Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्या‘नांदूरची राणी’ खातेय चक्क ‘मासे’

‘नांदूरची राणी’ खातेय चक्क ‘मासे’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्रातील पक्षितीर्थ समजल्या जाणार्‍या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात धरणातील पाणी औरंगाबादसाठी सोडल्यामुळे पाणीसाठा कमी झाल्याने या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कच्छकडे निघालेल्या रोहित पक्ष्यानेदेखील खाद्य उपलब्ध झाल्याने मुक्काम ठोकला आहे.

- Advertisement -

नांदुरला बारा महिने वास्तव्यास असलेल्या जांभळी पानकोंबडी पक्षीप्रेमींचा आवडता पक्षी असल्याने हिला ‘नांदूरची राणी ‘ नावाने देखील ओळखले जाते. दलदलीचा प्रदेश आणि दलदल त्या वातावरणास वैशिष्ट्यकृत बरीच पक्षी आकर्षित होतात. त्यातील हा एक आहे. हा पक्षी आकाराने कोंबडीएवढा असतो. जांभळट निळ्या रंगाचा असतो. लांब तांबडे पाय, पायांची बोटे लांब असतात. कपाळ तांबडे त्यावर पिसे नसतात. चोच लहान, जाड व लाल रंगाची असते. भुंड्या शेपटीखाली पांढर्‍या रंगाचा डाग असतो. शेपटी खालीवर हलविण्याच्या तिच्या सवयीमुळे हा डाग ठळक दिसतो. नर-मादी दिसायला सारखे असतात. जोडीने किंवा मोठ्या समूहात आढळतात. टक्कल असलेल्या डोक्यावर लाल रंगाचे ठिपके असलेले चमकदार जांभळे आणि किनार्‍याच्या रेषेत किंवा नखांमध्ये लांब लाल पाय आणि लाल रंगाची चोच अशी तिची ओळख करून देता येईल. हा एक अतिशय लाजाळू पक्षी आहे. हे पक्षी पानवेली आणि कमळाचे कंद हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कधीकधी हे पक्षी कीटक, गोगलगाय खाताना देखील दिसून आले आहे. असे असले तरी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात जांभळी पाणकोंबडीचे आश्चर्यकारक वर्तन बघावयास मिळाले आहे. पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा हे पक्ष्यांचे निरीक्षण करत असताना हा पक्षी चक्क सहा इंचाच्या मरळ नावाचा माश्याची शिकार करताना बघावयास मिळाला. इतका मोठा मासा या पक्ष्याचे खाद्य नाही. हा मासा पकडून या पक्ष्याच्या एका समूहाने तो फस्त केला. मासा खाताना त्यांनी केवळ माश्याच्या आतील भागातील मास खात असल्याचे बघावयास मिळाले. वातावरणातील बदलांमुळे पक्षीदेखील आपली राहणीमान बदलत असून मूळ नैसर्गिक खाद्य सोडून परिस्थितीशी जुळवून घेत असल्याचे धक्कादायक चित्र अभयारण्यात बघावयास मिळत आहे.

या लाजाळू पक्ष्यांची अधिक सवयी शोधण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. या पक्ष्यांचा एकमेव धोका म्हणजे या स्थिर-पाण्याचे प्रदूषण होय. नाशिक शहरातून प्रदूषित पानवेली अभयारण्यात वाहून येतात. त्यामुळे प्रदूषित कंद हे पक्षी खात नसावे. यामुळे त्यांनी मासे खाण्यास सुरुवात केली असल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

हा पक्षी भारतात विपूल प्रमाणात आढळतो. हा पक्षी भारतीय उपखंड, श्रीलंका, अंदमान, आणि निकोबार बेटांत निवासी आहे आणि स्थानिक स्थलांतर करतो. याची वीण जून ते सप्टेंबर या काळात होते. नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात या पक्ष्याला बारा महिने बघता येते.

मोठे मासे खाण्याची रचना जांभळी पानकोंबडी या पक्ष्याच्या शरीराची नाही. तिचे खाद्य मिळत नसल्याने तिने परिस्थितीशी जुळत घेवून मासे खाण्यास सुरुवात केली असावी. ही घटना धोक्याची घंटा वाजविण्यासारखी आहे. नाशिक शहरातून प्रदूषित पानवेली अभयारण्यात वाहून येतात. यामुळे देखील येथील पक्ष्यांच्या जीवनचक्रावर परिणाम होणार आहे. भविष्यात मासे खाल्ल्याने या पक्ष्यांच्या आरोग्यवर काय परिणाम होत आहे का, याचा देखील अभ्यास करावा लागणार आहे.

– प्रा. आनंद बोरा, पक्षी अभ्यासक

- Advertisment -

ताज्या बातम्या