Tuesday, March 25, 2025
Homeदिवाळी अंक २०२४कहाणी सह्याद्रीची - विनय जोशी, भारतीय विद्या अभ्यासक

कहाणी सह्याद्रीची – विनय जोशी, भारतीय विद्या अभ्यासक

भारताच्या भौगोलिक, राजकीय, सांंस्कृतिक जडणघडणीत जसे हिमालयाचे महत्वपूर्ण स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्राच्या बाबतीत सह्याद्रीचे आहे. सह्याद्री हा महाराष्ट्राचा जीवनदाता आहे. पाऊस घेऊन येणार्‍या बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या मार्गात सह्याद्री ठामपणे उभा आहे. ज्याच्या भक्कम साथीने शिवरायांचे स्वराज्य उभे राहिले आणि आज 21 व्या शतकातही जगाशी तुलना करताना ते तसुभरही कमी पडत नाही, अशा या सह्याद्रीची ही कहाणी..

अब्जावधी वर्षांपूर्वीची ही कहाणी आहे. आटपाट सूर्यमाला होती, या सूर्यापासून ग्रहमाला बनली; पण तेव्हा पृथ्वी म्हणजे लाव्हाचा एक अग्निगोळा होती, तेव्हा इथे पर्वत नव्हते, महासागर नव्हते आणि जीवनही नव्हते. हळूहळू पृथ्वीचा बाहेरील लाव्हा थंंड झाला. कठीण पृष्ठभाग बनला, महाभूमी हा मोठा एकसंध भूखंड आकाराला आला. यावर काही डोंगर दर्‍या बनले. पण पृथ्वीच्या आतला लाव्हा तसाच धुमसत होता. अनेक उत्पात घडवत होता. या हालचालींमुळे महाभूमीची दोन शकले होऊन, अंगाराभूमी आणि गोंडवनभूमी अशी दोन भूखंडे अस्तित्वात आली. लाखो वर्षे उलटली तरी आतला लाव्हा खदखदतच होता. या हालचालींनी पुढे गोंडवन भूमीचेही तुकडे झाले. ज्वालामुखीचे उद्रेक झाले. भारताची भू-पट्टी उत्तरेकडे सरकू लागली आणि या सगळ्या घडामोडींमध्ये सह्याद्री तुझा जन्म झाला. तेव्हापासून भारताच्या पश्चिमेला तू आजही ठामपणे उभा आहेस.

- Advertisement -

सह्याद्री म्हणजे फक्त एक निर्जीव डोंगररांग नाही. सह्याद्री एक सजीव चैतन्य आहे. महाराष्ट्राचे महाराष्ट्रपण सह्याद्रीमुळेच जन्मास आले, वाढले आणि टिकले. गोविंदाग्रज यांंनी रचलेल्या महाराष्ट्र्र गीतात महाराष्ट्र या मंगल पवित्र देशाची स्तुती गाताना जी-जी विशेषण वापरली आहेत ती सह्याद्रीची देणे आहेत. सह्याद्रीच्या अग्निजन्य कठीण कातळामुळे हा प्रदेश राकट, कणखर, दगडांचा देश म्हणून ओळखला जातो. पण याच अभेद्य कातळावर उगवणार्‍या जैव विविधतेमुळे हा प्रदेश नाजूक, कोमल आणि फुलांचाही देश ठरतो. सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर भागवत धर्माची पताका फडकवत हा महाराष्ट्र भावभक्तीचा देश ठरतो. आणि हाच सह्याद्रीसम पोलादी मनगट असणार्‍या मर्द मावळ्यांच्या पराक्रमातून हा कर्त्या मर्दाचा देश ठरत स्वराज्य निर्माण होऊ शकले.

भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्राच्या किनारपट्टीला समांतर असणारी डोंगरांग म्हणे पश्चिम घाट. हा उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेत थेट कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे. सुमारे 1,600 किमी लांबीचा हा पश्चिम घाट गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधून जात 1 लाख 60 हजार चौरस किमी क्षेत्र व्यापतो. तामिळनाडूमधील निलगिरी टेकड्यांमध्ये पश्चिम घाट पूर्व घाटाशी मिळतो. तामिळनाडूमधल्या पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता खंड पावते. पालघाट खिंडीपासून कन्याकुमारीपर्यंत दक्षिण भाग, याच्यावर गोव्यापर्यंत मध्य भाग आणि त्याच्या वर तापी नदीपर्यंतचा उत्तर भाग असे पश्चिम घाटाचे तीन भागात विभाजन सांगता येऊ शकते.

उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. भौगोलिक दृष्ट्या याला पश्चिम घाट नाव असले, तरी महाराष्ट्रात मात्र हा प्रामुख्याने सह्याद्री म्हणूनच ओळखला जातो. उत्तर- दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेकडे जाणार्‍या काही उपरांगा किंवा फाटे आहेत. तापी आणि गोदावरी नदी यांदरम्यान सातमाळा-अजिंठा ही डोंगररांग पसरली आहे. याच्या खाली गोदावरी आणि भीमा यादरम्यान हरिश्चंद्रगड-बालाघाट ही रांग आहे. महादेव डोंगर रांंग भीमा आणि कृष्णा नद्यांच्या दरम्यान आहे.

सह्याद्रीमुळे महाराष्ट्राचे कोकण व देश (पश्चिम महाराष्ट्र) असे दोन विभाग दिसतात. बहुतांश सह्याद्री सलग असला, तरी त्यात अधूनमधून खिंडी आणि घाट आहेत. कसारा, माळशेज, बोरघाट, वरंधा, आंबेनळी, कुंभार्ली, फोंडा, बावडा, आंबोली अशा काही घाटातून देशावरून कोकणात जाता येते. दळणवळण आणि वाहतुकीच्या दृष्टीने हे घाट महत्वाचे ठरतात.

‘आद्या सा गौतमी ग द्वितीया जान्हवी स्मृता’या पुराण उक्तीनुसार गोदावरी ही वृद्धगंगा आहे, पृथ्वीवर आधी गोदावरीचे अवतरण झाले आणि मग जान्हवी गंगेचे अवतरण झाले. भौगोलिक दृष्ट्यादेखील हेच सिद्ध होते. गोदावरीचे उगमस्थान असणारा सह्याद्री गंगेच्या उद्गमस्थान हिमालयाच्याही आधी निर्माण झाला आहे. सुमारे 20 ते 30 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आजच्यासारखे सात खंड नव्हते. तर सगळ्या खंडांची मिळून अखिलभूमी हा एकच अतिविशाल महाखंड अस्तित्वात होता. भूगर्भीय हालचालींमुळे सुमारे 17.5 ते 20 कोटी वर्षांपूर्वी या महाभूमीचे विभाजन होत अंगाराभूमी आणि गोंडवनभूमी असे दोन मोठे खंड अस्तित्वात आले. यातील गोंडवनभूमी या खंडात सध्याच्या दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मादागास्कर, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या भूखंडीय प्रदेशांचा समावेश होत होता. आजचे उत्तर अमेरिका, युरोप, ग्रीनलंड आणि भारतसोडून उर्वरित आशिया खंड हे मिळून अंगाराभूमी (लॉरेशिया) हे महाखंड होते.

जुरासिक कालखंडाच्या सुरुवातीला सुमारे 18 कोटी वर्षांपूर्वी गोंडवाना खंडाचेही विभाजन व्हायला सुरुवात झाली. गोंडवन भूमीच्या पश्चिम भागातील आफ्रिका व दक्षिण अमेरिका हे, पूर्व भागातील भारत, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या खंडांपासून वेगळे झाले. क्रिटेशस कालखंडाच्या अखेरीस भारतीय भूपट्टा मादागास्करपासून वेगळे होत उत्तरेकडे सऱकू लागला. यादरम्यान भारतीय पठाराचेही विभाजन होत आजच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभांगरेषा (षर्रीश्रीं श्रळपश) निर्माण झाली. या रेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे भारतीय पठाराच्या पश्चिम बाजूला उंची प्राप्त झाली. पूर्वेला पठार आणि पश्चिमेला समुद्र किनारा यामधली ही प्रस्तरभंग कडा म्हणजे पश्चिम घाट होय.

सह्याद्रीची निर्मिती होत असताना भारतीय भूपट्टाचे उत्तरकडे सरकणे सुरूच होते. या भूगर्भीय हालचालीमुळे लाव्हाचा उद्रेक होत पश्चिम घाटाची अनेक भूवैशिष्ट्ये बनत गेली. अखेर 5 कोटी वर्षांपूर्वी भारतीय भूपट्टा युरेशियन भूपट्टाला धडकला आणि त्यातून हिमालयाच्या पर्वतरांगा अस्तित्वात आल्या. म्हणून आधी सह्याद्री आणि मग हिमालय हे शास्त्रीयदृष्ट्यादेखील सिद्ध होते.

