशा प्रकारे महिला म्हणून स्पर्धेत भाग घेण्यावर बंदी घातली की ‘हार्मोन थेरपी’ने शरीरात नैसर्गिकरीत्या निर्माण होणारे ‘टेस्टोस्टेरॉन’ कमी करण्याची पद्धत जगात रूढ आहे. पण रश्मी ते नाकारते आणि अत्यंत अवघड अशी न्यायालयीन लढाई जिंकते. कोणत्याही स्पर्धेतल्या सुवर्णपदकापेक्षा ही कमाई अधिक मोलाची आहे. ओडिशामधल्या एका खेड्यातून सुरू झालेला द्युती चंदच्या आंतरराष्ट्रीय संघर्षाचा प्रवास थक्क करणारा आहे. उपाशीपोटी ब्राह्मिणी नदीच्या किनारी आपल्या सरस्वती या मोठ्या बहिणीच्या मागे धावणारी ही मुलगी पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवेल, असे कोणालाही वाटले नसेल. पुढे त्याच बहिणीशी ‘जेंडर’ या मुद्यावर तिचे कडाक्याचे मतभेद झाले. ज्या गावाने तिला डोक्यावर घेतले त्याच गावाच्या रोषाला तिला सामोरे जावे लागले. इतकेच काय तर प्रशिक्षकांशी झालेल्या मतभेदांमुळे तिला स्वत:च द्रोणाचार्य व्हावे लागले. या चित्रपटातल्या कोर्ट रूममधले न्यायालयीन वकिली डावपेच बघण्यासारखे आहेत.

आज सर्व प्रकारच्या खेळात समलैंगिक महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. प्रत्येकीला अशाच स्वरुपाच्या संघर्षाला आणि अन्याय्य व्यवस्थेला तोंड द्यावे लागले आहे. आजही 100 हून अधिक महिला खेळाडूंनी आपण समलैंगिक असल्याची कबुली तरी दिली आहे. काहीजणांनी हे उघड केले नाही, असाही अंदाज आहे. या अन्याय्य परिस्थितीला पुरुषी मानसिकतेचा, प्रचलित कुटुंब व्यवस्थेतल्या दृष्टिकोनाचा संदर्भ आहे. महिला खेळाडूने मैदानावर शक्तिशाली, आक्रमक, पुरुषी ताकदवान असण्याचे कौतुक. पण मैदानाबाहेर तिने स्त्रीच असावे ही अपेक्षा. या सगळ्याचा परिणाम म्हणून अनेक महिला ‘स्पोर्टस्’ क्षेत्र करिअर म्हणून सोडतात आणि आपण कधीकाळी आक्रमक, ताकदवान होतो हे विसरून चौकटीतले आयुष्य जगू लागतात. खेळाला अपेक्षित असणारी कणखर भूमिका आणि प्रत्यक्ष जीवनात जगावी लागणारी नाजूक स्त्रीची भूमिका हे दोन्ही एकावेळी जगणे ही तारेवरची कसरत आहे आणि अनेक महिला खेळाडू त्यात भरडून निघतात. पुरुषी स्वरुपाच्या महिला खेळाडूंमध्ये हे जास्त आढळून येते.

खरे तर ‘होमो सेक्श्युअल’ आणि ‘हेट्रो सेक्श्युअल’ या वैयक्तिक स्वभावांच्या आदिम प्रेरणांचा आणि कारणांचा अधिक शास्त्रीय, सखोल अभ्यास आवश्यक आहे. विशेषत: बूट हाच दागिना अन् घाम हेच अत्तर अशा लढाऊ वृत्तीने आयुष्य पणाला लावणार्‍या महिला खेळाडूंचा हा चित्रपट आहे. चौकट मोडून स्वत:च्या हिमतीवर आयुष्य जगणार्‍या महिला खेळाडूची ‘रश्मी रॉकेट’ ही संघर्षगाथा आहे. ती आज चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त झाली, हे वैशिष्ट्य. अन्यथा जगभर महिला अन्यायाविरोधात एकच भाषा बोलतात आणि ती असते निश:ब्दतेची भाषा. म्हणूनच वैचारिक गुलामगिरीचा उंबरठा ओलांडणार्‍या प्रत्येक महिलेसाठी हा चित्रपट आहे.

एक दफा तो मुझको अपना,

जीवन खुदही बोने दो,

लिख लेने दो, अपनी किस्मत,

होना है जो होने दो!

‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट एका महिला खेळाडूच्या संघर्षाचा असला तरी तो संघर्षाचे कुंकू लावणार्‍या प्रत्येक महिलेचा आहे. महिलांचा खेळाडू म्हणून आघाडीवर जाण्याचा संघर्ष कसा आणि किती जीवघेणा असतो याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. म्हणूनच हा चित्रपट कुटुंबियांसोबत पाहणे आवश्यक आहे आणि हो, पुरुषांनी देखील. स्त्रियांकडे बघायचा दृष्टिकोन यामुळे बदलला गेला तर रश्मी रॉकेटच्या धावण्याला नुसतीच गती नाही तर अर्थही येईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या