भारताच्या भौगोलिक, राजकीय, सांंस्कृतिक जडणघडणीत जसे हिमालयाचे महत्वपूर्ण स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्राच्याबाबतीत सह्याद्रीचे आहे. सह्याद्री हा महाराष्ट्राचा जीवनदाता आहे. पाऊस घेऊन येणार्‍या बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या मार्गात सह्याद्री ठामपणे उभा आहे. याच्यामुळे मान्सून वारे अडले जातात आणि वृष्टी होते. सह्याद्रीचा घाटमाथा आणि पश्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो तर याच्या पूर्वेकडील प्रदेशात पर्जन्यमान कमी कमी होत जाते. सह्याद्री नसता तर पूर्ण महाराष्ट्रातच पर्जन्यमान कमी राहिले असते. महाराष्ट्राला सुजलाम् करण्यार्‍या अनेक नद्या सह्याद्रीत उगम पावतात.

एकाच भूप्रदेशात उगम पावणार्‍या नद्यांना परस्परांपासून विरुद्ध दिशांना वाहण्यास प्रवृत्त करणार्‍या उंच भूभागाला जलविभाजक (वॉटर डिव्हाइड) म्हणतात. सह्याद्री हा जसा महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख उगमस्रोत आहे, तसा तोच या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. सह्याद्रीमुळे काही नद्या पश्चिमेला वाहून शेवटी अरबी समुद्राला मिळतात. तर गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या सह्याद्रीच्या पूर्वेला दख्खनच्या पठारावरून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. या प्रवासात त्या अनेक जिल्ह्याना पाणी पुरवत संपन्न करतात. गोदावरी-वैतरणा, वाशिष्टी-कोयना या एकाच डोंगरमाथ्यावर उगम पावणार्‍या पण विरुद्ध दिशेने वाहणार्‍या नद्या.

सह्याद्रीमुळे महाराष्ट्र फक्त सुजलामच नाही, तर सुफलाम देखील होतो आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 75 टक्के भागात ङ्गरेगूर मृदाफ म्हणजे काळी माती पसरलेली आहे. दख्खनचे पठार ज्या बेसाल्ट खडकापासून बनले आहे, त्याच्या विदारणातून ही माती तयार होते. सह्याद्रीमुळे त्याच्या पूर्वेकडील प्रदेशात तुलनेने कमी पाऊस होतो. परिणामी अतिवृष्टी होऊन मृदेतील पोषणद्रव्ये वाहून जात नाहीत. सह्याद्रीतून उगम पावलेल्या नद्यांच्या सिंचनक्षेत्रातून या सकस मातीत खरीप व रब्बी या दोन्ही हंंगामांतील पिकांंची लागवड केली जाते. सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकणपट्टीत अधिक पाऊस होतो. इथे जांभी मृदा आढळते. अतिवृष्टीमुळे या मातीत ह्युमसचे प्रमाण कमी असून, अ‍ॅल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते. फळबागासाठी अशी माती उपयुक्त ठरते. कोकण किनारपट्टीच्या सखल प्रदेशामध्ये आढळणारी गाळाची मृदा तांदुळासाठी उपयुक्त ठरते. सह्याद्रीच्या पर्वतमय भागात असणार्‍या पिवळसर मृदेत पाण्याचा निचरा अधिक चांगला होतो. या मृदेमध्ये उंचावरील प्रदेशात भरडधान्य घेतली जातात.

सह्याद्री आणि अरबी समुद्र यातला कोकणचा भाग अरूंद आणि तीव्र उताराचा आहे. परिणामी वैतरणा, सावित्री, वाशिष्ठी, दमणगंगा, तानसा, कुंडलिका, उल्हास, अशा पश्चिम वाहिनी नद्या आखूड लाांबीच्या आणि वेगवान प्रवाहाच्या असतात. या नद्या पूर्ववाहिनी नद्यांंप्रमाणे समुद्राला मिळतांना गाळ साठवत त्रिभूज प्रदेशाची निर्मिती करू शकत नाहीत. दंतुर किनारा आणि अंंतर्गत भागात काही अंंतरापर्यंत नौका नेता येतील अशा खाड्या यामुळे पश्चिम किनारपट्टीवर बंंदरांचा विकास अधिक चांगल्या रीतीने होऊ शकला आहे. व्यापार आणि माल वाहतुकीच्या दृष्टीने ही बाब महत्वपूर्ण ठरते. अगदी मौर्य-सातवाहन-गुप्त काळापासूनच शूर्पारक (सोपारा), चौल, कल्याण अशा बंंदरातून परदेशी व्यापार बहरत आला आहे.

सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वनराई निर्धोकपणे बहरू शकली. सह्याद्रीमुळे होणार्‍या पर्जन्यमानाच्या फरकाचा परिणाम जंगलांच्या प्रकारावरही झालेला दिसतो. सह्याद्रीच्या पश्चिमेस अधिक पाऊस पडणार्‍या सिंधुदुर्ग, सावंतवाडी अशा प्रदेशात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात. 150 ते 200 सेंटिमीटरपर्यंत पाऊस असणार्‍या इगतपुरी, लोणावळा अशा प्रदेशात उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वने आहेत.

सह्याद्रीच्या पूर्व उतारावर 100 ते 150 सेंमी. पर्जन्यमान असणार्‍या प्रदेशात उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगत उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात. कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये ‘दलदली वने’आहेत. या वृक्ष विविधतेचा परिणाम म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बहरलेली जैवविविधता. अनेक जातींचे प्राणी, पक्षी, कीटक. सरीसृप आणि असंख्य प्रकारच्या वनस्पती यांच्यामुळे हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. सह्याद्रीमध्ये अनेक राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी, अभयारण्ये, राखीव व संरक्षित वने निर्माण करणे शक्य झाले आहे.

उत्तर भारतातील मैदानी प्रदेशाच्या तुलनेने सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण पसरलेली मुख्य आणि पूर्व-पश्चिम पसरलेल्या उपशाखांमुळे महाराष्ट्राला एक नैसर्गिक संरक्षण मिळते. सह्याद्रीपासून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मिळणारी सुबत्ता, संपन्नता आणि संरक्षण याचा परिणाम महारष्ट्राच्या जनमानसावर झाला नसता तरच नवल होते. कोकणच्या सड्यावरील कातळशिल्पे, नवाश्मयुगापासून इथे असणारा मानवी वावर सांगून जातो. सावळदा, दायमाबाद, जोर्वे संस्कृतीच्या अवशेषातून ताम्र पाषाण काळातील इथले समाज जीवन दिसते. सह्याद्रीच्या अरण्यातले वनवासी असोत किंवा पायथ्याशी राहणारे शेतकरी, इथल्या समाज जीवनावर सह्याद्रीचा स्पष्ट – अस्पष्ट ठसा उमटलेला दिसतो.

सह्याद्रीवरील नद्यांची उगमस्थाने, डोंगरांची शिखरे, खिंडी, घाटमाथा अशा भौगोलिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठिकाणी विविध देवतांंची मंदिरे स्थापन झाली. सह्याद्रीच्या टिकाऊ कठीण कातळावर अनेक हिंदू, जैन, बौद्ध लेण्या कोरल्या गेल्या. सह्याद्रीमुळे भरलेले पोट आणि शांत असलेले मन भक्तीच बीज अधिक चांगले रुजू शकले. ज्ञानोबानी सुरु केलेल्या भक्ती चळवळीला व्यापक स्वरूप मिळू शकले.

महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीतदेखील सह्याद्रीचा मोठा वाट आहे. सातवाहन काळापासून तर मराठा साम्राज्य कालखंडापर्यंत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बांधलेले किल्ले महत्त्वपूर्ण ठरले आहेत. सह्याद्रीच्या दुर्गमतेमुळे गनिमी काव्यासारखी युद्धनीती इथे यशस्वी होऊ शकली. सह्याद्रीच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली सुवर्ण घटना म्हणता येईल.

महाराष्ट्राच्या जडणघडणीला आणि मराठी मनाला देखील सह्याद्रीने आकार दिला आहे. 21 व्या शतकातही सह्याद्रीची ओढ, त्याचे वेड मराठी मनात तसेच टिकून आहे. म्हणून तर मराठी तरुण वेळ मिळेल तेव्हा सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर ट्रेकिंगला निघतो. इथले किल्ले चढताना मावळ्यांनी केलेला पराक्रम आठवत स्फुरण चढते. किल्ल्यांचे अवशेष बघताना गतकाळाच्या आठवणी मनात काहूर माजवतात. एखाद्या डोंगर शिखरावर पोहचून समोरचे सह्याद्रीचे विशाल दर्शन जेव्हा घडते, तेव्हा आपसूकच नतमस्तक व्हायला होते. अशी ही सह्याद्रीची कहाणी डोंगरदरी, कातळ कपारी, नदीतीरी सुफळ संपूर्णम.

विनय जोशी-भारतीय विद्या अभ्यासक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...